लेख – गाझामधील भूमिगत भुयारांचे जाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

इस्रायलच्या गाझावरील जमिनी हल्ल्याला यश मिळण्यामध्ये आणि हमासला पूर्णपणे बरबाद करण्यात गाझा पट्टीतील भुयारे हा सर्वात मोठा अडथळा आहे. शहरातील आणि भुयारांमधील ही लढाई कोण केव्हा जिंकेल हे केवळ येणारा काळच सांगू शकतो. गाझामधील लष्करी मोहिमेचा पल्ला फक्त 25 मैलांचा (40 किमी) आहे, तरीही त्याचे परिणाम काय होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सद्यःस्थितीत गाझामध्ये इस्रायलने जमिनीवरून आक्रमण करण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही, हेदेखील खरे आहे.

इस्रायलने गाझामध्ये राहणाऱया पॅलेस्टिनींना दक्षिणेतून पळून जाण्याचा दिलेला इशारा हा त्यांच्या लष्करी कारवाईचा पुढील टप्पा जवळ येत असल्याचा संकेत आहे. स्वतःचा प्रदेश सुरक्षित करणे हे इस्रायलसमोरील पहिले आव्हान आहे आणि हमासच्या हल्लेखोरांना मारणे किंवा पकडणे हे दुसरे. इस्रायल अनेक वर्षांपासून या लढाईची तयारी करतोय. मिनी-गाझा म्हणून ओळखल्या जाणाऱया दक्षिणेकडील लाखो-कोटी डॉलर्सच्या शहरी युद्ध केंद्रात ते सैन्याला प्रशिक्षण देतात. तिथे त्यांना दाटीवाटीने बांधलेल्या इमारती आणि भुयारांच्या चक्रव्यूहांचा सामना करत कसे लढायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. कारण हमासने 1000 हून अधिक इमारती आणि भुयारे बांधली आहेत.
हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून हमास वापरत असलेली गाझातील भुयारे लक्ष्य केली जात आहेत. ‘गाझाच्या पहिल्या थरावर भूपृष्ठावर सामान्य नागरिक राहतात. त्याच्याखाली दुसरा थर भूमिगत आहे, जो हमास वापरतो. सध्या इस्रायली लष्कर गाझामधील जमिनीखालच्या थराला लक्ष्य करत आहे.’ ही सामान्य लोकांसाठी बांधलेले बंकर किंवा भुयारे नाहीत. ती फक्त हमास आणि इतर दहशतवादी संघटनांसाठी आहेत, जेणेकरून ते इस्रायली रॉकेटपासून वाचू शकतील व इस्रायलवर हल्ले सुरू ठेवतील.

गाझामधील भुयारांच्या नेटवर्कच्या विस्ताराचा अंदाज बांधणे कठीण आहे. असे मानले जाते की, ही भुयारे संपूर्ण गाझामध्ये पसरली आहेत. 2021 मध्ये झालेल्या संघर्षानंतर इस्रायली लष्कराने गाझामध्ये पसरलेली 100 किमी लांबीची भुयारे नष्ट केल्याचे सांगितले होते. पण हमासने दावा केला होता की, त्यांनी गाझामध्ये 500 किमी लांबीची भुयारे बांधली आहेत आणि इस्रायलच्या हल्ल्यात फक्त 5 टक्के भुयारे उद्ध्वस्त झाली होती.

2005 मध्ये इस्रायली सैन्याने आणि ज्यू स्थानिकांनी गाझामधून माघार घेतली. त्यानंतर तिथे भुयारे बांधण्याचे काम सुरू झाले. दोन वर्षांनंतर हमासने गाझावर ताबा मिळवला आणि त्यानंतर भुयारांचे जाळे मोठय़ा प्रमाणावर विस्तारू लागले. हमास सत्तेवर येताच, इस्रायल आणि इजिप्तने त्यांच्या सीमारेषेवरून वस्तू आणि लोकांच्या येण्या-जाण्यावर बंधने आणली. म्हणून हमासने भुयारांवर लक्ष केंद्रित करून तस्करी करणे सुरू केले. एकेकाळी गाझाखाली सुमारे 2,500 भुयारे होती. या भुयारांमधूनच हमास आणि इतर कट्टरतावादी संघटनांना वस्तू, इंधन आणि शस्त्र मिळायची, पण 2010 मध्ये इस्रायलने इजिप्तच्या सीमारेषेवर घातलेली बंधने कमी केल्यावर ही तस्करी कमी होऊ लागली. नंतर हमास आणि इतर संघटनांनी इस्रायली सैन्यावर हल्ला करण्यासाठी गाझामध्ये भुयारे बांधली.

सीमापार करण्याकरिता भुयारे अतिशय मूलभूत असतात. त्यांच्यासाठी कोणतीही तटबंदी नसते आणि इस्रायली सैनिकांवर हल्ला करणे हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु गाझाच्या आत असलेल्या भुयारांचा उद्देश वेगळा आहे. हमासला तिथे दीर्घकाळ राहायचंय. त्यामध्ये वेगवेगळय़ा प्रकारच्या उपाययोजना केलेल्या असतात जेणेकरून तिथे दैनंदिन आयुष्य जगता येईल. तिथे त्यांचे नेते लपून बसतात. त्यांची कमांड ऍण्ड कंट्रोल सिस्टीमही तिथेच आहे. वाहतुकीशिवाय, कम्युनिकेशनसाठीही या भुयारांचा वापर केला जातो. त्यामध्ये वीज, लाईट ही सोय आहे. भुयारे खोदण्यात हमासने नैपुण्य मिळवले आहे. ही कला ते सीरियातील बंडखोर हल्लेखोरांकडून शिकले. गाझामधील भुयारे जमिनीपासून 30 मीटर खाली असावीत आणि त्यात घरांच्या तळघरांमधून, मशिदी, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणांहूनही प्रवेश करता येतो. इस्रायलचा आरोप आहे की, हमासने गाझामधील लोकांना मदत करण्यासाठी दिलेली कोटय़वधींची आंतरराष्ट्रीय मदत भुयारे तयार करण्याकरिता वापरली आहे. आता झालेल्या हमासच्या हल्ल्यात यापैकी काही भुयारांचा वापर झाला असण्याची शक्यता आहे. काफर आझा येथे एक भुयार सापडले होते, जिथे डझनभर इस्रायली नागरिक मारले गेले.

इस्रायलने 2021 मध्ये भुयारे डिटेक्शन सेन्सर बनवले, मात्र अनेक भुयारे इस्रायलने बनवलेल्या भूमिगत अँटी-टनल डिटेक्शन सेन्सर्सपेक्षा खोल आहेत. अनेक भुयारे सेन्सरने पूर्णपणे डिटेक्शन केली जाऊ शकत नाही. “सर्वसामान्यांना माहीत नसणारी अनेक भुयारे आहेत. भुयारे उद्ध्वस्त करताना सर्वसामान्य नागरिकांचा जीवही जाणार आहे. यामध्ये इस्रायली सैनिकांचाही समावेश असू शकतो. हल्ला होणार आहे हे लक्षात येताच हमास सामान्य जनतेची ढाल म्हणून वापर करेल. याच कारणास्तव इस्रायलला अनेकदा हल्ले थांबवावे लागलेत. ‘हमास यावेळी इस्रायली आणि अमेरिकन ओलिसांचा ढाल म्हणून वापर करू शकतो.

भुयारांच्या नेटवर्कमुळे इस्रायली लष्कराच्या तंत्रज्ञानाची आणि गुप्तचर यंत्रणेची ताकदही अपुरी पडत आहे. या बोगद्यांच्या नेटवर्कमध्ये दारूगोळा भरण्यासाठी हमासला खूप वेळ मिळाला आहे. ते इस्रायली सैनिकांना बोगद्यात घुसायला देऊन स्फोट घडवून आणण्याची पूर्ण शक्यता आहे. हमास अचानक हल्ला करून इस्रायली सैनिकांचे अपहरणदेखील करू शकतो. इस्रायलच्या गाझावरील जमिनी हल्ल्याला यश मिळण्यामध्ये आणि हमासला पूर्णपणे बरबाद करण्यासाठी गाझा पट्टीतील भुयारे हा सर्वात मोठा अडथळा आहे. शहरातील आणि भुयारांमधील लढाईमध्ये दोन्ही बाजूंना पुष्कळ नुकसान सहन करावे लागेल आणि ही लढाई कोण केव्हा जिंकेल हे केवळ येणारा काळच सांगू शकतो. अर्थात निर्णायक लष्करी कारवाईमुळे या प्रदेशातील इस्रायलचे इतर शत्रू म्हणजेच हिजबुल्लाह आणि इराण यांनादेखील रोखणे शक्य होईल. हमासकडे कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची लष्करी क्षमता राहणार नाही याची खातरजमा केली जाईल. त्यांना विरोध करणाऱया वीस लाख लोकांच्या सुरक्षेचीसुद्धा काळजी घ्यावी लागेल. गाझामधील लष्करी मोहिमेचा पल्ला फक्त 25 मैलांचा (40 किमी) आहे, तरीही त्याचे परिणाम काय होतील हे स्पष्ट झालेले नाही. मात्र सध्यस्थितीत गाझामध्ये इस्रायलने जमिनीवरून आक्रमण करण्याशिवाय दुसरा कोणताच चांगला पर्याय नाही, हेदेखील खरे आहे.