मनतरंग – हे बंध रेशमाचे

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

लग्न जमवताना किंवा जोडीदार शोधताना सर्वप्रथम स्वतःचा शोध घेणं गरजेचं असतं. ही पायरी नीट पार पडली की जोडीदाराबद्दल विचार करता येऊ शकतो. इथे ‘स्पष्ट संवाद’ अपेक्षित असतो आणि तो आपोआप घडत जातो. फक्त गरज असते ती ‘विश्वासाची.’ हा विश्वास आपल्याला मानसिकदृष्टय़ा खंबीर बनवतोच. शिवाय आपल्याला नकळत सकारात्मकही बनवत जातो.

सुजय आणि रिमाच्या (दोघांची नावे बदलली आहेत) लग्नाला आता तीन वर्षे होत आलेली होती, पण तरीही दोघांमध्ये सहजीवन असं सुरू झालेलं नव्हतं. दोघांमध्येही भांडणं, वादविवाद एखाद्या क्षुल्लक कारणावरून सुरू होतं आणि दिवसेंदिवस त्या दोघांमध्ये अबोला राहत असे. दोघंही नोकरी करत असल्यामुळे तसेही बिझीच असायचे. रिमाची नोकरी तेवढी ताणाची नव्हती. मात्र सुजय आर्ट पंपनीत असल्याने तो बऱयाचदा कामातच गढलेला असायचा.

रिमा आणि सुजय ही तशी पाहता दोन टोपं होती. ‘ती’ अतिशय बोलकी, लोकांमध्ये पटकन मिसळणारी अशी होती, तर सुजय तिच्या विरुद्ध म्हणजे काहीसा अबोल आणि भीडस्त अशा स्वभावाचा होता. त्यामुळे घरीसुद्धा दोघांचं बोलणं तसं कमीच आणि एकतर्फी असायचं. रिमा बोलायची, सगळय़ा गोष्टी ठरवायची. सुजयला नोकरीच्या व्यापामुळे इतरत्र बघायला वेळ मिळत नसे. रिमाला आता या सर्व गोष्टी खटकायला लागल्या होत्या.

तिला आता सुजयबरोबर राहण्याची इच्छा राहिली नव्हती आणि सुजयलाही तिचे तोंड पाहण्याची! तशातच एक दिवस त्यांचं कडाक्याचं भांडण झालं. तसं पाहता त्या भांडणाला एक निमित्त झालं. रिमाला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बाहेर कुठेतरी फिरायला जायचं होतं. त्यासाठी तिने एक छोटी टूर प्लॅन केली. सुजयला घरीच राहायचं होतं. रिमाचा हे ऐकल्यावर मूडच निघून गेला. ती भयंकर उदास झाली आणि भावनेच्या भरात त्याला नको नको ते बोलून गेली. झालं! भांडय़ाला भांडं लागलं आणि त्याचा वणवा इतका पेटला की, सुजयने तिच्या कानशिलातच लगावली.

‘‘मला घटस्फोट हवाय’’ रिमाने समुपदेशनाचं कारण सांगितलं आणि ‘‘मला कधी कधी पळून जायची इच्छा होते’’ हेही नमूद केलं. सुजय बाहेर शांतपणे हाताची घडी घालून बसला होता. रिमाचं बोलणं झाल्यावर त्याला आत बोलवण्यात आलं तेव्हा त्यानेही तिच्यावर रागाच्या भरात हात उचलल्याचं कबूल केलं. ‘‘मी कालही तिची माफी मागितली आणि आताही तुमच्यासमोर तिची माफी मागतो. रिमा, आय अॅम रिअली सॉरी, पण तू काल जे बडबडलीस त्यामुळे मला त्या गोष्टी सहन नाही झाल्या.’’ रिमालाही त्यावेळी रडू आलं.

‘‘तू खरंच इतका टोकाचा विचार करते आहेस का?’’ असं विचारल्यावर ती शांत झाली. ‘‘मी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, पण मलाही फीलिंग्स आहेत. तू हल्ली इतका निरस आणि आळशी होत चालला आहेस की, सगळय़ासाठी तुला सांगावं लागतं. फक्त तुझ्या नोकरीत तू असतोस. बाकी लाइफ नाहीये तुला. सदान्कदा नोकरीचं कारण काढून माझ्याबरोबर वेळ घालवण्याचं टाळत असतोस. यावेळी तर हाइटच झाली! तू आपली ऑनिव्हर्सरी टाळलीस.’’ तिला मध्येच थांबवत सुजय पटकन म्हणाला, ‘‘तू वेडी आहेस का? मी टाळत नव्हतो. मला फक्त त्या दिवशी विश्रांती घ्यायची होती. रात्री बाहेर जाऊ शकलो असतो.’’ ‘‘अरे पण बुकिंग…’’ तिला मध्येच तोडत तो ओरडला ‘‘ते मॅनेज झालं नसतं का? दिवसाऐवजी रात्री गेलो नसतो का?’’

यावर रिमा पटकन शांत झाली आणि विचारात पडली. तिला अचानक अपराधी वाटायला लागलं होतं. सुजयही शांत बसून राहिला.

दोघांच्याही चेहऱयावर थकल्याचे भाव होते. समुपदेशनाला आता निश्चित दिशा मिळाली होती. दोघांमधील छोटय़ा मोठय़ा खटक्यांचे कारण त्यांच्यामधला असणारा ‘विसंवाद’ (कम्युनिकेशन गॅप) हा होता. त्यामुळे दोघांमध्ये समज-गैरसमज वाढलेले होते आणि त्यांचं नातं हे तणावपूर्ण झालेलं होतं.

माझ्याकडे येणाऱ्या जवळपास सर्वच जोडप्यांमध्ये ही समस्या आहे. एकाला बोलायचं असतं एक आणि त्याच्या बोलण्याचा अर्थ त्याचा जोडीदार वेगळा (बऱयाच वेळेस तिरका) काढतो. मग त्यामधून होणारे ताणतणाव इतके वाढतात की, त्यामुळे वैवाहिक नातं संपुष्टात येण्याची शक्यता वाढते.

या अशा तणावपूर्ण नात्यांची मीमांसा करायची झाली तर बरीच कारणे सापडतील. ती म्हणजे,

स्वतःच्या स्वतःबद्दल असणाऱया अपेक्षांबाबत गोंधळ असणे
जोडीदाराबद्दल अवास्तविक अपेक्षा ठेवणे
एकमेकांना गृहीत धरणे
जोडीदारावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणे
एकमेकांचा अनादर करणे
नात्यामध्ये असलेली अपारदर्शकता

या आणि अशा बऱयाच खासगी गोष्टींचा प्रभाव वैवाहिक जीवनावर पडत असतो. या सर्वांचा परिणाम जोडप्यांच्या लैंगिक जीवनावर होऊन गोष्टी अजूनच चिघळत जातात.
म्हणूनच लग्न जमवताना किंवा जोडीदार शोधताना सर्वप्रथम स्वतःचा शोध घेणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. कारण स्वतःला स्वतःची ओळख म्हणजेच गरजा, इच्छा आणि अपेक्षा यांबाबत स्पष्टता असणं आवश्यक आहे. यालाच ‘आत्मपरीक्षण’ असं म्हटलं जातं.

एकदा का ही पायरी पार झाली तर आपल्याला पुढील पायरीवर म्हणजेच जोडीदाराबद्दल विचार करता येऊ शकतो. इथे ‘स्पष्ट संवाद’ अपेक्षित असतो आणि तो आपोआप घडत जातो. फक्त गरज असते ती ‘विश्वासाची.’ हा विश्वास आपल्याला मानसिकदृष्टय़ा खंबीर बनवतोच. शिवाय आपल्याला नकळत सकारात्मकही बनवत जातो. ही संथ आणि आजीवन चालणारी प्रक्रिया असते.

या गोष्टी सुजय आणि रिमाला समुपदेशन प्रक्रियेत समजत गेल्या आणि ते दोघं मनानं आणखी जवळ आले. रिमा आता बरीचशी शांत झाली होती. सुजयनेही स्वतःच्या आतल्या आत दाबून ठेवलेल्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तो योग्य पद्धतीने बाहेर काढण्यासाठी काही अधिकची सत्रे घेतली. तसंच घर आणि नोकरीची सांगड कशी घालायची हे त्याला ‘वेळेच्या व्यवस्थापना’द्वारे समजवण्यात आले. तो आता स्वतःसाठी आणि रिमासाठीही वेळ काढायला लागला. दोघांनाही ‘क्वॉलिटी टाइम’ची संकल्पना समजावण्यात आली. रिमा नियमितपणे योगाभ्यास करू लागली आणि दोघांची अळीमिळी गुपचिळी संपून गेली.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]