आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांची दिवाळी होणार गोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी 57.56 कोटी रुपये वितरीत करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याच्या त्या कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय दिनांक 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रकर्तक यांना 1 जुलै 2020 पासून अनुक्रमे 2000 व 3000 रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आरोग्य विभागाने मंगळवारी शासन निर्णय काढला आहे.

70 हजार आशा सेविकांना लाभ

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला अदा करण्यास पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यास अनुसरून वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीचे 57.56 कोटीच्या अनुदान कितरणास मान्यता दिली आहे. दिवाळी सणापूर्वी राज्यातील सुमारे 70 हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.