कवडसे – भा स आ भा स

>> महेंद्र पाटील

गेले काही दिवस आपली भेट होता होत नव्हती. कधीतरी चार-सहा महिन्यांतून एकदा आपण सहज बोलता बोलता लवकरच भेटू या असं ठरवायचो. तशी आपली ओळख खूप जुनी, पण भेटी मात्र जास्त झाल्या नव्हत्या कधी. शाळा सुटली तशी तू कधीच समोर आली नाहीस जास्त. कधीतरी जाताना येताना दिसायची आणि पुढे निघून जायची. मी तुला ओळखायचो, पण तू मला ओळखत नव्हतीस. कधीतरी ओळख होईल आपली असं नेहमी वाटतं राहायचं. काळ पुढे पुढे सरकत गेला आणि तू कुठे गेलीस, समजलंसुद्धा नाही….आणि पुन्हा एक तप ओलांडून गेल्यावर तू अचानक, ध्यानीमनी नसताना संपर्कात आलीस…आणि आपला खऱया अर्थाने संवाद सुरू झाला. इतकी वर्षे मी तुला ओळखत होतो आणि आता तूही मला ओळखू लागली होतीस…आणि आपण बोलत गेलो. मनातल्या मनात दूरवर चालत गेलो. असं वाटलं, ज्या क्षणांची आपण वाट पाहत होतो ते क्षण आपसूक समोर आले. कधी कधी खूप खडतर वाटणाऱया गोष्टी सहज समोर येतात तेव्हा आपलाच आपल्या प्राक्तनावर विश्वास बसत नाही. कालपरवापर्यंत अशक्यप्राय वाटणारी आपली भेटसुद्धा सहज झाली आणि एक नवं पर्व सुरू झालं. मनात नव्या आशा पल्लवित झाल्या. इतकी वर्षे तुझी वाट पाहिल्यावर तू माझ्या समोर आहेस हे माझ्यासाठी स्वप्नवत होतं…आणि तुझ्याबद्दल माझ्या मनाने पाहिलेली सगळी स्वप्नं आता खरी होतील असं वाटू लागलं असताना स्वप्नांना न आवडणारं एक सत्यसुद्धा तुझ्या सोबत होतं.

तू समोर होतीस, बोलत होतीस, हसत होतीस, पण तू माझी नव्हतीस. हेच सत्य मनाला बेचैन करून जात होतं, पण तरी तुझ्या आयुष्यातील सत्य हे तुला प्रिय असायला हवं आणि ते नियतीने ठरवलेलं तुझं प्राक्तन आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा आदर करायला हवा म्हणून त्या सत्यासकट तुझं माझ्या सोबत असणंही मी मनोमन स्वीकारलं. पुढे तू पुन्हा हरवल्यासारखी वाटलीस. पुन्हा काळ पुढे पुढे सरकू लागला आणि आता आपली भेट ठरवूनसुद्धा राहून जायची. परवासुद्धा आपण बोलता बोलता भेटायचं ठरवू लागलो, पण मनात विचार आला, आपण भेटायचं म्हणजे कुणाला? तीच जी कधीकाळी अनोळखी होती आणि जाता येता अबोल भेट व्हायची तिला….की जी पुन्हा भेटल्यावर खूप काही बोलायची, नेमकं तुझ्या कोणत्या रूपाला भेटू पाहत होतं माझं मन?

तोच प्रश्न मी तुलाही विचारला तेव्हा तू म्हणालीस, मी आता पूर्वीसारखी राहिली नाहीयेस. मी तिला म्हटलं, आपण एकमेकांना ओळखायला लागलो तेव्हा तू जशी होतीस तशी मला हवी आहेस. तू म्हणालीस, कठीण आहे आता तसं. मी विचारलं, ‘‘कुठं गेलं तुझं प्रेम?’’ तेव्हा तू म्हणालीस, ‘‘ते कदाचित प्रेम नसून एक भास होता.’’ असं बोलून तू अबोल झालीस. कारण तू खूप दूर निघून आलीस त्या वळणावरून आणि आता तूच तुला ओळखत नव्हतीस. ओळख म्हणजे नक्की काय? एकमेकांच्या मनाला ओळखून एकमेकांशी बोलत जाणं. कधीतरी मनाला वाटेल तेव्हा भेटायला येणं, पण प्रत्येक नव्या भेटीत प्रेमाचं स्वरूप बदललेलं असावं. ओळख चेहऱयाची नसावी, मनाची असावी तू प्रेमाला भास म्हणालीस….आणि विषय बंद झाला, पण मी विचार करत राहिलो…भास आणि आभासाच्या पलीकडे असतं प्रेम. ते एकदा मनात आलं की, मनातच घर करून राहतं. तुझ्याही मनात ते आहेच आणि माझ्याही. मी फक्त ते व्यक्त केलं आणि तू अव्यक्त राहिलीस. तू तुझ्या मनाची कवाडं बंद करून बंदिस्त करून ठेवलंस आणि भास असं गोड नाव दिलंस, पण माझ्या मनात मात्र अनेक आभास निर्माण करून गेलीस.

आता भेट झालीच कधी चुकून आपली तर भेटून पाहू. जमलं तर त्याच जुन्या वळणावर चालून पाहू. कदाचित तुझा भास तुझ्या मनाचे कवाड तोडून बाहेर येईल नाहीतर परतीच्या वाटेवर चालता चालता मीसुद्धा माझ्या मनाची कवाडं बंद करून ती किल्ली फेकून देईन आठवणींच्या महासागरात…!
 [email protected]