
>> धनंजय साठे
मी आणि माझ्या बहिणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये आईबरोबर बंगळुरूवरून मुंबईला यायचो. तेव्हा ठरलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे वांद्रे (पू.) इथल्या ‘साहित्य सहवासा’त जाणं ठरलेलं असायचं. माझ्या आईची काकी म्हणजे डॉ. विजया राजाध्यक्ष, मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांचं योगदान आजही अबाधित आहे.
फ क्त दर्जा मिळवून भाषा अभिजात होत नाही… मनाला भिडणारं मराठी लिहा…” हे उद्गार आहेत सुप्रसिद्ध लेखिका, एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या प्रोफेसर, एक प्रगल्भ साहित्यिका, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या, पीएचडी पदवी घेऊन मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष या विद्वान साहित्यिकाची सहचारिणी आणि मुक्ता, निरंजन व राधाची आई… इतक्या विविध भूमिका समर्थपणे निभावणारी माझ्या आईची काकी, डॉ. विजया राजाध्यक्ष!
1933 मध्ये विजया आपटे यांचा जन्म झाला. पुढे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मराठी साहित्य हा विषय शिकवणाऱया विजयाबाई एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी पद भूषवलं.
1993 मध्ये ’मर्ढेकरांच्या कविता.. स्वरूप आणि संदर्भ’ या अलौकिक पुस्तकासाठी साहित्य क्षेत्रातल्या मानाच्या समजल्या जाणाऱया ‘साहित्य अकादमी पुरस्कारा’ने विजयाबाईंना सन्मानित केले गेले. 2001 साली इंदूरमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे प्रतिनिधित्व डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी केले होते. 2019 साली विजयाबाईंना ’विंदा करंदीकर जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले गेले. विजयाबाईंचे पती म. वि. राजाध्यक्ष यांचे स्वतचे इतके उत्तुंग व्यक्तिमत्त्व असूनही त्यांनी आपल्या पत्नीला दिलेली साथ वाखाणण्याजोगी आहे.
मी आणि माझ्या बहिणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये आईबरोबर बंगलुरूवरून मुंबईला यायचो. तेव्हा ठरलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे वांद्रे (पू.) इथल्या ‘साहित्य सहवासा’त जाणं ठरलेलं असायचं. विजयाबाई माझ्या आईची काकी असल्यामुळे आमच्यासाठी पण त्या विजयाकाकीच आहेत. त्यांचं नाव आमच्या रोजच्या घरगुती गप्पांमध्ये नेहमीच असायचं. आम्ही जेव्हा विजयाकाकींकडे जायचो तेव्हा आम्हाला म्हणजे मी, माझ्या बहिणी आणि माझा मावसभाऊ… आम्हाला सक्त ताकीद असायची आईची, मोठय़ा आवाजात बोलणं, मस्ती वगैरे अजिबात करायची नाही. त्यामुळे आजही त्यांच्याकडे गेलो तरी संयम, शिस्त पाळली गेलीच पाहिजे हे कायम डोक्यात असतं. विजयाबाईंकडचं जेवण म्हणजे एक पर्वणीच असायची. अहाहा… आजही त्या पदार्थांच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटतं. काळ्या वाटाण्याची आमटी, मटकीची उसळ, फोडणीचं वरण, भरलेले पापलेट, सुरमई आणि कोलंबीचे लोणचं… केवळ अविस्मरणीय! आमच्याकडे बंगलुरूला जेव्हा जेव्हा राजाध्यक्ष दांपत्य यायचे तेव्हा आम्हा मुलांचे भरपूर लाड पुरवायचे. मोडक्या तोडक्या कन्नड भाषा बोलायचे, पण त्यांचा तो तेव्हाचा प्रयत्न आज मागे वळून पाहताना कौतुकास्पद वाटतो. माझ्या आईचेही नाव विजया. तिला वाचनाची प्रचंड आवड होती. वरचेवर विजयाकाकींशी वाचलेल्या पुस्तकावर चर्चा चालायची. कानावर आलेल्या दोन्ही विजयांच्या चर्चेतून मलाही अनेक गोष्टींशी ओळख झाली. मराठी साहित्य कळायला लागलं.
विजयाकाकींच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबाने एका आगळय़ावेगळय़ा कार्पामाचं आयोजन केलं होतं. त्यांचे निकटवर्तीय, त्यांच्या मैत्रिणी व त्यांच्या शिकवणीच्या काळातले विद्यार्थी यांनी डॉ. विजया राजाध्यक्ष यांना पत्राद्वारे वंदना लिहून पाठवली होती. त्या गोड आठवणींना यानिमित्ताने आज उजाळा मिळाला. दूरदर्शनवरची ‘प्रतिभा आणि प्रतिमा’मधलं विजयाबाईंचं निवेदन स्मृतीआड जाणं केवळ अशक्य! आजही त्यांच्या काही विद्यार्थिनी माझ्या संपर्कात आहेत. विजयाबाईंची मराठीची शिकवण तर त्या कधीच विसरू शकत नाहीत हे त्या मान्य करतात, परंतु विजयाबाईंच्या डोळ्यांवर येणारी ती केसांची बट अजूनही आणि सदैव त्यांच्या जवळच्या व्यक्तींसाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला एक अविभाज्य भागच बनून राहिला आहे.
अशा या प्रतिभावान, सर्वगुणसंपन्न आणि महाराष्ट्राचं गौरव ठरलेल्या या बुद्धिमान व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा.
कथाकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्य़ा, गेली सहा दशकं अविरतपणे लेखन करणाऱया ज्येष्ठ साहित्यिक विजया राज्याध्यक्ष यांची प्रामुख्याने ओळख आहे ती कथालेखिका आणि समीक्षक म्हणून. 1965 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अधांतर’ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे तब्बल 19 कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांचे ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ , ‘बहुपेडी विंदा (चरित्र-आत्मचरित्र समीक्षा)’, ‘आहे मनोहर तरी : वाचन आणि विवेचन’ हे समीक्षापर लेखन प्रसिद्ध आहे. याशिवाय ‘अन्वयार्थ’, ‘दोनच रंग’, ‘अनोळखी’, ‘जास्वंद’, ‘चैतन्याचे ऊन’, ‘समांतर कथा’ हे कथासंग्रहही आहेत.
(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)





























































