
>> अनघा सावंत
कीर्तनातून समाज बदलू शकतो. माझ्या कीर्तनातून समाजाला उत्तम आदर्शाकडे नेण्याचा कायम प्रयत्न असेल…हे मनोगत व्यक्त करणाऱया दौंड येथील कुरकुंभ गावातील लोकप्रिय कीर्तनकार ह. भ. प. अर्चनाताई साळुंके यांनी शालेय जीवनातच कीर्तन या क्षेत्रात करीअर करण्याचा ठाम निर्णय घेतला. वेगळी वाट चोखाळत कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन आणि परिवर्तन करण्याचं मोलाचं कार्य त्यांनी हाती घेतलं.
लहानपणापासूनच कलेची आवड असलेल्या अर्चना म्हणाल्या, ‘‘पाचवी-सहावीत असल्यापासूनच मी कीर्तन खूप आवडीनं पाहायचे. भजनाचे कार्यक्रम करीत असतानाच मला आत कुठंतरी जाणवलं की, मी कीर्तनही उत्तम करू शकते. मग यादृष्टीनं सुरुवातीला मी ‘कीर्तन म्हणजे काय?’ याविषयी स्वयं-अध्ययन केलं आणि कीर्तन या विषयावर संपूर्ण अभ्यास केला.’’
अर्चना यांचे वडील वसंत साळुंके हे पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे आपल्या मुलीनंही याच क्षेत्रात किंवा कोणत्या तरी वेगळ्या क्षेत्रात करीअर करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे अर्चना यांनी कीर्तन या क्षेत्रातच करीअर करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी त्यांच्या वडिलांचा याला विरोध होता. मात्र दोन वर्षांनी मोठय़ा असलेल्या त्यांच्या भावाचा, अतुलचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा होता. कारण लहानपणापासूनच त्यांच्या गायनाला त्यांचा भाऊ पेटी वाजवून साथ देत असे आणि दोघे मिळून भजनाचे कार्यक्रम करीत असत.
पुढे अर्चना यांनी आळंदी येथे ‘कीर्तन’ विषयातील सहा वर्षांचं संपूर्ण शिक्षण घेतलं आणि याचबरोबर कीर्तन करण्यासही सुरुवात केली. कार्यक्रम करता करताच बारावीची परीक्षाही त्यांनी दिली. बारावीचा अभ्यास, भजन-कीर्तन या सर्व गोष्टी जमवून पायी सहा-सात वाऱयाही केल्या. हे सर्व करूनही बारावीत महाविद्यालयातून त्या प्रथम आल्या.
माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे काय तर त्यांचे चांगले विचार . ‘सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठी विठोबाचे।।’ या तत्त्वाला घट्ट धरून असणाऱया अर्चना म्हणतात, ‘‘आज असंख्य कीर्तनकार पोटासाठी कीर्तन करतात. मलाही कीर्तनातून पैसे मिळतात, पण माझ्यासाठी पैसा नंतरची गोष्ट आहे. माझ्या प्रत्येक कीर्तनातून हा उद्देश असतो की, चांगला समाज घडला पाहिजे.
अर्चना यांना वारकरी संप्रदायाकडून ‘राष्ट्रीय युवा कीर्तनकार’ म्हणून सन्मानित केलं गेलं. इतर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
कीर्तनातून समाज जागृती
आज वृद्धाश्रमांची वाढत चाललेली संख्या लक्षात घेऊन कीर्तनाद्वारे आई-वडिलांचं आपल्या आयुष्यातील स्थान काय आहे हे मुलामुलींना, तरुणांना त्या पटवून देतात. ग्रामीण भागात आजही दारूमुळे कितीतरी संसार उद्ध्वस्त होतात. हे कुठेतरी थांबावं म्हणून आपल्या कीर्तनातून त्या दृष्टांत देतात. गावागावांतून कीर्तन करताना एक व्यक्ती जरी माझ्या कीर्तनातून घडली तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं असं मला वाटतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

























































