
रेल्वे स्थानकांतून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना प्रदुषणमुक्त प्रवास घडविण्यासाठी मोबाईल अॅपवर आधारित इलेक्ट्रीक ऑटो रिक्षा लवकरच उपलब्ध होणार आहे.
मध्य रेल्वेच्या घाटकोपर, कुर्ला पाठोपाठ आता ठाणे या स्थानकांत ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. लोकलमधून उतरत असतानाच प्रवाशांना आपल्या मोबाईलवर ही इलेक्ट्रीक रिक्षा ओला किंवा उबेरप्रमाणे बुक करता येणार आहे.
मध्य रेल्वेने झीरो कार्बन उत्सर्जन योजनेनुसार ई-ऑटो रिक्षांना चार्जिंग स्टेशनसह पाकि&ंगची जागा कंपन्यांना उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकांत अॅपवर आधारित तीन चाकी इलेक्ट्रीक वाहनासाठी टेंडर काढण्यात आले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला 229 चौरस मीटरची जागा ‘ट्रेझर वास वेन्चर प्रायव्हेट लिमिटेड’ ला इलेक्ट्रीक ऑटोच्या पार्किंग आणि चार्जिंगसाठी ही जागा तीन वर्षांकरीता देण्याचे कंत्राट देण्यात आले असून मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनला यातून 19.25 लाख रूपये अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. हे तिसरे कंत्राट असून याआधी घाटकोपर आणि पुर्ला स्थानकांत अशा प्रकारचे कंत्राट देण्यात आले आहे. संपूर्ण देशात मध्य रेल्वेची मुंबई डिव्हीजनने अशाप्रकारचे कंत्राट देणारी पहिली डिव्हीजन ठरली असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रॉबिन कालीया यांनी दिली.
40 लाखांचे उत्पन्न
अॅप आधारित ई – रिक्षा सेवेमुळे स्थानकाबाहेर बस किंवा रिक्षेसाठी रांगा लावण्याची गरज नाही. अॅपवर रिक्षा बुक करता येईल.
मध्य रेल्वेने घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांत 1000 चौरस मीटर जागा चार्जिंग आणि पार्कींगकरीता उपलब्ध केली आहे. या दोन्ही ठिकाणांहून सुमारे 40 लाख उत्पन्न मिळणार आहे.



























































