अनुपम खेर अध्यक्ष म्हणून फिल्म इन्स्टिट्यूटसाठी किती वेळ देतात-नसिरुद्दीन शाह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

अनुपम खेर हे फिल्म इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत; परंतु ते या संस्थेसाठी किती वेळ देतात? अध्यक्ष झाल्यानंतर या संस्थेमध्ये ते किती वेळा आले आहेत? संस्थेसाठी त्यांनी फार वेळ दिलाच नसेल, तर मी त्यांच्या कामावर काय भाष्य करू? असा सवाल करतानाच ज्येष्ठ अभिनेते आणि इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी नसिरुद्दीन शहा यांनी अनुपम खेर यांच्यावर टीका केली.

अनुपम खेर यांची काही महिन्यांपूर्वी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांच्या वर्षभराच्या कामकाजाबाबत पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी अनुपम खेर यांच्यावर टीका केली.

नसिरुद्दीन शहा म्हणाले, अनुपम खेर हे संस्थेमध्ये आलेले मी फार कमी वेळा पाहिले आहे. अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी किती वेळ संस्थेसाठी दिला आणि जर ते अध्यक्ष म्हणून संस्थेसाठी फार वेळ देत नसतील, तर त्यांच्या कामाबद्दल मी काय बोलू. मी स्वत: माजी विद्यार्थी म्हणून संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा संस्थेमध्ये गेलो आहे. परंतु, अनुपम खेर हे अध्यक्ष झाल्यानंतर फार फार तर एक किंवा दोन वेळा संस्थेमध्ये आले आहेत. त्यांची निवड संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी झालेली आहे. जर अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेसाठी फार वेळ दिला नसेल आणि विद्यार्थ्यांशी त्यांचा फार संपर्क झाला नसेल, तर त्यांनी त्यांची जबाबदारी कितपत पार पाडली आणि कशाप्रकारे काम केले याबद्दल मी काय बोलू. अनुपम खेर यांनी जर संस्थेसाठी पुरेसा वेळ दिला तरच त्यांच्या कामकाजाबद्दल बोलता येईल; अन्यथा त्यांच्या कामाबद्दल मी काय बोलणार? असा सवालही नसिरुद्दीन शहा यांनी केला.