
महाराष्ट्रातील बोटावर मोजण्याइतक्या सुंदर संवर्धन झालेल्या किल्ल्यांमधील एक किल्ला म्हणजे अकलूजचा किल्ला होय.
सोलापूर जिल्हा हा भुईकोट किल्ल्यांचा जिल्हा. तब्बल नऊ भुईकोट किल्ल्यांनी हा जिल्हा समृद्ध आहे, पण आजमितीला यातील बहुतांशी किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूजचा किल्ला पण त्यापैकीच एक होता. मात्र काही वर्षांपूर्वी अडगळीत पडलेल्या या किल्ल्याचा स्थानिक लोकांनी व लोकप्रतिनिधींनी मिळून कायापालट केला. उद्ध्वस्त होत असलेल्या तटबुरुजांची नव्याने डागडुजी करून किल्ल्याला पुनर्जीवन देण्यात आले. महाराष्ट्रातील बोटावर मोजण्याइतक्या सुंदर संवर्धन झालेल्या किल्ल्यांमधील एक किल्ला म्हणजे अकलूजचा किल्ला होय.
अकलूजच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपणास पुणे-इंदापूर-अकलूज असा प्रवास करावा लागतो. नीरा नदीच्या काठावर हा छोटेखानी पण देखणा भुईकोट किल्ला उभा आहे. किल्ला सकाळी 10 ते संध्याकाळी 6.30 पर्यंतच सर्वांना पाहण्यासाठी खुला असतो. माफक प्रवेश फी भरून आपण दोन बुलंद बुरुजांच्या बेचक्यात असलेल्या महादरवाजातून किल्ल्यात प्रवेश करतो. किल्ल्यामध्ये अप्रतिम शिल्पांनी समृद्ध असलेली शिवसृष्टी साकारली आहे. त्याची चुणूक आपल्याला महादरवाजातून प्रवेश करण्याआधीच येते. प्रवेशद्वाराच्या बाहेरील हत्तीवरील माहूत, घोडेस्वार, नगारखान्यावरील भगवा ध्वज, बुरुजावरील गस्त घालणारे सैनिक, तोफा आपल्याला शिवकाळात घेऊन जातात.
या किल्ल्याची निर्मिती शिवकालीन असावी. छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरी जेव्हा पकडले तेव्हा औरंगजेबाचा मुक्काम अकलूजच्या किल्ल्यातच होता. ती बातमी समजताच औरंगजेबाने आनंदाने अकलूजचे नामकरण ‘आसदनगर’ असे केले. उद्ध्वस्त होत चाललेल्या किल्ल्यांना पुनर्वैभव मिळवून देणे हे आपले आद्यकर्तव्य. अकलूजचा किल्ला याचे मूर्तिमंत उदाहरण.
तटबंदीत प्राचीन अवशेष
किल्ल्याच्या आतील शिवसृष्टीचा आनंद घेऊन आपण बाहेरून नदीच्या पात्राकडील तटबुरुजांकडे फेरी मारायची. या किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध करणारे अनेक अवशेष आपणास तटबंदीमध्ये दिसून येतात. दोन अत्यंत सुंदर वीरगळी, समाधीचे अवशेष, शिवलिंग, पुरातन मंदिरांची नानाविध शिल्पे किल्ल्याची नव्याने डागडुजी करताना तटबंदीमध्ये बसवण्यात आली आहेत. नदीच्या पात्रजवळून जाणारी वाट पुढे अकलाई देवीच्या मंदिराकडे जाते. या अकलाई देवीच्या नावावरूनच या गावाचे ‘अकलूज’ असे नामकरण झाले.
समृद्ध शिवसृष्टी
गडप्रवेश करताच गडाच्या मध्यभागी टेहळणीसाठी स्वतंत्र बांधलेला एक बलदंड बुरूज आपले लक्ष वेधून घेतो. आतील मोकळय़ा जागेमध्ये छानशी बाग व कारंजे उभारले आहे. शिवकाळ म्हणजे चित्तथरारक घटनांनी भरलेला काळ. हा विलक्षण काळ या किल्ल्याच्या भिंतींवर शिल्पकलेने अक्षरशः जिवंत उभा केला आहे. शिवजन्म, राज्याभिषेक सोहळासारखी समूह शिल्पे इतकी अप्रतिम जमून आलीत की, आपण त्या सुवर्णक्षणाचे जणू साक्षीदारच आहोत असे वाटते. किल्ल्यातील उजव्या भागात शिवरायांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या शिवनेरी, राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगिरी या किल्ल्यांच्या अप्रतिम प्रतिकृती साकारलेल्या आहेत. आपण ही सर्व शिवसृष्टी काळजीपूर्वक पाहून आपला मोर्चा किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या स्वतंत्र टेहळणी बुरुजाकडे वळवायचा. या दिमाखदार बुरुजावर शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा आहे.
डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक
























































