
>> डॉ. नेहा सेठ (होमिओपॅथीतज्ञ)
आता जवळपास सगळंच सुरू झालंय. ऑफिसेस, जिम इ.इ. लोकंही खूप उत्साहात बाहेर पडताहेत. पण जी सूज्ञ माणसं आहेत ती अजूनही बाहेर पडायला घाबरतात. काहींचा आत्मविश्वास थोडा डगमगलाय… काय करूया…
सध्या अनलॉकचा काळ सुरू आहे. जिम, कार्यालये सुरू झाली आहेत, मात्र आठ महिन्यांनंतर घराबाहेर पडणं, लोकांमध्ये मिसळणं इत्यादी गोष्टींची थोडीशी भीती काही जणांच्या मनात आहे. पुन्हा सगळ्या कामांना नव्याने सुरुवात करताना कोरोना, सामाजिक अंतर, आरोग्याचे नियम पाळणं हे सगळं कितपत जमेल आणि आपण सारे नियम पाळले तरी प्रवासात किंवा इतर ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव आपल्याला तर होणार नाही, आपल्यामुळे कुटुंबीयांना कोरोना झाला तर अशी नकारात्मक मानसिकता, भय, काळजी मनात डोकावते, कारण घरी राहून काम करण्याची सवयच लॉकडाऊनमुळे आपल्याला जडली, आता एकदम सहा महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर पुन्हा सगळ्यांमध्ये वावरणं आणि नेहमीप्रमाणे आयुष्य जगण्याकरिता आत्मविश्वासाने कसं सामोरं जायचं याकरिता काय करायचं?
लॉकडाऊनमुळे लोकांचा समाजाशी संबंध कमी झाला होता. प्रवासाची सवय कमी झाली. आपल्याकडे एरवीही लोकांचे तीन-चार तास प्रवासात जायचे. हे थांबलेलं प्रवासाचं युद्ध आता पुन्हा सुरू झालंय. याची भीती लोकांना वाटते. कारण सामाजिक अंतर पाळणं हा नियम आपल्याकडे प्रत्येक वेळी पाळला जाईलच असे नाही. कारण बसमध्येही बरीच गर्दी आजही असते. त्यामुळे कोरोनाची भीती कायम मनात राहू शकते. याकरिता सारे नियम पाळण्याची सवय लावून निर्भयतेने समाजात वावरा.
घराबाहेर पडताना आत्मविश्वास कसा बाळगाल?
– दुकानं, मॉल्स, बँका, कार्यालये जिथे आपण लोकांच्या संपका&त येऊ तिथे आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही काळजी घ्यायचीच आहे, ही जाणीव कायम मनात ठेवून त्याप्रमाणे वागावे. एन-95 मास्क नसेल तर घरी सुती कापडापासून तयार केलेला मास्क वापरावा ज्यामुळे नाक, तोंड आणि चेहरा झाकता येतो.
– घराबाहेर गेल्यावर गर्दीच्या ठिकाणी मिसळू नका. दोन व्यक्तींमधले अंतर राखले जाईल याची काळजी घ्या. काही सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी असली तरी लोकांना सामाजिक अंतर पाळण्याची सवय नसल्यामुळे अगदी जवळ येऊन उभे राहण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तारतम्याने वागावे. समजावून सांगणे शक्य असल्यास सांगावे, नाहीतर स्वतःच त्या व्यक्तीपासून दूर जावे.
मोबाईल फोन आणि पर्सची काळजी
बाहेर गेल्यावर बोलून झाल्यावर मोबाईल लगेच खिशात किंवा पर्समध्ये ठेवावा. हातात ठेवू नये. वाईप्सने पुसून घ्यावा. ओले वाईप्स जवळ ठेवा. जेणेकरून पर्स, मोबाईल पुसता येईल. अगदीच आवश्यकता असेल तर हॅण्डग्लोव्हजही वापरू शकता. भाजी खरेदी करताना किंवा इतर वस्तू हाताळताना तुम्ही निःशंक राहू शकाल.
घरातील सहाय्यकांसाठी महत्त्वाचे
सहाय्यकांना घरकामाला बोलवण्याआधी त्यांची ऑण्टिबॉडीज टेस्ट करणे आवश्यक आहे म्हणजे त्यांना कोरोना होऊन गेला आहे का? हे कळू शकेल.
निर्भय होण्यासाठी सकारात्मक सूचना द्या….
कार्यालयात गेल्यावर मला कोरोना झाला तर? घराबाहेर कसे पडू? मला आता प्रवास झेपेल का? मी पूर्वीसारखा किंवा पूर्वीसारखी इतरांमध्ये मिसळू शकेन का? असे नाना तऱहेचे प्रश्न घराबाहेर पडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणाऱयांना सध्या भेडसावत आहेत. सद्यस्थितीही आपण लगेच बदलवू शकत नाही. याकरिता महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या मनाला सकारात्मक स्वयंसूचना देण्याची गरज आहे. सतत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा.
प्रवासादरम्यान…
नियमित बाहेर वापरण्यासाठी लागणारे मास्क स्वच्छ असावे. सर्वच वस्तू ज्या प्रवासादरम्यान बाहेर वापरू त्या नियमित साफ केलेल्या असाव्यात यामुळे आत्मविश्वास वाढण्यास नक्कीच मदत होईल. स्वतःलाही उत्साही वाटेल तसेच घरी आल्यावर दररोज आधी अंघोळ मग इतर कामांना सुरुवात करावी.






























































