अवती / भवती- जगण्याचं तत्त्वज्ञान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सुहास मळेकर

खूप लहानपणी काका-मामा परिवार, सहकुटुंब आम्ही एका धार्मिक ठिकाणी दर्शनाला गेलो होतो. पहिला एक दिवस प्रवास आणि त्या संस्थानाच्या रूम्स मिळवण्यात रांगेत गेला. कारण त्यावेळी तिकडे तितकी प्रायव्हेट हॉटेल्स झाली नव्हती आणि तसे राहण्यासाठी ऐपतही नव्हती.

संध्याकाळी उशिरा त्या संस्थानाने भक्तांसाठी बांधलेल्या निवासस्थानात प्रवेश केल्यावर पाहिले, तिथे वाढत्या गर्दीमुळे अनेक गैरसोयी होत्या आणि इतक्या मोठय़ा कुटुंबात एक माणूस तिरसट नसता तरच नवल. त्याने आदळआपट सुरू केली. ‘‘हे असेच का, ते तसेच का? मॅनेजरला झापले पाहिजे’’ म्हणून तो बाहेर पडताना आमच्या वडिलांनी त्याला समजावले.

‘‘अरे, असेही तीर्थक्षेत्री आलोय, चालायचेच. आजचीच तर रात्र इथे काढायची आहे. उद्या सकाळी दर्शनाला बाहेर पडून नंतर फिरायचे आहे. बॅगा घेऊनच बाहेर पडू.’’ तरीपण तो ऐकेनासा झाला आणि वादविवाद वाढले तेव्हा आमच्या वडिलांनी शेवटचे अस्त्र बाहेर काढले. आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या वडिलांनी त्याला ऐकवले ते आमच्या बालमनावर कायम कोरले गेले.

एका ठरावीक संस्कारक्षम वयात काही गोष्टी ऐकल्या की, त्या तुमचा आयुष्यभर पाठपुरावा करतात. मग त्या चांगल्या असो की वाईट. मोठय़ा व्यक्तींच्या सान्निध्यात राहण्याचा हा एक फायदा असतो. असे एखादे तत्त्वज्ञान तुम्हाला आयुष्यभर साथ करते.

एका गावात जेव्हा दोन सख्ख्या भावांमध्ये जमिनीवरून चाललेले वाद ऐकले तेव्हा ती जुनी गोष्ट त्या तत्त्वज्ञानामुळे प्रकर्षाने आठवली. त्या दोन भावांच्या जागेची विभागणी केलेल्या सीमारेषेवर असलेल्या अर्धा-एक फूट रुंदीच्या नाल्यावरून दोघांतला वाद आता तिसऱया पिढीत आला होता. पहिल्या पिढीतील एकाला दुसऱया भावाने रागात कोयता घालून संपवले होते. दुसऱया भावाला मग पुतण्याने संपवले. पुढची पिढीसुद्धा त्या जागेवरून भांडणे, मारामारी करून संपली…आता तिसरी पिढी त्यांच्या दोघांच्या वकिलांची तिसरी पिढी पोसतेय. ‘‘अरे आपण चालतोय तोपर्यंत ठीक आहोत…आडवे झालो की, सगळय़ाची मातीच तर होणार आहे.’’ हे ते वडिलांनी सहज सांगितलेले तत्त्वज्ञान.

‘‘माझे इतके, मला एवढेच पाहिजे’’ म्हणून आयुष्यभर भांडणारा भाऊ दुसऱया समंजस भावाकडून जिवाचा आटापिटा करून संपत्ती ओरबाडून घेतो आणि तो गेल्यावर ती ओस पडलेली संपत्ती व ती परिस्थिती अधिक केविलवाणी दिसते. माणसाला जमीन किती, त्याच्या आकाराएवढी. तेवढय़ा जागेतही टिकाव धरता येत नाही, त्याचीही मातीच होते. जेव्हा केव्हा हे असेच पाहिजे, तसेच पाहिजे यावरून वाद होताना पाहतो तेव्हा तेव्हा ते तत्त्वज्ञान आठवते. एखादे रोपटे मातीतून उगवून वर येते आणि त्याचा कालावधी संपताच सुकून पुन्हा तिथेच मातीत बेमालूमपणे मिसळून जाते हे तर तेच जीवनसार सांगते.

नाटकांत तुम्हाला दिग्दर्शकाने दिलेले पात्र रंगवा आणि निमूटपणे एक्झिट घ्या.’ इतके सोपे तरी रंगतदार जगणे जमले तर किती बहार येईल, पण ते कठीण असते. परवा रस्त्याच्या बाजूने फुटपाथवरून चाललो असताना एका असहाय्य समवयस्क भिकाऱयाने हात पसरला आणि केविलवाणा चेहरा करून म्हणाला, ‘‘शेठ!’’ ‘‘कसला शेठ रे? काही वर्षांनी दोघेही इथेच मातीत मिसळून जाऊ,’’ असे पटकन ओठांवर आले. अर्थात आपसूकच हात खिशात जाऊन वीस रुपये बाहेर पडले ते त्याच्या हातांवर ठेवले आणि बस स्टॉपवर उभा राहून बसची वाट पाहू लागलो.