>> अरविंद दोडे
हिंदुस्थानात डावी चळवळ संसदीय पातळीवर प्रथम प्रभाव पडला तो 1957 मधील निवडणुकीत. केरळ राज्यात तिला यश मिळाले. तेव्हापासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा हळूहळू हिंदुस्थानभर पसरत गेला. टक्केवारी कमी असली तरी विरोधी पक्ष म्हणून सतत चर्चेत राहिला. त्याच्या समांतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून हा पक्षही कार्यरत राहिला. दोन्ही पक्षांच्या देशात सुमारे एक लाख तीस हजार शाखा आहेत. 1925 पासून या देशात उदय पावलेल्या या पक्षाची वाटचाल लेखकाने विस्तारपूर्वक दिलेली आहे. भाकप आणि माकपच्या चढउतारांचा वैचारिक आलेख पाहताना डाव्या पक्षांच्या गर्दीत असंसदीय राजकारण करणारा एक डावा प्रवाह आहे. त्याला म्हणतात माओवादी किंवा नक्षलवादी.
1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे पतन झाले तरी डाव्यांची सदस्य संख्या वाढत गेल्याचे दिसते. पश्चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यांतही वर्षानुवर्षे डाव्यांची सत्ता अबाधित राहिल्याचे दिसते. त्यांची सांस्कृतिक सखोल गुंतवणूक, त्यांची शक्तिस्थाने, आंतरराष्ट्रीय धोरणविषयक साधकबाधक चर्चा, त्यांची अगतिकता आणि पीछेहाट अशा अनेक घटकांचा इतिहास हा एकंदर उताराचा असल्याने व्यूहनीतीविषयक चौकटीच्या शोधात अनेक वर्षे इतिहासजमा झाली आहेत.
राष्ट्रीय राजकारणात आगेकूच करताना ते इतरांकडून काही शिकले नाहीत हे लेखक सोदाहरण पटवून देतो. पश्चिम बंगालात सुमारे 34 वर्षे (1977 पासून) सत्ता भोगण्याचा डाव्यांनी (जागतिक) विक्रम केला. पात्र भुकेकंगाल समाजाला ते शांतता आणि सुव्यवस्था देण्यात यशस्वी ठरले का याचाही परखडपणे ऊहापोह केलेला आहे.
केरळची कथा मात्र शैक्षणिक पातळीवर पाहिल्यास नजरेत भरते. भुक्कड आणि बिनडोक राजकारण्यांचा ग्रंथवाचनाशी सुतराम संबंध नसल्याचे दिसते. साक्षरतेकडून निरक्षरतेकडे सुरू झालेला हा पक्षप्रवास कसा आहे याचा लेखाजोखाही वाचायला मिळतो. अनुवादक चंपानेरकरांनी एका अवघड विषयाचा सांधा, सरळ केलेला अभ्यास आणि ‘रोहन’च्या टीमचा हा प्रयत्न सुरेख आहे.
भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा
अनुवादक – मिलिंद चंपानेरकर
प्रकाशक – रोहन प्रकाशन, पुणे
पृष्ठ – 510, किंमत – 595 रुपये


























































