बेगमी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जे. डी. पराडकर

बेगमी करणे हे तसे खूप कष्टाचे काम. घरातील पुरुष वर्ग आवश्यक असणारे सर्व जिन्नस आणून देण्याचे काम करतो. मात्र त्यानंतरच खरी कसोटी असते. या कसोटीत उतरण्यासाठी अखेर स्त्रियांनाच लक्ष घालावे लागते. हे काम घरातील स्त्रिया अत्यंत मन लावून आणि न थकता करतात. यामधून स्त्रियांच्या स्वभावातील विविध पैलूंची आपोआप ओळख होत जाते. जून महिना सुरू होईपर्यंत कोकणात घराघरांत सर्वत्र वाळवण महोत्सवच सुरू असतो.

पावसाळय़ात विविध कारणांमुळे घरामध्ये जिन्नस आणणे अशक्य होते. अशावेळी खास करून ग्रामीण भागात जिन्नसांच्या विविध प्रकारांची बेगमी करण्याची पद्धत सुरू झाली. पूर्वी ग्रामीण भागात दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या, परिणामी पावसाळय़ात खरेदीसाठी बाजारपेठेत येणं अशक्य व्हायचे. हळूहळू ग्रामीण भाग रस्त्यासह संपर्काच्या विविध माध्यमांनी जोडला गेला तरीही पावसाळय़ापूर्वीच्या बेगमीची पद्धत आजही कायम आहे. याचं सर्वाधिक महत्त्वाचे कारण म्हणजे बेगमी करून ठेवणं हे महिलावर्गाच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे ठरते. घरातील स्त्राr अत्यंत कौशल्याने संसार करत असते. यामधून स्त्रियांच्या स्वभावातील विविध पैलूंची आपोआप ओळख होत जाते. एप्रिल-मे या दोन महिन्यांत कोकणात घराघरांत सर्वत्र वाळवण महोत्सवच सुरू असतो. बेगमी करणं म्हणजे घर घान्यांसह विविध प्रकारच्या जिन्नसांनी भरून ठेवणं. एकदा का घरातील स्त्रिया बेगमीच्या कामातून मोकळय़ा झाल्या की, त्यांना होणारे समाधान त्यांच्या चेहऱयावर तरळताना दिसत असते.

कडधान्ये वाळवणे हे एक कौशल्याचे काम असते. बेगमीच्या जिन्नसांना किती उन्हं द्यायची? हे गणित केवळ महिलावर्गच सोडवू शकतो. वाळवणं घालण्याचीदेखील पद्धत आहे. जुन्या साडय़ा, बेडशीट याचा वापर करत त्यावर अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने वाळवणं घातली की, रंगीबेरंगी कापडावरील कडधान्ये म्हणजे अप्रतिम संकल्प चित्रेच भासतात. आज फेसबुक पाहत असताना सोनाली जोशी यांनी बेगमीला उन्हं दाखवणे म्हणजे, एकप्रकारचा ‘वाळवण महोत्सव’ असल्याची उपमा देऊन छान संकल्पना मांडली. त्यांनी वाळवणांचे एवढं अप्रतिम छायाचित्रं काढले आहे की, ते पाहून मला बेगमी या विषयावर लिहावं असं वाटलं. वाळवणं घालताना स्त्रिया जेवढं स्वतः नीटनेटकं आणि छान राहण्याचा प्रयत्न करतात, तेवढीच काळजी त्या आपल्या सर्व प्रकारच्या कामात घेतात याचं हे एक उत्तम उदाहरण असावे. जुन्या साडय़ा, बेडशीट यांचा वाळवण महोत्सवासाठी उपयोग न करता त्यांनी अत्यंत कल्पकतेने ब्लाऊज पिसचा वापर केल्याने हे वाळवण म्हणजे एक सुंदर संकल्पचित्र तयार झाल्याचे माझ्यातील कलात्मक दृष्टीतून मला जाणवले.
बेगमी करणे हे तसे खूप कष्टाचे काम. घरातील पुरुष वर्ग आवश्यक असणारे सर्व जिन्नस आणून देण्याचे काम करतो. मात्र त्यानंतरच खरी कसोटी असते. या कसोटीत उतरण्यासाठी अखेर स्त्रियांनाच लक्ष घालावे लागते. हे काम घरातील स्त्रिया अत्यंत मन लावून आणि न थकता करतात. वाळवणं केवळ उन्हात घातली की मोकळीक मिळाली असं होत नाही. वाळवणांवर बारीक लक्ष ठेवावं लागते. पक्षी, वानर-माकड यासारखे प्राणी या आयत्या भोजनावर ताव मारण्यासाठी वारंवार येतात. याबरोबरच जसं ऊन सरकेल तशी वाळवणांची जागादेखील बदलावी लागते. या वाळवण महोत्सवादरम्यान कोकम, आंबा, फणस तयार होत असल्याने आमसुलं, आंब्या-फणसाची साठं यांनाही या महोत्सवात स्थान मिळते. बेगमीतील जिन्नसांची राखण करायचीच आहे म्हटल्यावर, यादरम्यानेच पापड, फेण्या तसेच विविध प्रकारचे सांडगे, सांडगी मिरच्या यादेखील वाळवणात आपापले स्थान पटकावतात.
सलग चार दिवस चालणाऱया या वाळवण महोत्सवात जर का आभाळात मळभ आलं तर मग याचा परिणाम स्त्रियांच्या मूडवर आणि मानसिकतेवर झालाच समजायचा. नशिबाने वाळवणं घालायला सुरुवात झाल्यावर सलग चार दिवस कडक ऊन राहिलं तर या वाळवण महोत्सवाचा शेवट गोड होतो. बेगमी आटोपल्याचे, एखाद्या रात्री ताटात आलेल्या उत्तम पदार्थातून लक्षात येते. मात्र हे चार दिवस गहू वाळवण्यापासून सर्व कडधान्ये सुरक्षित करेपर्यंत स्त्रियांची खूपच दमछाक होते. यात एवढे बारकावे असतात की, ते न थकता फक्त स्त्रियाच करू जाणे. वाळवण महोत्सव आटोपला की, पुढचे तीन-चार दिवस हे सर्व जिन्नस सुरक्षित भरून ठेवण्यात जातात. यादरम्याने स्त्रिया एकवेळ स्वतःच्या चेहऱयाला पावडर लावायला विसरतील, पण इंदायणी, कोलम, आंबेमोहर या तांदळाच्या साठय़ाला पावडर लावायला कधीही विसरत नाहीत.

बालपणी वाळवणं घालण्यासाठी आईला मदत करायची वेळ आली की, मुलींना वाटतं कशासाठी आई एवढा त्रास करून घेते? मात्र पुढे या मुलींची लग्न होऊन त्या संसार करू लागल्या की, त्यांना या बेगमीचं महत्त्व कळू लागतं. अर्थातच आयुष्यात अनेक गोष्टींचे महत्त्व असे उशिरा कळल्याने काहीसे नुकसानही सहन करावे लागते. माझ्या संसारात बेगमीला अजिबात स्थान नाही, असं म्हणणाऱया स्त्रियांनाही एक दिवस वाळवण महोत्सव करावासा वाटतो आणि त्यांनादेखील ही संकल्पना योग्य वाटू लागते, हा या पद्धतीचा सन्मानच म्हणायला हवा. अखेरीस पूर्वी गैरसोयींमुळे पावसाळय़ापूर्वी जिन्नसांची बेगमी करून ठेवावी लागायची, आता मात्र ही संसारातील एक महत्त्वपूर्ण गरज बनली आहे. संसारातील शिस्तबद्धता, काटेकोरपणा आणि नियोजनाच्या या प्रकारात स्त्रिया स्वतःमधील विविध गुण नकळत आपल्या समोर ठेवत असतात. मात्र हे वेगळेपण ओळखण्याची ताकद आणि मनाचा मोठेपणा मात्र आपल्याकडे असायला हवा. तो असेल तर बेगमीतील प्रत्येक जिन्नसाची चव अधिक रुचकर होत जाईल यात शंका नाही.