प्रासंगिक – भुलू नका भूलतज्ञाला

>> डॉ. शिल्पा तिवसकर

ऑपरेशन म्हटलं की, पेशंट आणि नातेवाईक यांची गडबड चालू होते. सर्जन व्हिझिटस्, चर्चा, गुगल सर्च, रक्त तपासणी, घरातील अॅडजेस्टमेंट आणि मग भूलतज्ञाकडे फिटनेस सर्टिफिकीट द्या म्हणून एक भेट. पण जेव्हा ऑपरेशनच्या दिवशी भूलतज्ञ भेटायला येतो आणि ‘कसे आहात, घाबरलात का?’ असे विचारल्यावर भल्या-भल्या माणसांच्या भावनांचा बांध तुटतो आणि डोळ्यांत अश्रू भरतात.

मग भूलतज्ञ हा नेमका कोण? एक इंजेक्शन किंवा सुई मारून बधिर करणारा, बस एवढेच! नाही… भूलतज्ञ हा एम.बी.बी.एस. व एम.डी. अॅनेस्थिशीया, अशी द्विपदवी असणारा नऊ वर्षे मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतलेला डॉक्टर!

ऑपरेशनच्या आधी तो तुमच्या सर्व आजारांचा, विकारांचा आढावा घेतो. ब्लड प्रेशर, शुगर, दमा कंट्रोलमध्ये आहे का बघतो. हृदयाची, फुप्फुसांची, किडनीची कार्यक्षमता कशी आहे याचे निदान करतो. तुम्ही बेहोश झाल्यावर हे अवयव कसे काम करतील याचा अचूक अंदाज घेतो. तुमचे हिमोग्लोबिन शरीरातील ऑक्सिजन फिरवते, तुमच्या पांढऱया पेशींमध्ये जंतूंना लढायची ताकद असते, तुमच्या प्लेटलेटस् तुमच्या रक्ताचे गोठणे ठरवते. या सर्व तपासांचा आढावा घेऊन भूलतज्ञ तुम्हाला फिटनेस देतो. काही अजून तपासांची गरज वाटल्यास तो तुम्हाला लिहून देतो. एखाद्याला समजा ब्राँकायटिस आहे, तो म्हणेल ‘मला सर्व रोजची कामे करता येतात’, पण शस्त्र्ाक्रियेच्या वेळीस अॅनेस्थिशीयामध्ये त्याला किती रिस्क आहे, हे फक्त आणि फक्त भूलतज्ञच सांगू शकेल. अनेक प्रकारच्या भूल असतात. पूर्ण भूल देणे, कमरेखाली सुन्न करणे, नुस्ता एक अवयव सुन्न करणे, आता तर हव्या त्या ठिकाणी हवा तेवढा अॅनेस्थिशीया द्यायला सेगमेंटल अॅनेस्थिशीया पण आहे.

आता सर्जरीच्या दरम्यान भूलतज्ञ भूल देऊन काय करतो? सर्जन तर सर्जरीच्या काwशल्यात बिझी असतो, पण शस्त्र्ाक्रिया चालू असताना हर मिनिट तुमची नाडी, ब्लड प्रेशर, ऑक्सिजन सॅचुरेशन, श्वासोच्छवासाची गती, तुमचे ईसीजी, तुमची येणारी युरीन, तुमच्या हृदयाचे नियमित ठोके पाडण्याचे कामकाज, शरीरातून बाहेर येणारा कार्बनडायऑक्साइड हे सर्व भूलतज्ञच शांतपणे निरीक्षण करत असतो.

जसे म्हटले जाते, ऑपरेशन थिएटरमध्ये जहाज तर सर्जन चालवत असतो, पण जर शस्त्र्ाक्रियेच्या दरम्यान शस्त्र्ाक्रियेला पेशंटच्या शरीराने साथ दिली नाही, ब्लड प्रेशर पिंवा ऑक्सिजन पडायला लागला तर बुडत्या जहाजाचा कप्तान हा नेहमीच भूलतज्ञ असतो. पटापट सर्व औषधे द्यायला सुरुवात करतो. ओटीमधल्या प्रत्येकाला पटकन कामे सांगतो. मानेमध्ये सुई टाकून हृदयाकडे औषध द्यायला सुरू करतो. डिफिब्रीलेटर वापरतो, सिरीज पंप वापरतो, गरज पडल्यास छातीवर दाब द्यायलाही सुरू करतो आणि पेशंटरूपी नावेला वादळातून सुखरूप आणण्याचा प्रयत्न करतो. शस्त्र्ाक्रिया चालू असताना तुम्हाला काही कळणार नाही, वेदना होणार नाही याची दक्षता भूलतज्ञ घेतो. भुरळ पडेल याकरिता तर औषधे देतोच, पण ऑपरेशन झाल्यावरही वेदना होऊ नयेत म्हणून याकरिता औषधे तो आधीच देतो.
शस्त्रक्रिया करणारे सर्जन निरनिराळ्या क्षेत्रातले असतात. जनरल सर्जरी, युरोलॉजी, गायनॅक व ऑबस्ट्रेटिक, ऑफी (पॅन्सर) सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, न्युरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, डेंटल सर्जरी पण एक भूलतज्ञ या सर्व शस्त्र्ाक्रियांना भूल देऊ शकतो. त्यामुळे भूलतज्ञाला या सर्व शस्त्र्ाक्रिया आणि त्यांच्या शरीरावर व अॅनेस्थिशीयावरचे होणारे परिणाम माहीत असतात.

भूलतज्ञ नुसता ऑपरेशनच्याच वेळी कामाला येतो, असा भ्रम आहे. विदेशासारखे आता हिंदुस्थानातसुद्धा अतिदक्षता विभाग, आय.सी.यू. हे भूलतज्ञ सांभाळतात. कोरोनाच्या काळात अर्जुनाची भूमिका सांभाळत भूलतज्ञांनी अतिदक्षता विभागाचा रथ पुढे नेला. तसेच सी.टी. स्पॅन, एम.आर.आय. कार्डियाक अँजोग्राफीला भूलतज्ञ हा स्थांडबाय असतो व गरज लागल्यास भुलेची व आपात्कालीन औषधे देतो. मेंदूच्या गाठी काढणे (डी.एस.ए.) ते प्रसूती होणाऱया मातेला बधिरीकरण करणे (लेबर अॅनेस्थिशीया) ही सर्व कामे भूलतज्ञ करतो. तेव्हा ऑपरेशनच्या आधी स्मित देऊन, गोड बोलून, विचारपूस करणाऱया भूलतज्ञाला भुलू नका. तोच तुमचा सखा आणि तोच तुमचा सारथी. तेव्हा आजच्या (16 ऑक्टोबर) जागतिक भूलतज्ञ दिवसाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा!

(सचिव, भूलतज्ञ संघटना)