दुसऱ्यांचे सीमकार्ड, बेरोजगारांना चुना अन् लाखोची संपत्ती;देवनारमधील भामटा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुसऱ्यांच्या सीमकार्डचा गैरवापर करून अनेकांना नोकरीच्या नावाने आर्थिक चुना लावत लाखो रुपयांची संपत्ती उभी करणाऱया भामटय़ाच्या मानखुर्द पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 12 एटीएम कार्ड, 6 सीमकार्ड, 7 मोबाईल, 2 लाखांची रोकड, लॅपटॉप जप्त केला आहे. साहिम गुलाम रसूल शेख ऊर्फ अब्दुला (22) असे त्या चालबाज आरोपीचे नाव आहे.

कार्यालयीन कामासाठी सीमकार्डची गरज असल्याचे सांगत साहिमने त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडे सीमची मागणी केली. एका सीमसाठी दोन हजार मिळत असल्याचे त्या व्यक्तीने आपल्या आधार कार्डावर टप्याटप्याने सहा सीम साहिमला दिले. त्यानंतरही साहिमने त्या मित्राच्या पत्नीच्या नावाने आणखी सहा सीमकार्ड मिळवले. दरम्यान, त्या नंबरवरून आलेल्या कॉलवरून नोकरीच्या नावाने फसवणूक झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. दाम्पत्याला याबाबत समजल्यानंतर त्यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दाम्पत्याची चौकशी केली असता त्यांनी सर्व हकीगत सांगितली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी, निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, दीपक साळवी, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक साळवी व पथकाने तपास करून आरोपी साहिम गुलाम रसूल शेख याला अटक केली.
दोन वर्षांत लाखोची मालमत्ता

दोन वर्षांपूर्वी साहिमकडे काहीच संपत्ती नव्हती. त्याने पैशाचे आमिष दाखवत या कालावधीमध्ये अनेकांकडून सीमकार्ड मिळवले. मग त्या सीमवरून नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना संपर्क साधून साहिमने त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. या कालावधीत फसवणुकीच्या पैशांतून त्याने लाखोची मालमत्ता खरेदी केली.