मानसिक आजारांना विमा संरक्षण

120

>>डॉ. राजेंद्र बर्वे

विमा संरक्षण सेक्टरचे नियम आणि कायदे बनवणारी संस्था इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने मानसिक रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. शारीरिक आजारासोबतच आता मानसिक आजारालासुद्धा वैद्यकीय विमा संरक्षण कवच देण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजारांना सुद्धा विम्याचे संरक्षण कवच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्यानुसार मानसिक आरोग्य बिघडलेल्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीचे निदान व उपचार यांचा समावेश आहे. मानसिक आजारांना विमा संरक्षण देण्याच्या या निर्णयाच्या अनुषंगाने सध्याच्या मानसिक आरोग्य स्थितीतचा आढावा, त्यांचे उपचार आणि ग्राहक संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने असणाऱ्या तरतुदी याबाबत माहिती देणारा हा लेख.

विमा संरक्षण सशक्तपणे राबवणे गरजेचे
विमा संरक्षण सेक्टरचे नियम आणि कायदे बनवणारी संस्था इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने मानसिक रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. शारीरिक आजारासोबतच आता मानसिक आजारालासुद्धा वैद्यकीय विमा संरक्षण कवच देण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजारांनासुद्धा विम्याचे संरक्षण कवच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकटय़ा हिंदुस्थानात सात कोटी मनोरुग्ण आहेत. मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये प्रामुख्याने नैराश्य, चिंता आदी विकार आढळत आहेत. स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ओसीडी या विकारांनी ग्रस्त रुग्णांची मानसोपचारतज्ञांकडे गर्दी वाढत आहे.

आपल्याकडे मनोविकारांना फार वेगळय़ा नजरेने पाहिले जाते. किंबहुना त्यात मानहानी होतानाच जास्त दिसून आली. मनोविकारग्रस्तांना त्यांच्या आजाराच्या ओझ्याबरोबर समाजाकडूनही एकप्रकारची मानहानी आणि हेटाळणी सहन करावी लागत असते. कोणत्याही आजारात वेदनांबरोबरच उपचाराच्या खर्चाचीही काळजी असते. यापासून हळूहळू मुक्त होईल. जीवनातील एक घटना, अवस्था म्हणून निकोप दृष्टीने मनोविकारांकडे पाहिले जाईल. या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे आहे. नवीन मानसिक आरोग्य विधेयकाच्या निर्णयाने रुग्णांना अधिक अधिकार आणि हक्क मिळाले आहेत. ज्या विकारांकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते, जे उपचार केले जातात त्या सर्वांचसाठी ही विमा सुविधा असणार आहे. याबरोबरच ओपीडीसाठीही नियमित थेरपीसाठी, उपचारासाठी येतात त्यांनाही या नियमानुसार सुविधा देण्यात येणार आहे. अशाप्रकारे मनोविकाराबाबत अन्यायकारक दृष्टिकोन होता. त्यामुळे इतरांशिवाय रुग्णाला स्वत:लाही हा विकार स्वीकारणं जड जात होते. ते जाहीरपणे सांगणं तर दूरच; परंतु आता मात्र या माध्यमातून स्वत: सकट इतर लोकही मनोविकार आणि मनोरुग्णांना स्वीकारतील.

आता यात कोणकोणते डिसऑडीर्स, मनोविकार, त्यांचे उपचार यांना विम्याअंतर्गत घेतले जाणार आहेत हे पाहिले पाहिजे. काही मनोविकार आणि त्याचे उपचार यात कायदेशीर बाबीही येऊ शकतात. ज्या मनोविकारांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणं आवश्यक असतं अशा आजारांबाबत तर विम्याची सुविधा मिळू शकतेच. यात स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर्स, इतर काही डिसऑर्डर्स, ज्या आजारांचं स्वरूप गंभीर आहे, त्याशिवाय ज्या विकारांत रुग्णाच्या वर्तनाने रुग्णाला स्वत:ला व इतरांनाही धोका असण्याची शक्यता असते अशा रुग्णांना विम्याची सुविधा मिळू शकतेच.

इन्शुरन्स लाभ रुग्णाने घेताना रुग्णासाठी तर ते फायदेशीर ठरेलच; परंतु याशिवाय या विकारांवरची व्याप्ती नेमकी किती आहे याचं खरं स्वरूपही समोर येईल. मनोविकारांबाबत समाजाचा दृष्टिकोन पाहता तो समाजापासून लपवण्याकडेच जास्त कल दिसून येतो. यामुळे समाजात मानसिक आजारांचं प्रमाण किती आहे याचं अचूक चित्र समोर येईल. विम्याची सुरक्षा मिळवताना याची योग्य मोजणी केली जाईल आणि याद्वारे त्यावरील सर्वसमावेशक उपाय, प्रतिबंध, समस्या याबाबत योग्य गोष्टी घडू शकतील. याशिवाय समाजाचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनही यामुळे दूर होऊन स्वीकारार्ह भूमिका तयार होईल. वास्तवतेच्या अधिक जवळ जाऊ.

हिंदुस्थानात स्किझोफ्रेनिया, नैराश्य, उदासीनता, तीव्र मानसिक तणाव, हर्षवायू, डिमेन्शिया हे मनोविकार जास्त प्रमाणात दिसून येतात. हिंदुस्थानातील 35 टक्के लोकांना मानसिक उपचारांची गरज असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. सध्या आपल्याकडे डिमेन्शियाचं प्रमाण जास्त दिसून येतं. इतर आजार बरे होण्यासाठीचा नेमका कालावधी वर्तवला जातो; परंतु मानसिक विकार बरे होण्यासाठीचा नेमका कालावधी सांगता येत नाही. योग्य उपचार आणि रुग्णाचा प्रतिसाद यावर विकार बरा होण्याचा अवधी ठरवता येत असला तरी हा कालावधी जास्तच असू शकतो. अनेकदा या समस्यांचं स्वरूप तीव्र होतं तेव्हाच डॉक्टरांचे उपचार घेतले जातात. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. मानसिक आराग्य विधेयकानुसार दीर्घकाळ घ्याव्या लागणाऱ्या उपचारांबाबत वेगळे नियम आहेत. आता नवीन औषधोपचारांच्या, थेरपींच्या उपलब्धतेमुळे हा काळ कमी करणेही शक्य झाले आहे. यामुळे मनोविकार बरे होण्याची शक्यता आहेतच.

ज्यांना खरोखरच त्रास होत असतो आणि मानसिक समस्येने ते हैराण झालेले असतात ते लोक काय बोलतील याकडे फार लक्ष देत नाहीत हे इतक्या दिवसांचं माझं निरीक्षण आहे. या मानसिकतेतून बाहेर पडण्याची त्यांची पराकाष्ठा असते. आता यात दुसरी बाजू अशी की, विम्यानिमित्त एकदा मनोविकाराबाबत जाहीर केलं की लग्न जुळण्याबाबत प्रश्न उभे राहू शकतात; पण तेही पारदर्शक स्वीकाराने त्यावर मात करता येते. बाकीचा आजार बरा होतानाचे परिणाम दिसत असतात, पण मनोविकारांमध्ये याचा नेमका काळ उद्धृत करता येत नाही. पण आजाराची तीव्रता मोजण्याची यंत्रणा यात उपलब्ध असते. त्यामुळे रुग्णाबरोबर इतरांनाही याबाबत दिलासा मिळू शकतोच.

मुळात या निर्णयाने समाजाने याचा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे हे महत्त्वाचे. आता विम्यासंदर्भातील स्टॅण्डडायजेशन कसं केलं जाणार आहे आणि याबाबत नेमके कोणते नियम, अटी आणि कार्यवाही कशी केली जाणार आहे हेही पाहिलं पाहिजे. या नियमाद्वारे चांगली धोरणं राबवली जातील हीदेखील एक अपेक्षा आहे.
डॉ. राजेंद्र बर्वे, ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ

आपली प्रतिक्रिया द्या