
>>मानसी गोखले
रांगोळी म्हणजे नुसतं चित्र नसतं. तर सहकार्याची, सामावून घेण्याची, सर्जनतेची, प्रोत्साहन देण्याची, आत्मविश्वास देण्याची आणि विस्कटलेलं सावरण्याची – सहिष्णुतेच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणजे रांगोळी. दिवाळी रांगोळीची नोंद गिनीज बुकात केली पाहिजे. लक्ष्मीपूजन झालं की झुंडीने हळदी-कुंकवाला जाणे आणि प्रत्येकीच्या रांगोळीचं कौतुक करणं हा एक अद्वितीय आनंदसोहळा असतो.
हल्ली दिवाळी पूर्वीसारखी 7-8 दिवसांची राहिली नाही. दोन किंवा तीन दिवसांची झाली आहे. नेमकं ऑफिसमध्ये खूप काम आहे. मी ते आटपून घरी आले. गाडी पार्क केली तेवढ्यात बॉसचा फोन आला. खांदा आणि कानाच्या मध्ये मान तिरकी करून फोन धरलेला, कॉल घेताघेताच मी घरात प्रवेश केला. दारात माझी मुलगी काहीतरी करत बसली होती आणि घरात शिरता शिरता कशाला तरी माझा धक्का लागला आणि मुलगी एकदम किंचाळलीच, ‘आई, माझी रांगोळी!’
मी कशीबशी स्वतःला सावरत आत शिरले. कॉल संपवला. आणि मला एकदम जाणीव झाली की येताना आपण सोनूची रांगोळी विस्कटली आणि मला खूप वाईट वाटले.
पुठ्ठय़ांच्या ब्लॉकची ती रांगोळी होती. माझ्या पायाने विस्कटलेले ब्लॉक्स तिने परत जोडले आणि तिची रांगोळी क्षणात परत झाली होती. त्या रांगोळीकडे पाहात मला एकदम माझ्या लहानपणीची आठवण झाली. दसरा झाला की एक-दोन दिवसांत आजी आम्हाला हाक मारायची अरे, जरा तो तुळशी वृंदावनाच्या शेजारचा भाग जरा साफ करा बरं. माझं आणि माझ्या भावाचे हे आवडते काम. कारण कुदळ, फावडं, खुरपं यांच्या बरोबर खेळायला मिळायचं. ते नेमके अभ्यासाचे दिवस पण हे काम आजीने सांगितले असल्याने आई-बाबा पण ओरडायचे नाहीत. भरपूर टाइमपास करून मी आणि माझा भाऊ मिळून तो कोपरा छान साफ-सपाट करून द्यायचो. मग आजी पुढचे 3-4 दिवस रोज तुळशीला पाणी टाकून झाले की त्यावर सडा टाकायची. मग एक दिवस कामवाल्या मावशी येतानाच भलामोठा शेणाचा गोळा घेऊन यायच्या आणि बरोबर 2 बाय 2 चा भाग छान सारवून ठेवायच्या. त्या मेहंदी रंगाचा एक वास पण असायचा. तो रंग आणि वास एकदम सगळ्या घराला प्रसन्न करून जायचा. मग आईची ऑर्डर निघायची आणि तो सारवलेला भाग खराब होऊ नये म्हणून त्याच्या चारही बाजूनी कुंडय़ा ठेवून तो आरक्षित केला जायचा. आजीचं रोज सकाळी त्यावर पाणी मारून त्याला कुरवाळणं चालूच असायचं. दिवाळीत रांगोळी काढण्यासाठीची ही सगळी पूर्वतयारी.
आजूबाजूच्या सगळ्याच घरात थोडय़ाफार फरकाने असाच एक तुकडा सज्ज होत असायचा. शेजारचे एकजण त्यावर गेरू फिरवायचे. त्यांचा बेस तपकिरी-चॉकलेटी-केशरी-भगवा या सगळ्या रंगाच्या मिश्रणातून जो रंग होईल त्या रंगाचा व्हायचा. तर बाजूच्या एका बंगल्यात त्यांनी 2 बाय 2 चा कडप्पाचं अंगणात बसवून घेतला होता. खरं तर मला नेहमीच प्रश्न पडायचा की, दिवाळीत रांगोळी का काढतात? पण सगळेच काढायचे. वसुबारसेला सगळ्यांच्या त्या 2 बाय 2 तुकडय़ाचं ओपनिंग व्हायचं. संध्याकाळी 4 च्या आसपास प्रत्येक घरापुढे साळकाया -माळकाया दिसू लागायच्या. वसुबारस आणि धनत्रयोदशीच्या रांगोळ्या म्हणजे प्रॅक्टिस असायची. लक्ष्मीपूजन, पाडवा या दिवशी काढायच्या रांगोळ्यांच्या प्रोटोटाईप असायच्या. सगळ्याजणी आपापले हात साफ करून घ्यायच्या. आपापली काढून झाली की शेजारच्या 4-5 घरात डोकावणं हे तेव्हा कायद्याने बंधनकारकच होतं. दुसऱ्याला सल्ले देणं. जमलंच तर लगेच बसून दुसऱ्याच्या रांगोळीत व्हॅल्यू अॅडिशन करावी. कुठलं रंगांचं कॉम्बिनेशन छान दिसेल याचा सल्ला द्यावा. एकूणच दिवाळीतील रांगोळी काढण्याएवढी निकोप स्पर्धा मी दुसरी कुठलीच पाहिली नाही.
एखाद्या वर्षी 4-6 महिन्यांपूर्वी एखाद्या घरात वाईट घटना घडून गेली असायची. त्या घराचा दिवाळी साजरी करायचा मूड नसायचा. स्वाभाविकच आहे. शांतताच असायची त्या घरात. पण आपली रांगोळी झाली की कोणीतरी काकू – मावशी त्या घरी जायची. वहिनी.. या जरा हळद -कुंकू घेऊन.. अशी हाक जायची. वाहिनी येईपर्यंत काकू /मावशीने छोटीशी पण सुबक, शास्त्रापुरती रांगोळी काढलेली असायची आणि ती माऊली वहिनींना चार दांडय़ा काढायचा आग्रह करायची. ती रांगोळी नसायचीच तर त्या वहिनींनी आपलं दुःख मागे सारून केलेला पुनःश्च हरी ओम असायचा तो.
लक्ष्मीपूजेच्या दिवशी ठिपक्यांची रांगोळी असायची. कोणी -कोणी 16 बाय 16 किंवा 32 बाय 32 ठिपक्यांच्या रांगोळ्या काढायच्या. घरातल्या 4 बायका चार कोपऱ्यावर बसून, एकच रांगोळीचं पुस्तक एकमेकांकडे फिरवत, एकाच गतीने इतकी सिमिट्रिकल रांगोळी कशी काढू शकतात? रेघांची जाडीसुद्धा सेम असते. कमी जास्त असलीच तर रंग भरताना ती इतक्या बेमालूमपणे झाकली जाते की त्यांनासुद्धा आपण कुठला भाग काढला होता ते आठवू नये.
पाडव्याची रांगोळी मात्र फ्री हॅण्ड असायची. डिझाईन काढायचं. मोर, फुलपाखरू, गुलाब, गुच्छ हे आवडतीचे विषय कारण त्यांत रंगरंगोटी करायला भरपूर वाव असायचा. चाळणी किंवा कापडातून गाळून शेडिंग करणे हे यातलं कौशल्य. त्यात हातखंडा असणाऱ्या 2-4 जणींची रांगोळी पाहायला खास गर्दी व्हायची. तसा हा सगळा महिलावर्गाचा प्रांत. पण आमच्या कॉलनीतील एक मुलगा अतिशय छान रांगोळी काढायचा. ते दृश्यच मोठं विलक्षण असायचं. तो रांगोळी काढतो आहे आणि आजूबाजूला 12-15 जणींचा महिलावर्ग त्याची कारागिरी बघता आहेत.
भाऊबीजेची रांगोळी ही खास माहेरवाशिणी स्पेशल. भाऊबिजेसाठी माहेरी आलेला भगिनीवर्ग त्या दिवशी हातभार लावायचा त्यामुळे त्या दिवशीचा रांगोळी-कौतुकाला एक वेगळाच हळवेपणा असायचा. हे चारही दिवस मुलांनी मधे-मधे करू नये म्हणून त्यांना त्यांचे वेगळे रंग-रांगोळी दिलेली असायची. त्या छप्प्यांचंही तेवढंच कौतुक व्हायचं. आणि मला एकदम त्या प्रसंगाची आठवण झाली. पाडव्याच्या दिवशी मी निगुतीने काढलेली रांगोळी माझ्या भावाने कुत्र्याला मारण्याच्या नादात विस्कटली. मी त्रागा करत रांगोळीपाशी गेले. पण आजीने विस्कटलेली रांगोळी ठीक केली. ती विस्कटून फुललेली रांगोळी अधिक रेखीव दिसत होती. हा रांगोळी विस्कटण्याचा, जोडण्याचा आणि मुळात खपून काहीतरी निर्मिण्याचा, त्यातून पुन्हा फुलवण्याचा अनुभव समृद्ध करणारा ठरला.
रांगोळी म्हणजे नुसतं चित्र नसतं. तर सहकार्याची, सामावून घेण्याची, सर्जनतेची, प्रोत्साहन देण्याची, आत्मविश्वास देण्याची आणि विस्कटलेलं सावरण्याची – सहिष्णुतेच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणजे म्हणजे रांगोळी. आज मला कळतंय की दिवाळीत रांगोळी का काढतात. कोरोनाने विस्कटलेल्या काळात तर कधी नव्हे तर रांगोळीची एवढी गरज आहे. चला पुन्हा एकदा जीवनात रंग भरूया आणि दिवाळीच्या निमित्ताने पुनःश्च हरी ओम करूया!



























































