
>> जे. डी. पराडकर
स्लोवेनिया देशाने जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डिया), अन्न व कृषी संघटना (एफएओ) यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला, यानुसार 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून 2018 पासून साजरा केला जाऊ लागला आहे.
मधु मागशी माझ्या सख्या परी… मधुघटची रिकामे पडती घरी’ या गीताचे बोल ऐकले की आठवतात ते मधुघट. टंच भरलेले मधुघट पाहणे म्हणजे खरी समृध्दी. मधुघट रिकामे होणे हे नक्कीच आनंददायी नाही. साक्षात् परमेश्वरालाही जो पसंत आहे असा मधु म्हणजे मध आरोग्यदायी समजला जातो. कणाकणाच्या मधासाठी मणामणाएवढे कष्ट करणाऱया मधमाश्या आपल्या पिल्लांच्या भविष्यासाठी हा मध गोळा करत असतात. एवढा गोड मध साठवणाऱया माश्यांचा डंख एवढा जहाल कसा? मधामध्ये आपली सोंड बुडवूनही मधमाशी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विषाचा डंख मारतेच. स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस मधमाश्यांची पोवळी शोधून काढतो आणि माश्यांना जाळून किंवा उडवून लावून यातील मध काढून घेतो. अत्यंत क्रूरपणाचे कृत्य करताना मानव त्यांचे कष्ट विसरून जातो हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. मधमाशी! केवढा छोटासा कीटक! पण याची कष्टांची किमया खूप मोठी आहे. असंख्य फुलांवर बसून मधाचा कण कण वेचून तो आपल्या घरटय़ात आणून मधुघट भरण्याचे मधमाशांचे प्रयत्न दिशादर्शक आहेत. या मधुघटांचा गंध परिसरात असा काही पसरतो की मधुघटाच्या खजिन्याची जाणीव मानवासहित यांच्या असंख्य शत्रूंना सहजगत्या मिळते. मधुघट उभारणीचे काम उंच झाडावर आणि त्यातही आडव्या फांदीला टोकावर करण्याचा प्रयत्न मधमाश्यांकडून होतो. तरीही मानवाचे स्वार्थी हात तेथपर्यंत पोहचतातच.
प्रत्येक फुलाचा जसा गंध वेगवेगळा आहे तसेच त्याच्यातील मधाची चव, गोडी, घट्ट आणि पातळपणा हा भिन्न स्वरूपाचा आहे. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात कोवळी सूर्यकिरणे फाकली की मधमाश्यादेखील आपल्या कामात व्यस्त होतात. निसर्गाचा बहरण्याचा हंगाम हाच मधुघट ओतप्रोत भरण्याचा कालावधी असतो. निसर्गाने स्वतःमधील काही गोष्टी मानवाव्यतिरिक्त निसर्गात असणाऱया अन्य घटकांना बहाल केल्या आहेत. दुर्दैवाने निसर्गावर देखील घाला घालणारा मानव याच्या प्रत्येक घटकावर आपलीच मालकी असल्यासारखा वागू लागलाय. वसंत ऋतू म्हणजे निसर्गाला बहार येण्याचा कालावधी. ‘ऋतू वसंत आणि साऱयांना पसंत…’ असे म्हटले जाते ते काही उगाच नाही. गळून पडता पानांचा बहर… वृक्षांना येते फुलायची लहर! एक ना अनेक वृक्ष कात टाकून स्वतःचे सौंदर्य खुले करण्याच्या प्रयत्नात असतात. जागोजागी पिवळी, केशरी, गुलाबी, लाल, जांभळी अशी एक ना अनेक प्रकारची फुले फांद्या भाराने ओथंबतील अशी बहरलेली असतात. वरून पाहिले तर वृक्षाचे खोडदेखील दृष्टीस पडत नाही एवढा फुलांचा विस्तार झालेला असतो. निसर्गाचा हा बहर म्हणावा की कहर? हेच कधीकधी कळत नाही.
बहुतेक फुलांमध्ये मध हा असतोच. फरक एवढाच असतो की त्याचे प्रमाण कमी जास्त असते. वसंत ऋतूत निसर्गप्रेमींनी जर निरीक्षण केले तर त्यांच्या लक्षात येईल की, फुलांनी बहरलेल्या प्रत्येक झाडाजवळ गुंजारव ऐकू आला म्हणजे समजून जायचे मधमाश्यांचे जत्थे येथे आपले मधुघट भरण्यासाठी दाखल झालेत. मधमाश्यांच्या पंखांचा आवाज निसर्गाच्या त्या शांततेचा भंग करत असतो. हा गुंजारवदेखील ताल धरलेल्या एखाद्या गीतासारखा भासतो. जीवो जीवस्य जीवनम्! हे निसर्गातील सूत्र येथेही अवलंबले जात असते. आपण तर काही काळानंतर कोमेजून धरतीवर कोसळणारच आहोत. मग आपल्यातील मधुघट जर वेळीच रिता झाला तर, आपल्यावरील भार कमी होई, या भावनेने फुलं मधमाश्या त्यांच्या अंगाखांद्यावर खेळू लागल्यानंतर त्यांच्या पुढे लीन होत असतील. फुलांचा त्याग या अन्न साखळीत किती महत्त्वपूर्ण आहे याची प्रचीती यातून नक्कीच येते.
मणामणाच्या कष्टाने मिळणारा कण कण मध आपल्या पोट पिशवीत भरून आपल्या मधुघटात नेऊन ओतणाऱया या मधमाश्या, अपार कष्टांचे फळ नेहमीच गोड असते असा संदेश देऊन जातात. असंख्य माश्या मधाचा कण कण घटात भरून त्याला पूर्णत्व प्राप्त करतात. मधमाशा का भरतात हे मधुघट? आपल्या पिल्लांसाठी त्यांचा हा सारा खटाटोप असतो. घरटय़ातील अंडय़ातून पिल्ले बाहेर पडली की त्यांचे अन्न म्हणून या मधाचा त्यांना उपयोग होत असतो. निसर्गाच्या या अन्नसाखळीचा विचार केला की निसर्गासारखा दुसरा जादूगार नाही याची खात्री पटते. पृथ्वीवर ज्या जिवांची निर्मिती केली गेली आहे त्यांचे आयुष्यमान कमीजास्त असेल, मात्र त्यांच्या अन्नसाखळीची व्यवस्था निसर्गाने करून ठेवली आहे. फक्त यासाठी ‘शोधा म्हणजे सापडेल’ हे सूत्र अवलंबण्याची गरज असते. परमेश्वरालादेखील मध अर्पण करावा असे शास्त्रात सांगितले आहे. यासाठीच पंचामृतात मधाला मोठे स्थान आहे. मधुमक्षिका पालन केंद्रातील मध पंचामृतात असेल तरच तो पावन होईल. माश्यांना जाळून किंवा उडवून लावून जबरदस्तीने मिळवलेला मध पंचामृतात चालू शकेल का? असा प्रश्न पडतो खरा. मधमाश्यांच्या या कष्टातून खूप काही शिकण्यासारखे आहे. हा कीटक आहे किती छोटा, पण त्याच्या कष्टातून खूप मोठा संदेश मिळत असतो. वसंत ऋतूत भरलेले मधुघट त्यांच्या गंधातून अस्तित्वाची जाणीव करून देतात. याची चव सोडा, याचा गंधही अगदी काळजात घुसतो. याच्या गंधाने दीर्घकाळ एक सुखाची अनुभूती घेतल्याचा आनंद मिळून जातो.





























































