सावली कुठे गेली?

202

>> दा. कृ. सोमण, खगोलतज्ञ

आपली सावली आपली निरंतर सोबत करत असते. पण काही दिवसांतील काही क्षण असे असतात की पायाखालची सावलीही आपली साथ सोडून जाते… काय असतो हा क्षण. येत्या आठ-दहा दिवसांत महाराष्ट्रात जागोजागी हा शून्य सावलीचा प्रत्यय येणार आहे.

आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही असं म्हटलं जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘ शून्य सावलीचा दिवस ‘ असे म्हटले जाते. आज आपण या शून्य सावलीचे रहस्य जाणून घेणार आहोत. शून्य सावलीचा हा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्क वृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त यामधील प्रदेशातूनच घेता येऊ शकतो.

निरभ्र आकाशात सूर्य असतांना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्यावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असतांना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी कमी कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जातांना दिसते. वर्षातील दोन दिवस वगळता भर दुपारीही सूर्य आकाशात नेमका आपल्या डोक्यावर न आल्याने भर दुपारीही आपली थोडीतरी सावली दिसतच असते. वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आकाशात आपल्या डोक्यावर आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्यामुळे आपणास ती दिसू शकत नाही. s या ठराविक दिवशीच आपणास शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.

शून्य सावलीचे रहस्य समजून घेतांना आपणास लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये शिकलेला भूगोल परत आठवावा लागेल. पाच प्रमुख वृत्ते आहेत. (1) आर्क्टिकवृत्त – ज्याच्या पलिकडील उत्तरेकडील भागातून मध्यरात्रीचा सूर्य दिसू शकतो. (2) कर्कवृत्त – हे विषुवृत्त्ताच्या 23 अंश, 26 कला, 22 विकला ( सुमारे साडेतेवीस अंश ) उत्तरेकडे आहे. याच्या उत्तरेकडील प्रदेशातील आकाशात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. हिंदुस्थानातील गुजरात, राजस्थान , मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम , छत्तीसगड , त्रिपुरा व झारखंड या राज्यातून कर्कवृत्त जाते. (3) विषुववृत्त (4) मकरवृत्त – हे विषुववृत्ताच्या 23 अंश, 26 कला, 22 विकला (सुमारे साडेतेवीस अंश) दक्षिणेकडे आहे. याच्या दक्षिणेकडील प्रदेशातील आकाशात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. (5) अंटार्क्टिकवृत्त- याच्या दक्षिणेकडील भागातून मध्यरात्रीचा सूर्य दिसतो. आपण उत्तर गोलार्धात राहतो. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशानी कललेला आहे. सूर्य 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दोनच दिवस विषुववृत्तापाशी येतो. 21 जूनला तो जास्तीतजास्त उत्तरेकडे कर्कवृत्तापाशी दिसतो. तर 22 डिसेंबरला सूर्य जास्तीतजास्त दक्षिणेकडे मकरवृत्तापाशी दिसतो. तारका व ग्रह वैषविक वृत्ताच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे असतात. तारका व ग्रह यांच्या या कोनात्मक अंतराला ‘ क्रांती ‘ म्हणतात. मुंबईपरिसराचे उत्तर अक्षांश सुमारे 19 अंश आहेत. सूर्याची क्रांती ज्यादिवशी उत्तर 19 अंश होईल त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर दिसेल. वर्षातून असा सूर्य दोनदा बरोबर डोक्यावर दिसतो. त्यामुळे या दिवशी माध्यान्हाला सूर्य डोक्यावर आल्यावर आपली सावली बरोबर पायाखाली आल्यामुळे दिसू शकत नाही म्हणून या दिवसाना ‘ शून्य सावलीचा दिवस ‘ म्हणतात. मे महिन्यात आकाश निरभ्र असल्याने ‘शून्य सावली’ आपणास अनुभवता येते. पण दुसरा दिवस जुलै महिन्यात पावसाळ्यात येत असल्याने शून्य सावलीचा अनुभव घेता येत नाही.

आपल्या घराच्या खिडकीतून येणार्या सूर्य किरणांची जागा कशी बदलते? सूर्य पूर्व क्षितिजावर एकाच ठिकाणी का उगवत नाही? ऋतूंमध्ये बदल कसा होतो? पृथ्वीचा अक्ष जर साडेतेवीस अंशानी कललेला नसता तर काय झाले असते? इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायला हवा. मूलभूत संशोधन करण्याची गोडी लहान वयातच विद्यार्थ्यांना लावली गेली पाहिजे. तरच हिंदुस्थानात उद्यांचे शास्त्रज्ञ निर्माण होतील.

करावयाचे प्रयोग
शून्य सावली दिसण्याच्या दिवशी सकाळी 11 वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायला सुरुवात करावी. पुठ्याचे एक जाड नळकांडे तयार करून उन्हांत ठेवावे. किंवा एक जाड काठी उन्हात उभी करून ठेवावी. तिच्या सावलीचे निरीक्षण करावे. काठीच्या सावलीची लांबी कमीकमी होत जाईल. ठीक 12 वाजून 35 मिनिटांनी सूर्य आकाशात डोक्यावर आला म्हणजे सावली काठीच्या मुळाशी आल्यामुळे अदृश्य होईल. नंतर पुन्हा काठीची सावली लांब लांब होत जाईल. मुलांच्य एका गटाने उन्हात गोलाकार उभे राहून एकमेकांचे हात धरून कडे करावे. नंतर सावलीचे निरीक्षण करावे. आकाशात सूर्य डोक्यावर आल्यानंतर सुंदर दृश्य दिसेल. याचा उंचावरून फोटो घेता येईल. शून्य सावलीचे निरीक्षण करण्याची संधी आपणास महाराष्ट्रात मिळू शकते. कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशातून हा अनुभव घेता येणारच नाही. कारण त्या प्रदेशातून सूर्य आकाशात डोक्यावर आलेला दिसतच नाही. तसेच मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील भागातून हे दृश्य अनुभवता येणारच नाही. सूर्याकडे कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये .त्यासाठी ग्रहणचष्म्याचा वापर करावा. शून्य सावलीचा अनुभव घेतांना सूर्याकडे पाहण्याचा प्रश्नच नसतो.

शून्य सावलीच्या दिवशी दुपारी आकाशात सूर्य ठीक डोक्यावर आल्यावर उन्हात उभे राहून सर्वांनी आपली सावली अदृश्य कशी होते याचा नक्कीच अनुभव घ्यावा . निसर्गातील हे रहस्य समजून घेतल्यामुळे नक्कीच आपण आनंदाचे साक्षीदार होऊ शकाल.. निसर्गात चमत्कार नावाची गोष्टच नसते. प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक कारण असते. आपण या गोष्टींमागचा कार्यकारणभाव समजून घेणे जरूरीचे असते. यामुळे मनातील अंधश्रद्धा कमी होऊन मग आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करू लागतो. आपणास तशी संवयच होऊन जाते.

शून्य सावलीचे दिवस
महाराष्ट्रातील काही ठिकाणचे शून्य सावलीचे दिवस येथे देत आहोत.
रत्नागिरी 11 मे
सातारा, सोलापूर 12 मे
उस्मानाबाद 13 मे
रायगड, पुणे, लातूर 14 मे
अंबेजोगाई, केज 15 मे
मुंबई, नगर, परभणी, नांदेड 16 मे
ठाणे, बोरिवली, डोंबिवली,
कल्याण, पैठण 17 मे
संभाजीनगर , जालना, हिंगोली,
चंद्रपूर 19 मे
नाशिक, वाशीम, गडचिरोली 20 मे
बुलढाणा, यवतमाळ 21 मे
वर्धा 22 मे
धुळे, अकोला, अमरावती 23 मे
भुसावळ , जळगांव, नागपूर 24 मे
नंदुरबार 25 मे या दिवशी शून्य सावली योग आहे.

मुंबईत ही वेळ दुपारी 12 वाजून 35 मिनिटांची आहे. त्यावेळी सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येईल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या