तालिबान : पाकिस्तानला फायदा की तोटा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

तालिबानच्या विजयानंतर पाकिस्तानी राज्यकर्ते फारच आनंदित झाले आहेत. त्यांच्या मते हा पाकिस्तानी कूटनीतीचा एक विजय आहे, पण त्यांना इतिहासाचा आणि वर्तमानाचा विसर पडला आहे. तालिबानमुळे पाकिस्तानला नुकसान जास्त आणि फायदे कमी आहेत. पाकिस्तान आता अफगाणिस्तान नावाच्या अत्यंत खोल विवरामध्ये फसला आहे. त्यामुळे तालिबानचा अफगाणिस्तानमधील प्रवेश हा पुढील भीषण भविष्याची नांदी ठरू शकतो!

तेहरिक-ए-तालिबान (टीटीपी) म्हणजेच पाकिस्तानी तालिबानच्या मुद्दय़ावर अफगाण तालिबानने स्पष्टपणे म्हटले आहे की, टीटीपी पाकिस्तानची समस्या आहे, आमची नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच टीटीपीचा सामना करावा. तालिबानचे म्हणणे आहे की, टीटीपीला सामोरे जाण्यासाठी पाकिस्तान कोणती रणनीती स्वीकारतो त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. जर टीटीपीने अफगाणिस्तानच्या तालिबानला आपला नेता म्हणून स्वीकारले तर त्यालाही त्याचे पालन करावे लागेल. तालिबानचे हे विधान पाकिस्तानच्या तोंडावर थप्पड मारण्यासारखे आहे.

टीटीपी हा पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळील आदिवासी भागातून उदयास आलेल्या अतिरेकी गटांचा समूह आहे. जरी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या विचारसरणीमध्ये साम्य असले, तरी पाकिस्तानी तालिबानी अफगाणिस्तानातील तालिबानपेक्षा वेगळे आहेत. पाकिस्तानमध्ये शरियावर आधारित कट्टरपंथी इस्लामी अमिरातची स्थापना हे त्यांचे ध्येय आहे. डिसेंबर 2007 मध्ये बयातुल्ला मेहसूदच्या नेतृत्वाखाली 13 गटांनी तेहरिकमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता.

अफगाणिस्तानची सुमारे 42 टक्के, तर पाकिस्तानची 15 टक्के लोकसंख्या पश्तुन किंवा पठाण आहे. पश्तुन प्रांत पाकिस्तानचा सुमारे एक पंचमांश भाग आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना विभागणारी डुरँड रेषा पश्तुनना मान्य नाही. पाकिस्तानचे त्यांच्या पश्तुन भागावर पूर्ण नियंत्रण नाही. अफगाणिस्तान-पाकमधील पश्तुन लोकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य घोषित करू नये, याबाबत पाकिस्तान पूर्वी यशस्वी झाले असले, तरी त्याला मर्यादा आहेत.

अफगाणिस्तानबरोबरील पाकिस्तानची सीमारेषा-(डय़ुरँड लाइन) ब्रिटिशांची देण होती. त्याने पाकिस्तान अफगाणिस्तानच्या संबंधांत कायमची समस्या निर्माण केली. अफगाणिस्तानमधून हिंसाचारामुळे मोठय़ा प्रमाणावर पश्तूनांचे पलायन पाकिस्तानच्या सीमावर्ती शिबिरांत झाले, ज्यात हजारो अफगाणी शरणार्थी राहात आहेत. ‘टीटीपी’ या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या सरकारला धमकी दिली आहे की, त्यांनी ‘डय़ुरँड लाइन’ नष्ट करून अफगाणिस्तान आणि खैबरपख्तुनख्वा हा पठाणबहुल प्रांत अफगाणिस्तानात मुकाटय़ाने विलीन करावा, नाहीतर पाकिस्तानचे तुकडे होतील.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची जी निर्मिती पाकिस्तानने केली. याच तालिबानने ‘टीटीपी’ पाकिस्तानला प्रेरणा दिली. आता पाकिस्तानला अफगाणिस्तानातील अस्थिरता आणि वाढत्या हिंसेचे परिणाम भोगावे लागत आहेत. आता टीटीपीचे पुनःआगमन होत आहे. देवबंदी कट्टरतावादी संघटना ‘टीटीपी’ पाकिस्तान व अफगाणिस्तान तालिबान यांची समान विचारधारा आहे. मात्र टीटीपी पाकिस्तान सरकारचा सर्वात मोठा शत्रू आहे, ते पुन्हा एकदा दक्षिण आणि उत्तर वजिरीस्तानात आपली शक्ती वाढवत आहेत.

2014 मध्ये पाकिस्तानी लष्कराने चालवलेल्या दहशतवादविरोधी अभियानामुळे ‘टीटीपी’चे अनेक कमांडर अफगाणिस्तानात पळून गेले. आता अफगाणिस्तानमधील स्थिती त्यांना अनुकूल झाल्यामुळे ते पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया सुरू करत आहेत. गेल्या महिन्यातच पाकिस्तानी तालिबानने पाकिस्तानमधील चिनी गुंतवणूक, आपले विरोधी आणि पाकिस्तानी सुरक्षा दलाविरोधात हिंसाचार सुरू केला. जुलै 2021 मध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात सीपेक मार्गावर काम करणाऱया नऊ चिनी नागरिकांसह 13 जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये चिनी गुंतवणूकही धोक्यात येऊ शकते, जी सध्या पाकिस्तानकरिता आर्थिक सहाय्यतेचा एकमेव स्रोत आहे. ‘एफएटीएफ’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये सामील पाकिस्तान अनेक निर्बंधांशी झगडत आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारमुळे ‘टीटीपी’ला बळकटी मिळाली आहे. अफगाणिस्तानमध्ये कट्टर अफगाण इस्लामींच्या उदयाने पाकिस्तानमध्ये कट्टरपंथीयांना प्रोत्साहन मिळत आहे.

अफगाणिस्तान हा एक अनेक टोळ्यांचा/अदिवासींचा देश आहे आणि त्या टोळ्या आपसात लढतात. त्यामुळे देशात कायम अस्थिरता असते. पाकिस्तानदेखील अस्थिर आहे. तिथे पंजाबी, सिंधी, पठाण आणि बलुच या समुदायांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. इस्लाम धर्म त्यांना बांधून ठेवू शकत नाही. म्हणूनच सरकारला सदैव लष्कराची मदत घ्यावी लागते. पाक लष्कर मुख्यत्वेकरून पंजाबी आहे आणि ते इतर समुदायांवर प्रचंड दडपशाही लादतात. बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा इथे बलुच आणि पठाण नागरिकांवर सैन्याकडून अत्याचार केले जातात. त्यामुळे दोन्ही प्रांतात ‘बलोच नॅशनल आर्मी’ (बीएनए) आणि ‘टीटीपी पाकिस्तान’ या दोन्ही संघटना दहशतवादाचा वापर करून पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांच्या विरुद्ध कारवाया करतात. पेशावर येथे 2014 साली 140 मुलांना ‘टीटीपी’ने मारले होते. दोन्ही तालिबानचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे ‘शरिया’ कायद्याचा कठोर अवलंब करून इस्लामी शासन आणणे, तसेच खैबर पख्तुनख्वा या पाकिस्तानच्या पठाणबहुल प्रांताला अफगाणिस्तानमध्ये विलीन करणे.

आता तालिबानने काबूलमध्ये तेथील तुरुंगात असलेले 1,100 कैदी मुक्त केले, जे ‘टीटीपी’चे दहशतवादी आहेत! असे असूनदेखील पाकिस्तानी सरकार तालिबानने अफगाणिस्तान जिंकल्याचा जल्लोष करीत आहे. हे एक आत्मघाती पाऊल आहे. तालिबानचा राष्ट्रपती मुल्ला बरादर याला पाकिस्तानचे मुळीच प्रेम नाही. तो 2010 ते 2018 मध्ये पाकिस्तानच्या तुरुंगात होता!

तालिबानला पाकिस्तानची आता जराही गरज उरली नाही. उलट पाकिस्तान विघटनाची प्रक्रिया आता थांबवणे फार कठीण जाईल. सध्या ग्वादर बंदरावर ‘सीपेक’ मार्गावर बलोच बंडखोरांचे हल्ले सतत चालू आहेत. खैबर पख्तुनख्वानंतर बलुचिस्तानचा नंबर लागणार आहे. सिंध प्रांतात फुटीरतावादी चळवळ जोरात आहे. कराचीत पठाण, स्थानिक सिंधी समाज आणि हिंदुस्थानातून गेलेला मुस्लिम समाज (मोहाजिर) यांच्यात हिंसाचार, भांडणे, चकमकी चालूच असतात. आता अफगाणिस्तानातील अस्थिर परिस्थितीमुळे हजारो नवीन पठाण निर्वासित जगण्यासाठी कराचीत येतील. एकूणच पाकिस्तानच्या विघटनाची प्रक्रिया आता अधिक जोमाने सुरू होत आहे.