आभाळमाया – लाल महातारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक 

मध्यम वयाचा आपला सूर्य आणखी पाच अब्ज वर्षे तळपत राहणार आहे. त्यानंतर त्याचे (काही काळ आधीच) लाल तप्त ताऱ्यात रूपांतर होईल. असे लाल महातारे (किंवा रेड जायन्टस्) म्हणजे त्यांच्या गाभ्यातलं इंधन संपत आल्याची लक्षणे दाखवणारे तारे असतात. त्यांच्या गाभ्यातील शक्तीचा ताबा सुटायला लागला की, हे तारे त्यातील द्रव्य सांभाळू शकत नाहीत आणि ते सुजल्यासारखे वाढायला लागतात. ही त्यांची अंतःकाळाची अवस्था असते. विराट विश्वातील तारे आणि महाकाय दीर्घिकाही केव्हातरी अस्त पावतील आणि विश्वात उरेल फक्त एक अमर्याद पोकळी.

आताचा विषय अशा मृत्युपंथाला लागलेल्या आणि आपल्याला सहज दिसणाऱ्या ‘लालसर’ ताऱ्यांबद्दल. मृग या तारकासमूहाचं कुतूहल आपल्याकडे फार प्राचीन काळापासून आहे आणि तसंच त्याचं देखणेपणही आहेच. खेडोपाडय़ांत ‘खाटलं-बाजलं’ म्हटला जाणारा किंवा उडत्या हरिणासारखा दिसणारा (म्हणूनच) ‘मृग’ तारकासमूह किती वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यासंदर्भात आपण पूर्वी वाचलंय. मृग नक्षत्राला पूर्वी ‘अग्रहायण’ म्हटलं जायचं आणि लोकमान्य टिळकांनी याच नक्षत्रावरून कालगणना ठरवणारा ‘ओरायन’ हा इंग्रजी ग्रंथ लिहिला होता.

…तर अशा या मृग तारकासमूहातला ‘बिटेल ज्युज’ किंवा काक्षी हा आपल्यापासून सुमारे 430 प्रकाशवर्षे अंतरावर असलेला लाल महातारा (रेड जायन्ट) आहे. त्याचा कोणत्याही क्षणी विस्फोट होऊ शकतो. त्यावेळी त्याचं तेज एकदम वाढेल आणि त्याचं सुपरनोव्हात रूपांतर झालेलं पाहायला मिळेल. सन 1054 मध्ये पॅब नेब्युलात असा विस्फोट झाला, तेव्हा कित्येक रात्री सूर्यप्रकाश पडल्यासारख्या उजळल्या होत्या अशी नोंद चिनी निरीक्षकांनी केली. तो जुलै महिना असल्याने मेघाच्छादित हिंदुस्थानात त्यावेळी हा तेजस्वी आविष्कार दिसला नसावा म्हणून त्याची नोंद नाही.

अगदी याक्षणी काक्षीचं ते उग्र रूप पहायला मिळालं तर असं समजायचं की, 428 वर्षांपूर्वी त्याचा विस्फोट झालाय. कारण तिथले प्रकाशकिरण आपल्यापर्यंत यायला एवढा काळ लागणार आहे आणि आताच तिथे विस्फोट झाला असेल तर तो 428 वर्षांनी दिसेल. म्हणजे आपण जे चमचमणारं तारांगण आज पाहतो ते आपल्यासाठी ताजं असलं तरी प्रत्यक्षात ‘शिळं’ असतं! हे सगळं अब्जावधी किलोमीटरच्या प्रचंड अंतरांमुळे घडतं. ‘ताजं’, ‘शिळं’विषयी गमतीचं आपण पुन्हा एखाद्या लेखात पाहू.

 या काक्षी ताऱ्याचा व्यास आपल्या सूर्याच्या साडेपाचशे पट आहे. आपल्या सूर्याच्या व्यासरेषेवर 1 हजार 100 पृथ्वी सामावू शकतात. त्याला 550 ने गुणल्यावर केवढा आकार होईल कल्पना करा. हे अंतर सुमारे 77 कोटी किलोमीटर एवढं भरतं आणि पृथ्वीचा व्यास आहे फक्त 12 हजार 800 किलोमीटर! काक्षी तारा समजा सूर्याच्या जागेवर ठेवला तर तो पार गुरू ग्रहाच्या कक्षेपलीकडे जाईल. हा मृत्युपंथाला लागलेला तारा असल्याने तो कमी प्रतीचा असताना त्याचा व्यास 550 कि.मी., तर उच्च प्रतीचा असताना तो वाढून सूर्याच्या 920 पट म्हणजे सुमारे दीड अब्ज किलोमीटर एवढा होतो. इतकं सगळं अद्भुत वाटणाऱ्या काक्षीच्या अस्तित्वाचं आणखी महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे त्याचं वस्तुमान सूर्याच्या केवळ 20 पटच आहे. त्यामुळे त्याची घनता सूर्यापेक्षा खूपच कमी आहे. 5 अब्ज वर्षांनी सूर्याचा लाल महातारा होईल तेव्हा त्याचं वस्तुमानही आकारमानाच्या तुलनेत अतिशय विरळ झालेलं असेल. म्हणून अशा ताऱ्यांना ‘लाल-उष्ण’, परंतु ‘निर्वात पोकळी’ (रेड हॉट व्हॅक्यूम) असं म्हटलं जातं.

आता असा अगदी ठळकपणे नजरेत भरणारा किंवा केव्हाही विस्फोट होऊ शकणारा महत्त्वाचा तारा म्हणजे वृश्चिक राशीतील ‘ज्येष्ठा’चा तारा. या राशीत अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ ही तीन नक्षत्रं विंचवाच्या आकारात सामावलेली आहेत म्हणून ती ‘वृश्चिक’ रास, तर अनुराधाच्या तीन स्पष्ट ताऱ्यांखाली कंठमण्यासारखा ‘ज्येष्ठा’चा लाल तारा अतिशय सुंदर दिसतो. त्याचं इंग्लिश नाव ‘अॅस्टेरस’. तो मंगळ ग्रहाप्रमाणे लालसर आहे. मंगळाच्या रंगाशी स्पर्धा करणारा म्हणून त्याचं ग्रीक नाव अॅन्टेरस किंवा प्रतिस्पर्धी असं झालं.

आपल्यापासून 604 प्रकाशवर्षे अंतरावरचा ‘ज्येष्ठा’ सूर्याच्या 700 पट मोठा आहे. त्याचा व्यास सूर्याच्या सुमारे 100 पट असून वस्तुमान मात्र (तो अखेरच्या टप्प्यात असल्याने) सूर्याच्या केवळ 15 पटच आहे. काक्षीपेक्षा याचा व्यास थोडा कमी असून तो सूर्याच्या जागी आणला तर पृथ्वीसह मंगळापर्यंतची जागा व्यापेल. आपला सूर्यही आणखी चार अब्ज वर्षांनंतर हळूहळू तितकाच प्रसरण पावेल व शेवटी त्याचा श्वेतखुजा होईल.

सारथी किंवा भूतप तारकासमूहामधला स्वाती किंवा आर्क्टरस हा ताराही नारिंगी रंगाचा असून तोसुद्धा दुर्बिणीतून सुंदर दिसतो. सूर्याच्या 27 पट व्यासाचा हा तारा जरूर पहा. असाच एक सहज दिसणारा नारंगी तारा म्हणजे वृषभ राशीतील रोहिणी नक्षत्राचा. इंग्लिशमध्ये त्याला (खरं तर अरेबिक नावाने) ‘अल् देबेरान’ असं म्हणतात. अवकाशाच्या शुभ्र रांगोळीतील हे लाल रंगाचे ‘ठिपके’ न्याहाळणं किती आनंददायी असतं  त्याचा कधीतरी अनुभव घ्या.

[email protected]