
>> डॉ. मुकुंद काळे
लोकरहाटीत पहिला मान नेहमीच देवाला आणि दुसरा मान भुताला दिला जातो. लोकमानसात देवाबद्दल जेवढी श्रद्धा असते, तेवढीच भुताबद्दल अपरंपार भीती असते. या भीतीवरचा उपाय म्हणून लोकमानस मग देवांबरोबर भुतांनाही दर महिन्याला किंवा वर्षातून एकदा त्यांचा मान, राखण, त्यांचा बळी नित्यनेमाने देत असत. जेणेकरून देवाप्रमाणेच भुतानेही कोपू नये. लोकमानसात सालोसाल चालत आलेला हा लोकव्यवहार आजही अनागर संस्कृतीत अनेक ठिकाणी सुरू आहे.
गेलं वर्षभर आपण लोकसंस्कृतीतील विविध घटकांचा, पैलूंचा मागोवा घेतला. आज या सदरातील शेवटचा लेख लिहिताना लोकमानसाने आपल्या विशिष्ट गरजेतून निर्माण केलेल्या देवा-भुतांची आठवण जागवू या आणि निरोप घेऊ या!
लोकरहाटीत पहिला मान नेहमीच देवाला आणि दुसरा मान भुताला दिला जातो. कारण पहिली शक्ती कल्याणकारी असते, तर दुसरी अकल्याणकारी. मात्र या दोन्ही शक्ती परस्परांच्या विरुद्ध काम करत असल्या तरी त्यांची वाटचाल हातात हात घालूनच सुरू असते. त्यामुळेच तारक व मारक अशा देवांना आणि भुतांना लोकमानस सारखंच भजतं. किंबहुना यामुळेच देवाचं मंदिर असतं, तिथेच भुताचा वड असतो. गावाच्या वेशीवर राखणदार असतो, तिथेच पारावरचा मुंजा असतो आणि नदीच्या बाजूला एखाद्या लोकदेवाची कडेकपार असते, तिथेच बाजूला ग्रिह्या डोह असतो. लोकमानसात देवाबद्दल जेवढी श्रद्धा असते, तेवढीच भुताबद्दल अपरंपार भीती असते. या भीतीवरचा उपाय म्हणून लोकमानस मग देवांबरोबर भुतांनाही दर महिन्याला किंवा वर्षातून एकदा त्यांचा मान, राखण, त्यांचा बळी नित्यनेमाने देत असत. जेणेकरून देवाप्रमाणेच भुतानेही कोपू नये. लोकमानसात सालोसाल चालत आलेला हा लोकव्यवहार आजही अनागर संस्कृतीत अनेक ठिकाणी सुरू आहे. शिक्षणाने तसंच शहरांतील सुधारणांचा वारा लागल्याने खेडीपाडीही आता बदलत आहेत. जुनाट विचार जुन्या पिढीबरोबर संपत आहेत, परंतु श्रद्धा, परंपरा जशा एका पिढीतून दुसऱया पिढीत संक्रमित होत असतात, तद्वतच देव आणि भूत या दोन संकल्पनाही अलगद एक पिढी दुसऱया पिढीकडे सोपवते. म्हणूनच भुताखेतांचं फार अस्तित्व आता गावोगावी राहिलेलं नसलं तरी ते पूर्ण नष्टही झालेलं नाही. शेवटी देव काय किंवा भूत काय, या दोन्हींची निर्मिती मनुष्याने निसर्गातील अनाकलनीय शक्तींच्या वाटणाऱया भीतीतूनच केली आहे. फक्त एकाला सकारात्मक रूप दिलं, तर दुसऱयाला नकारात्मक!
महत्त्वाचं म्हणजे नागर संस्कृती कुठल्याही गोष्टीचा एक साचा करते आणि एखाद्या कृतीतील विविधता मारून टाकते, पण अनागर संस्कृतीचा ही विविधता जपण्याकडे कल असतो. कारण विधिविधानांच्या या विविधतेतूनच त्यांना जगण्यातलं रसरसलेपण अनुभवता येतं. याचमुळे लोकरहाटीतल्या देवांपासून भुतांपर्यंत साऱयांतच अनागरांनी वैविध्य शोधलं.
हे वैविध्य किती असावं? नागर संस्कृतीने फक्त भूत एवढी एकच संकल्पना सरसकटपणे मानली, पण ग्राम संस्कृतीने मात्र भूत सोडून गिऱहा, बावा, लाव्ह, म्हसोबा, हडळ, जखीण, झोटिंग, चाळा, डाकीण अशी कितीतरी भुताची रूपं कल्पिली. एवढंच नाही तर त्यांची घरातली-दारातली, रानातली-पाण्यातली, शेतावरची-वेशीवरची अशी विभागणीही केली आणि कुलदेवांप्रमाणे त्यांचे वर्षाचे कुलाचारही ठरवून टाकले. त्यामुळे कुलदेवतेला, ग्रामदेवतेला वर्षातून एकदा किंवा त्या त्या देवतेच्या सणानुसार जसा मानपान मिळतो, तसाच मानपान आणि राखण लोकरहाटीत भुताखेतांनाही मिळते ते ती आपल्यावर उलटू नयेत म्हणून!
हिंदुस्थानी संस्कृतीने माणूस मेल्यावरही त्याचं आत्मा रूपातील अस्तित्व मान्य केलं आहे. मात्र मृत पावलेली व्यक्ती सुखासमाधानाने मेलेली असेल, तर तिचा आत्माही संतुष्ट असतो, परंतु मृत व्यक्तीचा आत्मा अतृप्त असेल, संत्रस्त असेल तर मात्र तो आत्मा भूत बनून सृष्टीत वावरतो, असं हिंदुस्थानी धर्मशास्त्र सांगतं. यातूनच भूत-पिशाचाची संकल्पना रूढ झालेली आहे. मात्र लोकमानस-लोकरहाटीनं या धर्मशास्त्रापलीकडे जाऊन आपल्या स्वानुभवातून भुतांच्या विविध प्रकारांची कल्पना केलेली आहे. त्यासाठी मृत पावलेली व्यक्ती कशी होती, कोण होती, कधी मेली यावरून तिचे नाना प्रकार केले आहेत. इतकंच नव्हे तर आपल्या कल्पनाशक्तीने त्यांचा वावर कुठे असतो, त्यांचं रूप कसं असतं, त्यांचे स्वभाव कसे असतात याचीही कल्पना लोकरहाटीने केलेली आहे. उदाहरणार्थ, खारवी कोळी किंवा मुसलमान समाजातली एखादी व्यक्ती मेली आणि ती अतृप्त असेल तर ती झोटिंग बनून माणसांना त्रास देते. याचं रूपही लोकमानसानं मजेशीर रेखाटलेलं आहे. हा झोटिंग म्हणे एक पाय एका झाडावर आणि दुसरा पाय दुसऱया झाडावर ठेवून उभा असतो. तसंच याला डोकं नसतं. या झोटिंगाचं वास्तव्य असलेल्या झाडाखालून कुणी गेलं की, तो त्याला पछाडतो असं म्हणतात.
एखादी सवाष्ण महिला बाळंतपणात मेली तर तिची जखीण किंवा हडळ होते, असं लोकमानस सांगतं. हिचा वावर रानापेक्षा गावातल्या वाडी-वस्तीवर अधिक असतो. कारण आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ तिने तिथे व्यतीत केलेला असतो. हिची बाधा झाल्यास साडीचोळी देऊन, हळदकुंकू लावून तिची ओटी भरली जाते.
असे भुतांचे नाना प्रकार आपल्याला गावपांढरीत पावलोपावली पाहायला मिळतात. लोकरहाटीतलं लाव्ह हे भूतही असंच सवाष्ण असतं, पण ते मासिक पाळी सुरू असताना मेलेल्या स्त्राrचं असतं म्हणे. त्यामुळे एखादी सवाष्ण महिला कुठल्याही कारणाने वेडाचार करायला लागली की, बहुधा हिला जखीण किंवा लाव्हेने झपाटलं असावं, असं आजही म्हटलं जातं. विशेषत लहान मुलांना लाव्हेची भीती दाखवली जाते. कारण लाव्ह कोवळ्या मुलांना खाते, अशी समजूत लोकमानसाने परंपरेने जपलेली आहे. लाव्ह नावाचं हे भूत कोकणात एवढं लोकप्रिय आहे की, नमन-खेळ्यांसारख्या लोककलांमध्ये लाव्हेचा मुखवटा नाचवला जातो.
जखीण, लाव्ह किंवा नुकत्याच मेलेल्या व्यक्तीचं समंधासारखं भूत घराजवळ किंवा गाव परिसरातच वावरतं, असं म्हटलं जातं. त्यामुळे ही सर्वसाधारणपणे घरची-दारची भुतं म्हणून ओळखली जातात. मुंजा मात्र गावाबाहेर, पण गाववाटेवरच सापडतो. सोडमुंज होण्यापूर्वी एखादा ब्रह्मचारी ब्राह्मण मरण पावला असेल तर त्याचा मुंजा होतो, असं सांगितलं जातं. तो गावाबाहेर पारावरच्या पिंपळावर वास्तव्य करून असतो, असंही गावातील जुनेजाणते सांगतात. त्याचं वास्तव्य असलेल्या झाडाला कुणी शिवलं की, तो त्याला पछाडतो असं म्हणतात.
याचप्रमाणे जर एखादा अविवाहित ब्राह्मण मरण पावला तर त्याचा बावा होतो. मात्र हा बावा इतर भुताच्या मानाने खूपच प्रेमळ असतो. त्याचा प्रवास रात्रीच्या वेळी सुरू असतो. अशा वेळी त्याच्या वाटेत एखादी व्यक्ती आली तर तो तिला आपल्या कह्यात घेतो. हा बावा विविध रूपं घेण्यात पटाईत असतो. तो माणसाचं रूप घेतो. मात्र संधी मिळताच तो वाटेत आलेल्यांना नुसतं घाबरवतो.
लोकरहाटीत हमखास आढळणारं ग्रिहा हे भूतही असंच प्रेमळ असतं. पाण्यात बुडून मरण पावलेली व्यक्ती ग्रिहा होते, असं लोकसंस्कृती सांगते. त्यामुळे बहुतेक गावांच्या बाहेर ग्रिह्याचा डोह हमखास असतोच. या डोहावर किंवा नदीवर सांजवेळी कुणी पाणी भरायला आलं की, तो आपलं अस्तित्व दाखवून देतो. याचा अधिक कल लोकांना मारण्याऐवजी फसवण्याकडे असतो. त्यामुळे रात्री उशिरा कुणी नदी किंवा डोहाजवळून जात असेल तर तो त्याला त्याच्या नावाने हाक मारतो किंवा त्याला वेगळ्या वाटेने नेऊन फसवतो. ग्रिह्याप्रमाणेच म्हसोबा या लोकरहाटीतील भुताचा वावरही जलाशयाजवळ असतो. हे भूत दिसायला रेडय़ाप्रमाणेच असतं, असं म्हणतात. हे भूत रेडय़ासारखं असल्यामुळे त्याला शांत ठेवण्यासाठी गावकरी पूर्वी रेडय़ाचाच बळी देत.
भुतांमध्ये काही राखणदार भुतंही असतात. हे राखणदार भूत प्रामुख्याने त्या त्या कुटुंबातील मूळ पुरुष असतो. आपला वंशविस्तार किंवा शेतशिवार राखण्याचं काम तो करतो. आपल्या कुटुंबातील कुणी रात्री-अपरात्री आला तर तो त्याला काही करत नाही, पण दुसरी एखादी व्यक्ती शेतीचं किंवा झाडापाडाचं नुकसान करायला आली तर तिला तो आपलं अस्तित्व दाखवून घाबरवून सोडतो म्हणे.
लोकरहाटीतील भुतं अशी गावाच्या, वाडीवस्तीच्या आणि शेतशिवाराच्या आजूबाजूलाच वसलेली असतात. ती दिसत कुणालाच नाहीत, पण त्यांचं अस्तित्व मात्र जिवंत माणसाइतकंच गृहीत धरलेलं असतं. म्हणूनच जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तिथल्या तिथल्या अनागर संस्कृतीत भुताखेतांचं अस्तित्व आढळतंच. कारण लोकदेव हा जेवढा लोकसंस्कृतीचा सहजाविष्कार आहे, तेवढाच भुतं हादेखील. कारण लोकसंस्कृती सुष्ट आणि दुष्ट… दोन्ही प्रवृत्तींना मानणारी आहे.
आजही गावागावांतून दरवर्षी शेतावरच्या भुताला कोंबडीचा बळी दिला जातो. डोहातल्या ग्रिह्याला रानभेंडीच्या पानावर अबीर-गुलाल आणि भाताचा नैवेद्य दाखवला जातो. तसंच जखीण किंवा घरा-दारातल्या इतर कुणा भुताची भरल्या घराला नजर लागू नये म्हणून त्याच्या नावाने घासोंडी बाजूला काढून ठेवली जाते. एवढंच नाही तर भुताखेतांची गाणीही लोकवाङ्मयात आढळतात. अर्थात लोकरहाटीने मानलेलं हे भुताखेतांचं अस्तित्व विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारं नाही. लोकरहाटी भावनेला मानते. म्हणूनच आजही खेडय़ापाडय़ांत लोकदेवतांबरोबर भुतंही एकत्र सामोपचारानं नांदत आहेत.
शेवटी देव काय किंवा भूत काय, भल्याबुऱयाचे निदर्शक असलेल्या या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या तर दोन बाजू आहेत. नैवेद्य दाखवल्यावर जर देव येत असेल, तर शितं टाकल्यावर भुतंही जमणारच!




























































