ठसा – डॉ. दिलीप मालखेडे

>> महेश उपदेव

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला शैक्षणिक क्षेत्रात स्वतःची ओळख मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणारे असाच कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचा वैदर्भीय शैक्षणिक वर्तुळात परिचय होता. डॉ. दिलीप मालखेडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी क्रेडिट बेस्ट चॉइस सिस्टीम सुरू केली होती. एका दुर्दम्य आजाराशी लढताना त्यांची प्राणज्योत मालवली. अमरावतीकरांना त्यांची आठवण कायम राहील. कुलगुरू म्हणून डॉ. मालखेडे यांनी 11 सप्टेंबर 2021 रोजी अमरावती विद्यापीठाची सूत्रे सांभाळली होती. ते आधी पुणे येथील शासकीय कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे यांत्रिकी, अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक होते. मात्र नंतर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली होती. डॉ. मालखेडे हे दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार – 1 या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत होते. मालखेडे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग या शाखेतून पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे (एमई) शिक्षण घेतले. मुंबई आयआयटीमधून त्यांनी संशोधन कार्य करीत पीएचडी प्राप्त केली होती. त्यांनी कुलगुरूपदाच्या आपल्या कार्यकाळात विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यांच्यासोबत करार केला होता. नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकता यावे याकरिता त्यांनी अमरावती विद्यापीठात सर्व विषयांसाठी क्रेडिट बेस्ट चॉइस सिस्टीमसुद्धा लागू केली होती.

तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना शिक्षण क्षेत्रात व्यक्त केली जात आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आठवे कुलगुरू या नात्याने त्यांनी विद्यापीठाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, विद्यापीठांशी करार केले होते. विद्यापीठाच्या विद्यार्थी वस्तीगृहासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय स्तरावरील हंकेतहॉन स्पर्धेचे आयोजन त्यांच्या पुढाकाराने होऊ शकले होते. मागासवर्गीय आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ‘ऑनलाइन’ प्रणाली लागू करणारे डॉ. मालखेडेच होते. शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात आला होता. राज्य शासनाचा उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण मंत्रालय हा उपक्रम चांगल्या रीतीने राबविला. पाचही जिह्यांत स्टुडंट इंडक्शन कार्यक्रमाचे त्यांनी यशस्वी आयोजन केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेक संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. विद्यापीठ परिसरात एकूण सात अभ्यासिका चोवीस तास सुरू केल्या, त्याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला. डॉ. मालखेडे यांच्या कार्यकाळात विद्यापीठाला ऊर्जा संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.