शोध सत्याचा : नवसाये पुत्र न होती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रसेन टिळेकर

कुणाच्या तरी आशीर्वादाने, संत-महंतांच्या मंत्राने किंवा एखाद्या जागृत देवस्थानच्या देवाला, देवीला नवस बोलण्याने मूल होते, संतती प्राप्त होते यावर आपल्या समाजात गाढ श्रद्धा आहे. वास्तविक ‘नवस’ ही संकल्पनाच मूलतः अनैतिक आहे. कुणाला तरी काहीतरी दिल्याशिवाय तो आपले काम करणार नाही अशी समाजाची मनोधारणा बदलली पाहिजे.

मुंबईहून माझ्या देहू गावाला एशियाडने जात होतो. हातात नुकताच बाहेर पडलेला आचार्य अत्रे कट्टय़ाचा विशेषांक होता. तो वाचत असताना माझ्या लक्षात आले की, शेजारच्या सीटवरील तरुणी सारखी त्या अंकात डोकावतेय. न राहवून मी तिला म्हणालो, ‘‘आपल्याला वाचायचाय का हा अंक?’’ तसे ती म्हणाली, ‘‘तसे नाही, पण कुठे असतो हो कट्टा? पेपरात अधूनमधून वाचते मी.’’
‘‘अनेक ठिकाणी असतो…पार्ले, ठाणे, बोरिवली इत्यादी. का हो?’’
‘‘तिथे म्हणे कोणालाही कोणत्याही विषयावर बोलता येतं.’’
‘‘हो, खरे आहे ते. तो उपक्रम लंडनच्या हाईड पार्कच्या धर्तीवर उभारला आहे. तुम्हाला बोलायचेय की काय तिथे?’’
‘‘हो, जरा बोलायचे होते.’’
‘‘कोणत्या विषयावर?’’
तशा त्या काही काळ स्तब्धच झाल्या. शेवटी मीच त्यांना म्हणालो,
‘‘मॅडम, तुम्ही अजिबात संकोच करू नका, बिनधास्त बोला. कारण तुम्ही त्या कट्टय़ाच्या संस्थापकाशीच बोलत आहात.’’
तसं त्यांना काहीसं हायसं वाटलं आणि त्या म्हणाल्या, ‘‘मी डॉ. स्वाती भोसले. स्त्र्ााrरोगतज्ञ आहे. कुर्ल्याच्या भरवस्तीत माझा दवाखाना आहे, पण तो आता नाइलाजाने बंद करावा लागतोय. वडिलांनी पुण्यात धनकवडी इथे दवाखान्यासाठी दुसरी जागा पाहिलीय, तीच पाहायला मी चाललेय.’’
‘‘मॅडम, आपण म्हणालात की, आपला दवाखाना कुर्ल्यात आहे, परंतु तो नाइलाजाने बंद करावा लागतोय, पण का बरे?’’
पुन्हा काही काळ त्या विचारात पडल्यासारख्या झाल्या, पण शेवटी त्यांनी अवसान गोळा करून मला जी त्यांची कर्मकहाणी सांगितली ती ऐकून मी अवाकच झालो. खरे तर त्यांनी सांगितलेले अविश्वसनीय वाटावे असेच ते होते.
थोडक्यात त्यांची कर्मकथा अशी होती की, काही महिन्यांपूर्वी त्यांच्या दवाखान्यात तीन बायका आपल्या गरोदरपणाची तपासणी करण्यासाठी आल्या होत्या. डॉ. स्वाती भोसले यांनी त्यांना तपासले, पण त्यांना मोठे आश्चर्य वाटले की, त्या तिघीही स्त्रीया गरोदर नव्हत्या. डॉक्टर बाईंनी त्यांना स्पष्ट सांगितले की, तुमचा काहीतरी भ्रम होतोय की, तुम्ही गरोदर आहात.तुम्ही गरोदर आहात म्हणून तुम्हाला कोणी सांगितले? सुरुवातीस प्रत्येकीने सांगायला टाळाटाळ केली.
डॉ. स्वाती भोसले यांनी काहीसे खडसावून विचारल्यावर, मात्र त्या स्त्र्ायांनी जे सांगितले ते ऐकून स्वाती मॅडम काय, पण कोणीही आपल्या कपाळावर हात मारून घेईल. त्या बायकांनी स्वाती मॅडमना सांगितले की, मूल होत नाही म्हणून कोणीतरी त्यांना राजकोटच्या पार्वतीमातेचे नाव सांगितले होते आणि तिच्या आशीर्वादाने आणि ती देत असलेल्या तीर्थाने शेकडो स्त्र्ायांना मूल झाल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून त्या स्त्र्ाया ‘पार्वती माँ’चा आशीर्वाद घ्यायला राजकोटला गेल्या होत्या. भरपूर दक्षिणा देऊन आणि तिने दिलेली तीर्थाची बाटली घेऊन त्या परत आल्या होत्या. ते तीर्थ त्या रोज प्राशन करीत होत्या. काही दिवसांनी गरोदर स्त्र्ााrमध्ये जी लक्षणे दिसतात, ती त्यांच्या ठायी दिसायला लागली असे वाटून त्या पुढील उपचारांसाठी डॉ. स्वाती भोसले यांच्याकडे आल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांचा भ्रम खोडून काढल्यावर त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी डॉक्टर बाईंच्या ज्ञानाचाच त्यांना संशय यायला लागला. शेवटी डॉ. स्वाती भोसले यांनी ‘‘दिवस गेल्याबरोबर माझ्याकडे तपासणीसाठी का नाही आलात?’’ असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, आम्हाला ‘पार्वती माँ’ने सक्त ताकीद दिली होती की, गरोदरपणात कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन चाचपणी, उपचार वगैरे करून घ्यायचे नाहीत. कारण असे केल्याने मंत्राचा प्रभाव निष्फळ होईल आणि गर्भ नाहीसा होईल.
डॉ. स्वाती भोसले यांनी कशीबशी त्या बायकांपासून सुटका करून घेतली, पण पुढे त्यांच्यावर काय संकट येणार आहे याची मुळीच त्यांना कल्पना नव्हती.
झाले असे की, नाराज झालेल्या त्या बायका आपल्या वस्तीत गेल्या आणि त्यांनी प्रपोगंडा केला की, या स्वाती डॉक्टरीण बाई कुमारिका आहेत. त्यांना गरोदरपणातलं काही कळत नाही. त्यांच्याकडे कुणा बाईने जाऊ नये. याचा दुष्परिणाम व्हायचा तोच झाला तो म्हणजे हळूहळू डॉ. स्वाती भोसले यांच्या दवाखान्याकडे बायका येण्याचे थांबल्या आणि त्यांच्यावर माश्या मारीत बसण्याची वेळ आली.
खरं तर राजकोटच्या त्या ‘पार्वती माँ’च्या विरोधात वृत्तपत्रांतून लिहूनही आले होते. त्याची काहीही कल्पना त्या बायकांना नसावी.
डॉ. स्वाती भोसल्यांची कर्मकहाणी संपल्यावर मी त्यांना म्हणालो,
‘‘All said and done madam, पण अत्रे कट्टय़ावर कशासाठी यायचेय तुम्हाला?’’
‘‘हेच महाभारत अन् रामायण तुम्हाला सांगितले ना, ते सांगायला. तुमच्या कट्टय़ावर लेडीज असतात ना?’’
‘‘असतात ना, अहो पण मॅडम तिथे असले काही सांगण्याची गरज नाही, सगळा सुशिक्षित अन् पांढरपेशा वर्ग तिथे असतो, उगाच वेळ फुकट जाईल.’’
‘‘चुकताय तुम्ही, अहो माझ्याकडे ज्या तीन बायका आल्या होत्या ना, त्यातल्या दोघी माध्यमिक शिक्षिका होत्या.’’
हे ऐकल्यावर माझी तर मतीच पुंठीत झाली. शेवटी मी त्यांना सांगितले की, दर शनिवारी पार्ल्याच्या स्वा. सावरकर उद्यानात संध्याकाळी साडेपाच वाजता अत्रे कट्टा भरतो. पुण्यावरून आल्यावर जरूर या आणि आपला अनुभव सांगा. पुण्याहून परतल्यावर डॉ. स्वाती भोसले खरोखरच पार्ल्याच्या कट्टय़ावर आल्या आणि त्यांनी आपला अनुभव सांगितला, पण कित्येकांना तो अविश्वसनीय वाटल्याची शक्यता नाकारता येणार नाही. कुणाच्या तरी आशीर्वादाने, संत-महंतांच्या मंत्राने किंवा एखाद्या जागृत देवस्थानच्या देवाला, देवीला नवस बोलण्याने मूल होते, संतती प्राप्त होते यावर आपल्या समाजात गाढ श्रद्धा आहे.
वास्तविक ‘नवस’ ही संकल्पनाच मूलतः अनैतिक आहे. कुणाला तरी काहीतरी दिल्याशिवाय तो आपले काम करणार नाही अशी समाजाची मनोधारणा त्यामुळे होते. दुसऱया शब्दांत सांगायचे तर ‘नवस’ कल्पना किंवा श्रद्धा हे लाचलुचपतीचे उगमस्थान आहे. म्हणूनच ‘आमचा देव नवसाला पावतो’ असा प्रचार करण्यावर बंदी आणली पाहिजे. किंबहुना ‘नवस’ हा शब्दच आपल्या शब्दकोशातून नष्ट झाला पाहिजे.
[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडीत आहेत)