संस्कृतप्रवाह’ – भास-आद्य नाटककार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्राची मोघे

अश्वघोषानंतरचा आणि कालिदासाच्या आधीचा एक महत्त्वाचा साहित्यिक म्हणजे भास. संस्कृत नाटकांच्या मांदियाळीत लखलखणारा एक तारा. भासाच्या काळाबद्दल अभ्यासकांत मतभेद आहेत. इसवी सनपूर्व पहिल्या शतकात भास हे नाव लोकप्रिय होते असे आढळून येते.

भास म्हणजे भासमान होणारा, प्रकाशमान असलेला. संस्कृत नाटकांच्या मांदियाळीत लखलखणारा एक तारा. काव्येषु नाटकं रम्यम्…अभिजात संस्कृत साहित्यात श्राव्य काव्य म्हणजे ऐकणारे काव्य आणि दृश्यकाव्य म्हणजे बघताही येणारे काव्य. म्हणजेच नाटक. संस्कृत नाटय़सृष्टीचा आद्य नाटककार म्हणजे भास.

अश्वघोषानंतरचा आणि कालिदासाच्या आधीचा एक महत्त्वाचा साहित्यिक. भासाच्या काळाबद्दल अभ्यासकांत मतभेद आहेत. इसवी सनपूर्व पहिल्या शतकात भास हे नाव लोकप्रिय होते असे आढळून येते. तो साधारण इसवी सनपूर्व दुसऱया शतकात होऊन गेला असे म्हणावयास हरकत नाही. कारण त्याच्या 13 नाटय़कृतींतील भाषा आणि संस्कृती या काळाशी साम्य दर्शवते. महाकवी कालिदासाने त्याच्या पहिल्याच नाटकात ‘मालविकाग्निमित्र’ या नाटकाच्या पहिल्या अंकात भासाचा सौमिलक आणि कविपुत्र या पूर्वसुरींबरोबर अतिशय आदराने उल्लेख केला आहे. बाणभट्ट राजशेखर आणि अभिनव गुप्ता यांनीही भासाचे गोडवे गायले आहेत. त्याच्या 13 नाटकांपैकी ‘स्वप्नवासवदत्त’ हे नाटक खूपच लोकप्रिय झाले होते. कारण इसवी सन नववे ते बारावे शतक या काळातील साहित्यशास्त्रातील ग्रंथ, टीका यात त्याचा उल्लेख वारंवार येतो. राजशेखरने त्याच्या ‘काव्यमीमांसा’ या ग्रंथात असे म्हटले आहे की, भासाची नाटकपो जर सोनाराच्या मुशीत घातली आणि त्या भट्टीत तावून सुलाखून निघाल्यावर ‘स्वप्नवासवदत्त’सारखे बावनकशी सोने बाहेर पडते. भास हा एक चतुरस्र, प्रतिभावान आणि लोकाभिमुख साहित्यिक होता.

भास हा कुठल्या राजाच्या दरबारी राजकवी होता का? याची माहिती मिळत नाही. त्याच्या काही नाटकांत ‘राजसिंह’ असा उल्लेख येतो. भास विष्णुभक्त होता. त्याने आपल्या प्रत्येक नाटकाच्या नांदी श्लोकात विष्णूच्या प्रत्येक अवताराची स्तुती केली आहे.भासाच्या काळात वैष्णव संप्रदायाचा उगम झाला. पांचरात्र संहिता अस्तित्वात आली होती. विष्णूचे अवतार प्रसिद्ध झाले होते असे दिसून येते.

अनेक वर्षे भासाची नाटके अज्ञात राहिली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सन 1912 मध्ये केरळमधील संस्कृत पंडित टी.गणपतीशास्त्राr यांना केरळमधील कोडीयाट्टम या पारंपरिक कलेत वापरली जाणारी संस्कृत नाटकं मिळाली. त्यानंतर त्यांनी शोध घेतला असता त्यांना त्रिवेंद्रमच्या ओरिएंटल हस्तलिखित ग्रंथालयात जुन्या मल्याळम लिपीत लिहिलेली 13 नाटके मिळाली ती अशी – स्वप्नवासवदत्तम, प्रतिज्ञायौगंधरायण, पांचरात्र, चारुदत्त, दूतघटोत्कच, अविमारक, बालचरित, मध्यमव्यायोग, कर्णभार, ऊरूभंग, अभिषेक, प्रतिमा नाटक आणि दूतवाक्य. गणपतीशास्त्राRनी ऐतिहासिक आणि वाङ्मयीन दृष्टिकोनातून अध्ययन करून ही सर्व नाटके भासाचीच असल्याचे सिद्ध केले. यावर अनेक वर्षे वाद-प्रतिवाद होत राहिले. भासाचे हे नाटकपा नक्की भासाचेच ना, यावर वाद झाले. ही सर्व नाटके एकच आहेत का? भासाने लिहिलेल्या मूळ कथानकांवर दुसऱया नाटककारांनी ही नाटके लिहिली आहेत. काही इतिहासकारांच्या मते ही सर्व नाटके शक्तिभार या नाटककाराची किंवा पल्लव राजा नरसिंह वर्मन किंवा पांडय़ राजा तेन्मारन याची असावीत, परंतु आता सर्व अभ्यासकांचे एकमत आहे की, ही भासाचीच नाटके आहेत.

या नाटकांचे वर्गीकरण केले असता असे लक्षात येत की –
रामायणावर आधारित नाटके- प्रतिमा आणि अभिषेक, महाभारतावर आधारित नाटके- पांचरात्र, मध्यमव्यायोग, दूत घटोत्कच, दूतवाक्य, ऊरूभंग, कर्णभार, बालचरित. स्वतंत्र कथानके असलेली नाटके – परिकथेवर आधारित अविमारक तसेच अर्धे राहिलेले ‘दरिद्री चारुदत्त’, जे वसंतसेना, ही रूपगर्विता, श्रीमंत गणिका नायिका आहे आणि व्यापारात खोट आल्यामुळे दरिद्री झालेला चारुदत्त हा ब्राह्मण युवक यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. हीच कथा घेऊन पुढे शूद्रकाने ‘मृच्छकटिक’ लिहिले नि ते अजरामर झाले. ‘प्रतिज्ञायौगन्धरायण’ आणि ‘स्वप्नवासवदत्तम्’ ही दोन्ही नाटके बृहत्कथा आणि कथासरित्सागरातील उदयन राजाच्या कथेवर आधारित आहेत. ‘स्वप्नवासवदत्तम्’ हा भासाच्या प्रतिभेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार आहे.

संस्कृत नाटककारांना भरतमुनीचे नाटय़शास्त्र शिरोधार्य असते. अनेक नाटककार नाटय़शास्त्रातील दंडक नेमाने पाळतात, पण भास हा त्याला खणखणीत अपवाद आहे. भरताच्या नाटय़शास्त्राचा काळ हा इसवी सनपूर्व दोनशे मानला जातो. रंगमंचावर प्रत्यक्ष लढाई दाखवायला आणि मृत्यू दाखवायला भरताने मनाई केली आहे, पण भासाने मात्र ‘प्रतिमा’ नाटकात दशरथाचा मृत्यू, ‘अभिषेक’ नाटकात वालीवध, ‘बालचरिता’त चाणूर, मुष्टिच, कंस यांचा वध तर ‘उरूभंग’मध्ये भीम आणि दुर्योधनाचे गदायुद्ध, द्वंद्व आणि शेवटी दुर्योधनाचा मृत्यू दाखविले आहेत. यावरून असाही एक मतप्रवाह आहे की, भास हा भरतमुनीच्या आधी झाला असावा. काही अभ्यासकांच्या मते तो बंडखोर नाटककार आहे.

भासाच्या नाटकातील प्राकृत भाषाही प्राचीन वाटते. संस्कृत व्याकरणही थोडे वेगळे आहे. त्याची भाषा ग्रांथिक न वाटता लोकभाषा वाटते.

त्याच्या नाटकांत विविध धर्म, संप्रदायांची माहिती मिळते. जैन आणि बौद्ध धर्मातील भिक्षू आहेत. ‘अविमारक’ नाटकात जैन धर्मातील नग्न श्रमणिकेचा उल्लेख येतो. ‘स्वप्नवासवदत्ता’त बलरामाचा आणि त्याच्या पंथाचे अनुयायी जे मदिरासक्त आहेत, त्याचे चित्रण येते. ‘बालचरिता’त गोपींनी कृष्णाबरोबर केलेल्या रापीडेचा उल्लेख येतो. तत्कालीन जीवनाचे मनोरम चित्रण त्याच्या नाटकांत आढळते.
नाटकाची भाषा – मग ती संस्कृत असो अथवा प्राकृत – अप्रतिम आहे. या सर्व नाटकांत मानवी जीवनाचे सारे पैलू, मनुष्य स्वभावाचे कंगोरे… सारे काही अत्यंत सुरेख पद्धतीने व्यक्त झाले आहेत.
त्याची शैली ही वैदर्भीरीती असून प्रवाही आहे. नाटय़रचनेचे कलाकौशल्य भासाने आत्मसात केले आहे यात शंका नाही.नाटकांतील संवाद छोटे, चुरचुरीत, योग्य आणि चमकदार आहेत.तो कुठलेही गिमिक वापरत नाही. त्याच्या मौन राहण्यातून, त्या स्तब्धतेतून सारे काही व्यक्त होते. प्रतिमा नाटकातील मृत राजांच्या प्रतिमा असलेले प्रतिमागृह, त्यातील दशरथाची प्रतिमा यातून भरताला कळलेली दशरथाच्या मृत्यूची बातमी या प्रसंगात भरत जसा स्तब्ध होतो तशीच अवस्था वाचकाची/प्रेक्षकाची होते.

आर्ष महाकाव्ये, विशेषत महाभारत, यातील कथानके अत्यंत रोचक आणि नावीन्यपणे मांडणारा भास हा नाटय़कलेतील एक प्रतिभावान आणि प्रयोगशील कथाकार आहे. रंगमंचावरील प्रत्येक घटना, संवाद, ती वेगळ्या ढंगातील पात्रे, कथा, उपकथा यात रसिक गुंतून पडतो. त्याच्या बहुतांशी नाटकांचा स्थायिभाव वीररस आहे.रंगमंचावर द्वंद्व, युद्ध, वध अशी अनेक दृश्ये प्रत्यक्ष बघताना रसिकांना थरार अनुभवायला मिळत असेल यात शंकाच नाही. ‘दूतवाक्या’तील कृष्णशिष्टाई राजनीतीमधील शिष्टाईचा एक अजोड नमुना आहे. या नाटकात मंखविधा म्हणजे चित्राच्या माध्यमातून गोष्ट सांगणे या कलेचा सुयोग्य वापर केला आहे. तसेच मानवी शस्त्रांचा वापर असेल किंवा शेवटच्या दृश्यात कृष्णाचे विश्वरूप दर्शन आणि त्याच्या आयुधांचे म्हणजे सुदर्शनपा आणि कौमोदकी गदा यांचे आयुध पुरूषदर्शन हे सारेच नाटय़कलेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. ‘कर्णभार’ नाटकातील कर्णाची चिरंतन वेदना रसिकांच्य हृदयात कळ उमटवते.अशी अनेक उदाहरणे आहेत.आपण पुढील लेखात या सर्वांचा धांडोळा घेऊ.

(लेखिका पुरातत्वशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत)