समकालीन मराठी कवितेतील आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गीतेश शिंदे

कविता ही एक जिवंत निर्मिती असते. जिचं सतत संक्रमण होत राहतं आणि म्हणूनच तिच्या आशयातलं, सौंदर्यातलं नावीन्य कायम राहतं. गेल्या कित्येक दशकांपासून वाचकांना वास्तवतेच्या जवळ नेणाऱया कवितांनी कायम घर केलं आहे. मराठी कवितेत साठोत्तरी कवितेला मानाचं स्थान आहे. आपल्या जाणिवांचा लेखाजोखा त्या काळातील कवींनी मांडला. त्या काळानंतर नव्वदोत्तरी कवितेच्या शिलेदारांनी समकालीन सामाजिक-सांस्कृतिक वास्तव मांडलं. 21 मार्च रोजीच्या जागतिक कवी दिनानिमित्त गेल्या तीस वर्षांतील कवितांचा आढावा घेणारा हा लेख.

मराठी कवितेत साठोत्तरी कवितेला मानाचं स्थान आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील लेखाजोखा, नव्याने उभा राहिलेला संघर्ष, कामगार चळवळ, मार्क्सवाद, दलित-पँथर चळवळ, नामांतराचा लढा आदी विविध प्रवाह नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, दि. पु. चित्रे, विंदा करंदीकर आणि त्या काळातील लिहिते जाणते कवी आपल्या जाणिवांतून मांडत होते. समीक्षकांनी साठोत्तरी कवितेची विविधांगांनी मीमांसा केल्याचे आढळते. या प्रवाहासोबतच कुसुमाग्रज, पाडगावकर, शंकर वैद्य, इंदिरा संत, शांता शेळके, ना. धो. महानोर आदी कवी-कवयित्री मराठी कवितेला नवे आयाम देत होते. माझं महाविद्यालयीन जीवन यांच्याच कवितांवर पोसलं गेलं. आज साठोत्तरीतले बरेचसे जाणते कवी आपल्यात नसले तरी त्यांच्या नंतर आलेल्या नवोदत्तरी कवितेतल्या शिलेदारांचीसुध्दा आज साठी ओलांडलेली आहे. खुली अर्थव्यवस्था, उंबरठय़ावर येऊन ठेपलेलं जागतिकीकरण आणि त्याचे फायदे-तोटे, इंटरनेट-संगणक क्रांती, झपाटय़ाने होणारं गावांचं शहरीकरण आणि शहरांचं बकालीकरण, वाढलेली संवादांची साधन सुलभता, पण खुंटलेला संवाद, स्त्राrत्वाची जाणीव, सलगच्या दुष्काळाने मोडलेलं गावगाडय़ाचं कंबरडं असे बरेचसे विषय या नवोदत्तरी कवितेतून डोकावत होते. आज या जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने गेल्या तीस वर्षांत जोरकसपणे समकालातही टिकून असलेल्या आवाजाचा अदमास घेण्याचा प्रयत्न या लेखातून मी करत आहे.

‘योगभ्रष्ट’ या कवितासंग्रहातून कविवर्य वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेचा परिचय मराठी साहित्य विश्वाला झाला. पुढे साधारणतः दहा-बारा वर्षांच्या अंतराने आलेले शुभवर्तमान, शुनःशेप, चित्रलिपी या संग्रहांतून डहाके सरांची विशिष्ट प्रतिमा दृष्टी, रुपकांची ठाशीव मांडणी आणि चटकन न उलगडणारा आशय यामुळे सामान्य वाचक या कवितांकडे दुर्बोधतेच्या अंगाने पाहात असला तरी 2016 मध्ये पाठोपाठ आलेले रूपान्तर, वाचाभंग या संग्रहातील कवितेची भाषा ही आजची बोली बोलणारी आणि तरीही तितकीच आशयगर्भ आहे. साधारणतः साठच्या दशकापासून लिहिता झालेला डहाके सरांचा हात अजूनही आपल्या कवितांतून सभोवतालचा अदमास घेत आहे. वाचाभंग संग्रहातील उत्तर कवितेत ते असं लिहितात,

या ओळी आता निरर्थक झाल्या आहेत का,
आतला दाणा कीटकांनी खाऊन
फोलपट उरावे त्याप्रमाणे?

सर्वच स्त्राr लेखिकांप्रमाणे ‘स्त्राr’ मध्यवर्ती असली तरीही ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरेंच्या कवितांमधून कुठेही स्त्राrमुक्तीचा आक्रमक आविष्कार किंवा बेगडी आक्रोश मुळीच दिसत नाही. लोकसाहित्य, लोकसंस्कृती यांच्या अभ्यासाचा परिणाम म्हणा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असणारा समजूतदारपणा म्हणा, स्त्राrच्या या सनातन व्यथेकडे बघण्याची त्यांची भूमिका समजूतदार, समंजस अशी आहे. त्यांचे सारे कवितासंग्रह कालानुक्रमाने पाहिले तर आरंभीच्या कविता कुणाच्या तरी वैयक्तिक सुख-दुःखांशी निगडित असलेल्या दिसतात, स्वानुभवाच्या अनेक छटा त्यात असाव्यात असे वाटत राहते. पण गेल्या दशकातील कवितांमध्ये मात्र त्या वैयक्तिकाकडून समाजाकडे वळल्यासारख्या दिसतात. स्वतःला अलिप्त ठेवून स्त्रियांची मानसिकता व्यक्त करत असतानाही त्यांच्या कवितेचा अंतःस्वर स्त्राrजन्य समजुतीचा असतो. अरुणाताईंच्या कवितेत सामाजिकता क्वचितच आढळते हा आरोप समीक्षकांकडून केला जातो. परंतु त्या आपल्या कवितेतून कोणतेही तात्कालिक विधान करत नाही. जनी, रुक्मिणी (निरंजन कवितासंग्रह) या कविता वरवर अंगाने स्त्राr मनाचं दुःखं जरी मांडणाऱया वाटल्या तरी सामाजिक रचनेबद्दल, स्तराबद्दल आणि एकूणच समाजाच्या मानसिकतेचा ऊहापोह या कवितांतून होतो. ‘निरंजन’ या संग्रहातील ‘नका सांगू’ या कवितेत तलवारी घेऊन आलेली, दहशत माजवणारी ती माणसं कोण आहेत, असा सवाल करताना लिहितात,

नका सांगू माझ्या घराच्या आसपास
हा जाळ कसला, कसला हा मरणवास

‘वाटेवरच्या कविता’ या संग्रहातून आपल्या उपरोधिक विधानांनी, उपहासात्मक शैलीतून भाष्य करणारे म्हत्त्वाचे कवी म्हणून अशोक नायगावकरांचे नाव नक्कीच घ्यावे लागेल. भसाभसा कविता प्रसवणाच्या काळात वर्षाकाठी एक-दोन कविताच लिहिणारे नायगावकर सामाजिकतेवर आपल्या मिष्कील शब्दांचं जरी हसू पेरत असले तरी त्यांची कविता कमालीची गंभीर आणि अंतर्मुख करणारी आहे. परंतु दुर्दैवाने हास्य कवी ही चिकटलेली बिरुदावली त्यांच्यातील कवी समजून घेण्यास अडथळा निर्माण करते. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकातून प्रसिध्द झालेल्या निसर्गाचा घोटाळा, अभिमान या कविता फक्त हिंदुस्थानातीलच नव्हे तर जागतिक घडामोडींचे पदर उलगडणाऱया आहेत. इतिहासाचं डांबर उकळवलं आणि निघालो भूगोलावर फासत असं म्हणताना ते एका ओळीच्या कवितेत असंही लिहितात,

नदीचे कोणीच ऐकेना म्हणताना
शेवटी तिने धरणात जलसमाधी घेतली

तल्लखी, पाण्याचा उत्सव, धर्म अशा बारा कवितांतून पाण्याचा आणि समाजातील मनोवृत्तींचा घेतलेला शोध लक्षणीय भासतो.

नुसती घालमेलच नसते ती
अख्खा समकाल आतडय़ांना गुंडाळलेली
केविलवाणी उलथापालथ असते जिवाची

असं म्हणत मनातली घालमेल कवितेत उतरवणाऱया, भूमी आणि स्त्राrचं सर्जक नातं अधोरेखित करणाऱया राबत्या हातांची कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या कवितेतली धग सीझर कर म्हणतेय माती आणि धग असतेच आसपास या दोन संग्रहांतून. निरन्वय, स्त्राrगणेशा, वेणा यातून बाईपणाचे कंगोरे उलगडत स्त्राrत्वाचा जागर करणारी नीरजा यांची कविता असो वा अंतःस्थ, दृश्यांचा ढोबळ समुद्र या संग्रहातून बाईतील माणूसपणाचा आवाज उंचवणारी प्रज्ञा दया पवार यांची कविता त्यातील थेटपणामुळे लक्षवेधी ठरते. प्रशांत असनारे यांच्या ‘मीच माझा मोर’ या संग्रहातील कविता प्रतिमांच्या, प्रतीकांच्या जंजाळात न अडकता साधेपणाने संवाद साधते. तूर्तास आणि तत्पूर्वी या संग्रहातील दासू वैद्य यांच्या कविता कमालीच्या अस्वस्थ करतात.

मरणाऱयांना ‘सुटलात!’
म्हणून जगणारे शुभेच्छा देतील
पुढे पुढे दिवस आणखी कठीण येत जातील!

‘निद्रानाश’ या संग्रहातील ओळींतून महेश केळुसकर सामाजिक अस्थिरतेवर, राजकीय दडपशाहीवर, मुस्कटदाबीवर ताशेरे ओढतात. तर प्रफुल्ल शिलेदार ‘पायी चालणार’ संग्रहातील पुस्तकांविषयीच्या कवितेत म्हणतात, ‘वेश बदलावा तशी भाषा बदलून पुस्तकं जगभर फिरतात.’ याप्रमाणेच आज जागतिक कविता दिनानिमित्ताने मराठी कवितासंग्रहांनी वेशांतर करण्याची गरज अधोरेखित कराविशी वाटते. इतर भाषांत प्रामुख्याने इंग्रजी, फ्रेंचमध्ये अनुवाद झाल्यास मराठी कवितेतील प्रवाह जगासमोर येतील. तसं झाल्यास ग्रेस, कुसुमाग्रज, मर्ढेकर यांच्यासोबतीने समकालातील अजय कांडर, लोकनाथ यशवंत, भरत दौंडकर हा मराठी कवितेतील आजचा आवाज ग्लोबल होईल. त्यामुळे मराठी कवितेच्या भाषांतरावर येत्या काळात अधिक भर द्यायला हवा, एवढं मात्र नक्की.

[email protected]