
मुंबई हे देशातील सांस्कृतिक केंद्र असून कला महोत्सव, कलादालने, वस्तुसंग्रहालये हे या शहरातील जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहेत. मुंबई आर्ट फेअरच्या तिसऱ्या पर्वात ‘मूर्त-अमूर्त कलासंगम’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नेहरू सेंटरमध्ये 5 ते 7 मेदरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
प्रदर्शनामध्ये प्रस्थापित कलाकारांपासून ते उदयोन्मुख कलाकारांपर्यंत आणि लडाख ते कन्याकुमारीपर्यंतच्या 350 कलाकारांच्या कलाकृती या पाहायला मिळणार आहेत. निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, अॅबस्ट्रक्ट, वास्तवदर्शी चित्रे, शहर चित्र, धार्मिक चित्रांपासून ते वैयक्तिक अनुभूतींपर्यंत विविध शैली व विषयांवरील चित्रे त्यांच्यात सखोल दडलेल्या अर्थासह येथे पाहता येणार आहेत.
निधी शर्मा, प्रकाश बाळ जोशी, नेहा ठाकरे, मोनालिसा पारेख, अंतरा श्रीवास्तव, देव मेहता, कांचन मुळे, ओम थाडकर, लीना माथूर, कांचन महंते, गौतम पाटोळे आदी कलाकार मुंबई आर्ट फेअरमध्ये सहभागी होणार आहेत.
मुंबई आर्ट फेअरमध्ये अप्रतिम चित्र आणि शिल्पांसोबत इतरही अनेक कलाकृती पाहायला मिळतील. महोत्सवातील कलाकारांची उपस्थिती चोखंदळ प्रेक्षक, खरेदीदार आणि संग्राहकांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.






























































