अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोस्वामी यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.अलिबाग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गोस्वामींना अटक केली असून त्यांना पुढील चौकशीसाठी अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

अलिबाग तालुक्यातील कावीर गावातील अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांनी मे 2018 रोजी आपल्या राहत्या घरात आत्महत्या घेतल्याची घटना घडली होती. आई आणि मुलाच्या या आत्महत्ये प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा योग्य तपास झाला नसून फेरतपास व्हावा, अशी मागणी अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देवून केली होती. त्यानुसार या संपुर्ण प्रकरणाची चौकशी ही राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) देवून फेरतपास करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. याच प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी बुधवारी मुंबई येथून त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

अलिबाग तालुक्यातील कावीर या गावात अनव्य नाईक याचे वडिलोपार्जित घर आहे. या घरात अनव्य नाईक याची आई कुमुद नाईक आणि अनव्य नाईक राहत होते. अनव्य नाईक यांचा  मुंबई येथे घर सजावटीचा व्यवसाय होता. या व्यवसायात उधारी वसूल न झाल्याने नाईक यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्यामुळे घेणेकरी यांनी पैशाचा तगादा लावला होता. याला कंटाळून 5 मे 2018 रोजी आपल्या घरी गळफास घेऊन आई आणि मुलाने आत्महत्या केली. त्यावेळी मृत्यूपूर्वी नाईक यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नाईक यांनी लिहिली होती.

अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास हा अलिबाग पोलिसांनी केला होता. या प्रकरणात अलिबाग पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. 59/2018, भादंवि 306,34 प्रमाणे तसेच गु.र.नं. 114/ 2018 भादंवि कलम 302 प्रमाणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांच्या मुलीने अर्णव गोस्वामी यांनी त्यांच्या वडिलांच्या कामाचे पैसे न दिल्याने त्यांचे वडील व आजीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. तपासाबाबत असमाधानी असल्याने हे प्रकरण  गुन्हेगारी प्रक्रिया संहीता (सी.आर.पी.सी) मधील कलम 173 (8) मधील अधिकाराचा वापर करुन हे प्रकरण राज्य अन्वेषण विभाग अथवा गुन्हे शाखेकडे वर्ग करावे, तसेच तत्कालीन संबंधित तपास अधिकारी व इतर शासकीय अधिकारी, न्यायीक अधिकारी यांचे विरुध्द चौकशी करण्यात यावी, अशी विनंती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गुहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.

गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिले होते चौकशीचे आश्वासन
वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख सप्टेंबर महिन्यात विधानसभेत उत्तर देताना दिली होती. विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यांच्या निवेदनास उत्तर देताना गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली होती.

अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने केली होत्या आत्महत्या
अन्वय नाईक यांनी त्यांची आई कुमुद नाईक यांच्यासह 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील राहात्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासह तीन जणांची नावे होती. स्टुडियोचे काम करूनही 83 लाख रुपये गोस्वामी यांनी न दिल्याने नाईक यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला आणि तणावग्रस्त होऊन आत्महत्या करत असल्याचे नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे म्हटले. त्यानुसार अर्णब गोस्वामीविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

पुण्यातील प्रख्यात बिल्डर सुरेश परमार यांच्या आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोट पुरावा म्हणून ग्राह्य धरून आरोपींना अटक केली होती. मग अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्यांनाही अटक करा अशी मागणी सरनाईक यांनी केली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपशील आणि त्या तपासात झालेल्या दिरंगाईचा लेखाजोखा मांडला होता.

अक्षता नाईक यांनी व्हिडीओद्वारे केली होती न्यायाची मागणी
अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केला होता.या व्हिडीओमध्ये त्यांनी माझ्या सासू आणि नवऱ्याच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी जबाबदार आहेत, तत्कालीन सरकारने आमचे केस दाबून टाकली. मला न्याय मिळाला नाही, अर्णब गोस्वामी माझ्या कुटुंबाचा गुन्हेगार आहे त्याला अटक करा असे म्हटले होते.

धक्कादायक…अन्वय नाईक आत्महत्येची फाईल अलिबाग पोलिसांनी केली परस्पर बंद
प्रख्यात वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या तपासाची फाईल अलिबाग पोलिसांनी नाईक कुटुंबाला कोणतीही माहिती न देता परस्पर बंद करून टाकल्याची धक्कादायक माहिती समोरी आली होती. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे ही कैफियत अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी मांडली होती, सरनाईक यांनी गृहमंत्र्यांना याबाबत पत्र लिहून नाईक कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.

पोलिसांना फाईल परस्पर बंद करता येत नाही
अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि अन्य दोघांची नावे असताना अलिबागचे पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी सुरेश वऱ्हाडे आणि पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी अन्वय नाईक यांच्या पत्नीला म्हणजेच फिर्यादीला कोणतीही पूर्वसूचना न देता या केसची फाईल राजकीय दबावापोटी बंद केली. नाईक यांच्या पत्नी अक्षता यांना या प्रकरणामुळे धक्का बसला आहे. अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्यानंतर जोपर्यंत फिर्यादीला कळवून त्यांचा अंतिम जबाब घेतला जात नाही तोपर्यंत फाईल पोलिसांना परस्पर बंद करता येत नाही याकडे सरनाईक यांनी गृहमंत्री देशमुख यांचे लक्ष वेधले होते.