बिहारमध्ये गुंडाराज; राजद नेत्याची हत्या, संशयितांना जिवंत जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमधील नालंदा जिल्ह्यात मंगळवारी रात्री राजद नेते इंदल पासवान यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर पासवान यांच्या समर्थकांनी तीन संशयितांना जबर मारहाण करून त्यांना पेटवून दिले. यात एका 13 वर्षीय मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा गुंडाराज सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

इंदल पासवान हे गेल्या आठवड्यातच राजदमध्ये सहभागी झाले होते. मंगळवारी इंदल पासवान हे त्यांच्या एका नातेवाईकाच्या श्राद्धासाठी गेले होते. तेथून परत येत असताना मघंडा सराई गावाजवळ त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पासवान हे घरी परतले नाही तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. बुधवारी सकाळी पोलिसांना पासवान यांचा मृतदेह सापडला. यावेळी तपासादरम्यान पासवान यांच्या कुटुंबीयांनी पासवान यांचे चुन्नी लाल या व्यक्तीसोबत भांडण झाल्याचे सांगितले. त्यानंतर पासवान यांच्या समर्थकांनी चुन्नी लालच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर समर्थकांनी चुन्नी लाल व तेथे उपस्थित असलेल्या दोघांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्या तिघांना पेटवून दिले. यात संतू मालकर हा 13 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर रंजन यादव याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात चुन्नी लाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.