
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपी अर्णब गोस्वामी याने अंतरिम जामिनासाठी अलिबागच्या सत्र न्यायालयापासून मुंबई उच्च न्यायालयापर्यंत धावपळ केली. मात्र उच्च न्यायालयाने जामीन फेटाळत त्याला सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले. तेथे या प्रकरणाची सुनावणी बाकी असतानाच बुधवारी सुप्रीम कोर्टाने अर्णब याच्यासह दोघांना जामीन मंजूर केला.
या प्रकरणी राज्य सरकारने कॅव्हेट दाखल केले होते. एवढेच नव्हे तर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी तातडीच्या सुनावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र बुधवारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या सुट्टीतील न्यायालयासमोर सुनावणी पार पडली. चौकशीसाठी पोलिसांना योग्य ते सहकार्य करा, या अटीवर अर्णबसह इतर आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या तातडीच्या सुनावणीबाबत ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनीही आश्चर्य व्यक्त केले असून कित्येक वर्षे कोठडीत न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कैद्यांच्या बाबतीत अशी तत्परता का दाखवली जात नाही, असा सवाल भूषण यांनी ट्विट केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरिक्षण नोंदविली. ज्यात त्यांनी उच्च न्यायालयाला देखील फटकारले आहे. या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही तर ते चुकीच्या मार्गाने पुढे जाईल. तुमची विचारधारा वेगळी असू शकते. परंतु न्यायालयाला स्वातंत्र्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. न्यायालय स्वातंत्र्याचे रक्षण करणार नसेल तर कोण करेल?,’ असे मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी यावेळी व्यक्त केले. आपली लोकशाही ही लवचिक आहे. महाराष्ट्र सरकारने हे सर्व दुर्लक्ष केले पाहिजे, असे मत देखील न्यायालयाने यावेळी व्यक्त केले आहे.
निष्पक्ष चौकशीचा अधिकार
‘तुम्हाला त्यांची विचारधारा आवडत नसेल, असे होऊ शकते. माझ्यावर सोडा, मी त्यांची वाहिनी पाहत नाही. परंतु जर उच्च न्यायालय जामीन देत नाही तर त्या नागरिकाला तुरूंगात टाकले जाते. आम्हाला एक कठोर संदेश द्यायला हवा. पीडित व्यक्तीला एका निष्पक्ष चौकशीचा अधिकार आहे. तपास सुरू राहू द्या. परंतु राज्य सरकारे या आधारावर व्यक्तींना लक्ष्य करत राहिली तर एक कठोर संदेश बाहेर जायला हवा,’ असेंही मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी यावेळी व्यक्त केले.
या अटींवर जामीन
अर्णब आणि इतर दोन आरोपींनी पुराव्यांची छेडछाड करू नये. तसेच चौकशीदरम्यान या तिघांनीही पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करावे.

























































