
>> विवेक दिगंबर वैद्य
विसाव्या शतकाच्या मध्यावर अध्यात्माची वेगळी ओळख सांगू पाहणाऱया श्रीनित्यानंदस्वामी यांच्याविषयीचा हा लेख.
सन 1897. नोव्हेंबर महिन्याचा तिसावा दिवस. केरळ प्रांतातील कोझिकोडे तालुक्याच्या बडगेरा गावामध्ये घडलेला हा प्रसंग. थंडीचा कडाका जोर धरू लागला होता. पहाट सरायला आणि उन्हं उगवायला अंमळ उशीरच होता. उजेड फटफटू लागण्याआधी स्नान उरकून घ्यावे या विचाराने उमाअम्मा गावाबाहेर असलेल्या तलावाच्या दिशेने निघाली. पायवाट नजरेला ओळखू येण्याइतपत दिसत होती. रस्ता नित्य परिचयाचा आणि वाट पावलांच्या ओळखीची असल्याने झपझप अंतर कापीत उमाअम्मा पाण्यात शिरली. पहाटेच्या थंडीत अंगाला झोंबणाऱया थंडगार पाण्याने सचैल स्नान करून अम्माने तिच्या अंगावरचे लुगडे जवळच्याच दगडावर बसून धुतले. नेसूचे लुगडे बदलण्यासाठी ती वळणार एवढय़ात तिचे लक्ष समोरच्या काठावर गेले आणि तिच्या काळजाचा थरकाप उडाला, मनांत भीतीने चर्र झाले.
तलावाच्या शांत पाण्यातून हळुवार पुढे सरकणाऱया झाडाच्या एका फांदीवर कसलीशी हालचाल होत असल्याचे तिच्या नजरेस पडले. काय असावे तिथे? कुणी पाणसर्प की एखादे जंगली श्वापद? उमाअम्मा धीर एकवटून काठावर बसून राहिली. थोडय़ा वेळाने उजाडले. तोवर ती फांदी अम्मापासून दूर अंतरावर वाहत गेली होती. उमाअम्माने पुढे जाऊन पाहिले तेव्हा त्या फांदीच्या आडून दोन चिमुकले हात हालचाल करीत असल्याचे तिला जाणवले. सावधपणे तिथवर जाताच उमाअम्माला फांदीवर पानांची गादी पसरवून त्यावर नुकतेच जन्मलेले बाळ कुणीतरी ठेवलेले आहे असे जाणवले. हे कुणाचे बाळ आहे? त्याला पाण्याच्या प्रवाहात कुणी सोडले असेल? ही भुताटकी तर नाही ना? अशा शंका उमाअम्माच्या मनात उभ्या राहिल्या. मात्र त्यांचे निराकरणदेखील तिच्यातील मातृहृदयाने परस्परच केले. अम्माने ते बाळ उचलले, छातीशी धरले आणि वेगाने ती काठावर येऊन पोहोचली. मातृहृदयाची धडधड आणि अवचितपणे लाभलेली मातृत्वाची ऊब मिळताच बाळ हालचाल करू लागले आणि विश्वासाने उमाअम्माच्या कुशीत स्थिरावले. लगबगीने पावले उचलत, गाव जागे होण्याआधी उमाअम्मा घरी पोहोचली. दरवाजा उघडून आत शिरताच घरातील दारिद्रय़ाच्या काळोखीने व्यापलेला भवताल तिला उदास करता झाला. अंथरुणाला खिळलेला आजारी नवरा झोपलेला होता. अम्माने तिचे जुनेपुराणे लुगडे जमिनीवर अंथरले आणि त्यावर बाळाला ठेवले. काळेसावळे आणि टपोऱया डोळ्यांचे ते बालक अवतीभवती टकामका पाहू लागले. त्याच्या येण्याने घरावरची उदासवाणी छटा लोपणार आणि सर्वत्र आनंद पसरणार असा विचार मनात येताच उमाअम्माला हसू आले.
दिवसांमागून दिवस सरले. ग्रामस्थांच्या शंकाकुशंकांना सराईतपणे टोलवत उमाअम्माने बाळाला व्यवस्थित वाढवले. ‘बडगेरा’गावच्या कुट्टी कुटुंबातील या नव्या पाहुण्याचे नाव रामन कुट्टी असे ठेवण्यात आले. रामन तीनेक वर्षांचा झाला तोवर उमाअम्माचा आजारी नवरा स्वर्गवासी झाला. बाळाचे संगोपन आणि स्वतःचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा या हेतूने अम्मा ‘बडगेरा’ जवळच्या ‘कोयलांडी’ गावी ईश्वर अय्यर नामक वकिलाच्या घरी काम करू लागली. ईश्वरअण्णा मनाने स्वच्छ, प्रामाणिक, अध्यात्मवादी आणि प्रखर सूर्योपासक होते. त्यांच्या घरात तीन वर्षे काम केल्यानंतर एके दिवशी उमाअम्मा स्वर्गवासी झाली आणि रामन कुट्टी पुन्हा एकदा ‘पोरका’ झाला.
ईश्वर अय्यर यांनी रामनला त्यांच्याच घरी कायमस्वरूपी आश्रय दिला. रामन कुट्टी विद्याभ्यासात हुशार होता, शिवाय तो योगाभ्यासातही आवड राखून होता. नित्यनेमाने योगसाधना तसेच जपजाप्य करणे, पाण्याच्या तळाशी पद्मासन घालून ध्यानधारणा करणे यामध्ये त्याला विशेष गती प्राप्त झाली. घरातील सर्व कामेदेखील तो मनापासून करीत असे. ईश्वरअण्णांसोबत सकाळी उठून तो सूर्योपासनाही करू लागला. त्याची झपाटय़ाने होणारी प्रगती पाहून ईश्वरअण्णा यांचा रामनविषयीचा लोभ वाढता झाला. अण्णा प्रसिद्ध वकील असल्याने त्यांच्याकडे अशिलांची नित्य गर्दी असे. अनेकदा तिथे बसलेला रामन अण्णांना कायद्याची योग्य कलमेदेखील सुचवित असे. इतकेच नव्हे तर खून किंवा चोरीच्या खटल्यांतील व्यक्ती माहिती देण्यास टाळाटाळ करू लागली तर रामन त्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला प्रसंग खडान्खडा सांगत असे. रामनमधील या अद्भुत शक्तीचा प्रत्यय हळूहळू कोयलांडी गावातील प्रत्येकाला येत गेला.
आठवे वर्ष सरले. वयाने जाणता झालेला रामन जवळच्या ‘बडगेरा’ गावातील शिवानंदस्वामींकडे जाऊ लागला. तिथे त्यास अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. ईश्वरअण्णांना अनेकदा रामनमधील योगबल तसेच सिद्धीचा प्रत्यय येत असे. एकदा एका लबाड गारुडय़ाने चार पैसे कमविण्याच्या लोभापायी त्याच्या पोतडीतील बरेचसे सर्प अय्यर यांच्या घरात सोडले. घरात सर्वत्र सर्प दिसू लागल्याने अय्यर कुटुंब घाबरले. काही वेळाने तो गारुडी साळसूदपणे अय्यर यांच्या घरी आला आणि ‘‘तुम्ही मला दोनशे रुपये दिले तर मी सर्व सर्प गोळा करून येथून जाईन आणि तुम्हाला भयमुक्त करेन’’ असे सांगता झाला. अय्यर यांनी सौदा मान्य केला. मात्र रामन यास ‘सत्य’ ठाऊक होते. त्याने सिद्धीच्या बळावर सर्प गायब केले. गारुडी घरभर फिरला. मात्र त्याच्या नजरेला एकही सर्प दिसला नाही. बराच शोध घेतल्यानंतर आपले पैसेही गेले आणि सर्पही गेले हे लक्षात येताच गारुडी चरफडत निघून गेला. रामनकडून सत्य परिस्थिती समजताच ईश्वरअण्णांना नवल वाटले. अशातच एके दिवशी अण्णांना भेटावयास आलेल्या एका नामांकित ज्योतिष्याने रामन कुट्टी हा साक्षात ईश्वरी अवतार आहे असे भाकीत वर्तविल्यामुळे ईश्वरअण्णा अधिकच प्रभावित झाले. त्यांनी रामनला सोबत घेऊन तीर्थयात्रेला जाण्याचे ठरविले.
केरळ प्रांतातील प्राचीन देवालये तसेच पुढे गोकर्ण महाबळेश्वर, प्रयाग, त्रिवेणी-संगम, हरिद्वार, हृषीकेश, अयोध्या अशी तीर्थे व क्षेत्रे पार करीत ते बुद्धगयेला येऊन पोहोचले. तेथील प्राचीन बोधीवृक्षाच्या छायेत ते दोघे बसले असताना रामनला एकाएकी सहजसमाधी प्राप्त झाली. हा समाधीसुखाचा अनुभव रामनकरिता अलौकिक व अवर्णनीय होता. भानावर येताच त्याने ईश्वरअण्णांना आपण येथेच राहून तपश्चर्या करणार असल्याचे सांगितले. बोधीवृक्षाच्या सान्निध्यात तपश्चर्या करण्याची रामनची इच्छा ईश्वरअण्णांनी मान्य केली आणि जड अंतःकरणाने त्यास निरोप देऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले. रामनच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा ‘क्षण’ त्यास प्राप्त झाला त्यामागे तसेच रामनचे आयुष्य मार्गाला लागावे यासाठी ईश्वरअण्णा अय्यर यांचे सहकार्य जसे मौलिक आहे त्याचप्रमाणे बोधीवृक्षाच्या छायेत आत्मज्ञान प्राप्त झालेल्या रामन कुट्टीचा ‘श्रीनित्यानंदस्वामी’ होण्याचा विलक्षण प्रवास जाणून घेणेदेखील उत्कंठावर्धक आहे.
(पूर्वार्ध)
[email protected]





























































