पालिकेच्या ई-टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, स्थायी समिती अध्यक्षांचे चौकशीचे आदेश

सामना ऑनलाईन । मुंबई

पालिकेत ई-टेंडर प्रक्रियेत आयटी विभागाच्या संगनमताने घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपसह विरोधकांनी बुधवारी स्थायी समितीत केला. या आरोपाची गंभीर दखल घेत चौकशी करून सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे लेखी उत्तर प्रशासनाने पुढील बैठकीत सादर करावे असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

घनकचरा ई-टेंडर प्रक्रियेत हा घोटाळा झाला असून ई-टेंडर दुपारी 12 वाजता निविदा प्रक्रिया सुरू होते आणि सायंकाळी 4 वाजताबंद होते. या तीन तासांच्या कालावधीत 13 निविदाकारांपैकी फक्त 2 निविदाकार पात्र ठरतात. म्हणजे पालिकेतील आयटी विभागातील भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदार यांची सेटिंग असून हा महा टेंडर घोटाळा असल्याचा आरोप भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केला. सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर असल्याचे यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले. त्यामुळे या प्रकारणाची सखोल चौकशी करून कुणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करा, असे निर्देशही जाधव यांनी दिले. यावर संबंधित प्रकरणाची चौकशी करून कुणी दोषी आढळल्यास कारवाई करू, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या