
>>>नमिता दामले
लक्ष्मण सत्या यांनी पेन्सिल्व्हॅनिया विद्यापीठातून पर्यावरण, वसाहतवाद आणि पशुधन या विषयावर लिहिलेल्या पीएच.डी.च्या प्रबंधाचे ‘कापूसकोंड्याची गोष्ट’ हे नंदा खरे यांनी केलेले मराठी भाषांतर आहे. सत्या यांच्या संशोधनाचा विषय गहन आहे आणि वसाहतवादी इतिहासावर आधारित आहे. ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांनी पूर्वीही ऐतिहासिक विषयांवर लिहिले आहे.
मध्य हिंदुस्थानच्या वऱ्हाड क्षेत्राचा हा अभ्यास आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी पूर्णेचे पाणलोट क्षेत्र असलेला हा प्रदेश गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी, फळे, भाज्या, मसाले, ऊस, तंबाखू, अफू अशा विविध पिकांनी सुफलाम होता. पशुधन आणि शेती एकमेकांवर अवलंबून असून एकेमकांच्या जोपसनेची स्वतंत्र अशी सामाजिक व्यवस्था होती. सामायिक कुरणे होती. जमिनीचा कस कायम कसा राहील याची काळजी घेणारी पीक पद्धती आणि सिंचन व्यवस्था होती. विपुल बने आणि चराऊ कुरणे होती. जनावरांचे वाण उत्तम होते. मग या सर्वांचा ऱ्हास का झाला? वारंवार दुष्काळ का पडू लागले. पशुधनाची हानी का झाली? याची कारणे सरकार दरबारी काय नोंदवली गेली आणि सत्य परिस्थिती काय होती? या साऱ्यांचा हा अभ्यास इतिहास आणि वर्तमान दोन्हीही दृष्टींनी तितकाच महत्त्वाचा आहे.
वसाहतवादी धोरण हे संपूर्णतः ब्रिटिशांच्या गरजा आणि अधिकाधिक करवसुली यावर आधारित होते. हिंदुस्थानी कापसाची वाढती मागणी पुरवण्यासाठी वनांची आणि चराऊ कुरणांची जमीन लागवडीखाली आणून शेतकऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत पिके येऊन भिडली. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे जमिनीच्या कसावर आणि पशुधनावर जे दूरगामी परिणाम झाले त्याचा थेट संबंध मानवी जीवनाशी दुष्काळ आणि रोगराईशी होता. वर्तमानातील शेती आणि पर्यावरण विषयक समस्याही नगदी पिकांच्या हव्यासामुळे तीक्रतर होत आहेत का, असा थेट प्रश्न हे पुस्तक वाचून आपल्यासमोर येतो.
कापूसकोंड्याची गोष्ट
अनुवाद : नंदा खरे
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे
पृष्ठ : 131, मूल्य रु. 250/-.





























































