ठसा – हुकमीचंद चोरडिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

‘सुहाना-प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे नुकतेच निधन झाले. व्यवसाय करताना अत्यंत आधुनिकता आणि व्यक्तिगत जीवनात साधेपणा हे हुकमीचंद यांचे वैशिष्टय़ होते. मसाले आणि लोणची या उद्योगातील अध्वर्यू अशी ओळख असलेले हुकमीचंद यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1930 रोजी नगर जिह्यातील पारनेर येथे झाला होता. कमलबाई यांच्यासोबत लग्नानंतर काही काळ ते सोलापूर जिह्यातही वास्तव्याला होते. तेथे त्यांनी ‘आनंद मसाला’ हा घरगुती मसाले तयार करून विक्री करण्याचा उद्योग केला होता. पुढे पुण्यात हडपसर परिसरात नोकरी करत असतानाच घरोघरी फिरून मसाले विक्रीला सुरुवात केली. मिरची बियाणे विक्री करता करताच हुकमीचंद यांना मसाला तयार करण्याची कल्पना सुचली होती. त्यामुळे ‘गरम मसाला’ आणि सोबतच ‘कांदा-लसूण मसाला’ तयार करून घरोघरी विक्रीला सुरुवात केली. 1960 मध्ये त्यांनी ‘प्रवीण मसाले’ या नावाने व्यवसाय सुरू केला. पहिली दहा वर्षे अत्यंत कष्ट करून पुढे हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथेच मोठी जागा घेऊन 1972 मध्ये व्यवसायाचा विस्तार केला. 1976 मध्ये सुमारे 500 किलो लोणचे तयार करून त्यांनी बाजारात ‘प्रवीण’ची उत्पादने विक्रीसाठी आणली. त्या व्यवसायाचा विस्तार आता चौथी पिढी करत आहे. हिंदुस्थानात दहा कारखाने आणि विक्री केंद्रे उभी करण्यात महत्त्वाचे मार्गदर्शन हुकमीचंद यांनी केले होते. ‘प्रवीण’सोबतच ‘सुहाना’ आणि ‘अंबारी’ हे ब्रँड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. व्यवसाय करताना अत्यंत आधुनिकता आणि व्यक्तिगत जीवनात साधेपणा हे हुकमीचंद यांचे वैशिष्टय़ होते. शिवाय, व्यापारी पेठांमध्ये ‘कैरी आणि मिरची’ या उत्पादनांमध्ये हुकमीचंद यांचा शब्द प्रमाण मानला जाई. रुग्णालय, शैक्षणिक संस्था, समाजातील गरजू, सैनिक यांच्या मदत निधीसाठी ते अग्रभागी असत. 1983 मध्ये लघुउद्योग महासंघाचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला होता. 1991-92 मध्ये आंबा महोत्सवामध्ये ‘प्रवीण लोणचे’ या उत्पादनाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. लौकिकार्थाने यशस्वी, पण तरीही प्रसिद्धीपासून दूर असलेले हुकमीचंद चोरडिया यांच्या जीवनप्रवासाचे चित्रण करणारे ‘बिकट वाट यशाची’ हे मधुबाला राजकुमार चोरडिया यांनी लिहिलेले पुस्तक लक्षणीय ठरले आहे.