सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्यसेविकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला. आरोग्यसेविकांच्या मागण्यांबाबत येत्या दीड महिन्यात ठोस प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने हा संप मागे घेण्यात आला.
आरोग्यसेविकांच्या मागण्यांबाबत आयुक्त, महापौर, सर्वपक्षीय गटनेते यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर प्रशासनाकडून आरोग्यसेविकांना आश्वासन देण्यात आले. मागण्यांबाबत येत्या एक ते दीड महिन्यात या मागण्यांबाबत ठोस प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबत आयुक्त व सर्वपक्षीय गटनेते, महापौर हे सकारात्मक असल्याचे आश्वासन सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आझाद मैदानात जमलेल्या आरोग्यसेविकांना दिले तसेच संप मागे घेण्याबाबत विनंती केली. त्यानंतर आरोग्य संघटनेतर्फे नेते मिलिंद खारकर, ऍड. विदुला पाटील यांनी आरोग्यसेविकांच्या सहमतीने संप मागे घेण्यात येत असल्याचे आझाद मैदानात जाहीर केले. त्यामुळे आता आरोग्यसेविका उद्यापासून कामाला लागणार आहेत.
आरोग्यसेविकांच्या मागण्या
आरोग्यसेविकांच्या प्रसूती रजा, किमान वेतन देणे, भविष्य निर्वाह निधी, घरभाडे भत्ता, राज्य सरकारचे कामगार कायदे लागू करा, नोकरीवर कायम करा, उपदान आदी मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून आरोग्यसेविकांनी संप पुकारला होता. मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदान न सोडण्याचा निर्णय या आरोग्यसेविकांनी घेतला होता.




























































