कोविडचा अंधार आणि दिवाळीचा दिवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. प्रदीप आवटे

आपण खूप प्रगती केली आहे. विज्ञानाने नवनवी क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. नवा कोवीड-19 विषाणू आल्याबरोबर वर्षभरात त्यावर लस निर्माण होण्याइतके आपण प्रगत झालो आहोत. कोणत्याही आजारावर मात करण्याकरिता आपले सर्वेक्षण दक्ष असावे लागते, कारण पण साथ केवळ कोरोनासारख्या विषाणूंची नसते आणि विषाणू केवळ कोरोना, स्वाइन फ्ल्यूसारखे सूक्ष्मजीव नसतात. आपल्या पृथ्वीतलावर लाखो विषाणू आपल्याही आधीपासून अस्तित्वात आहेत. त्याचे भान ठेवूनच यापुढे तरी आपल्याला वागावे लागणार आहे.

धरतीवरती उतरूनी आले, आभाळीचे दिवे
गडय़ा रे रूप घेऊनी नवे
धरती नटली सुंदर अभिनव
अंधाराचा आज पराभव
प्रकाशपाखरांचे भुईवर उतरूनी आले थवे
आत आत उजेड पेटू दे
माणसास माणूस भेटू दे
द्वेष, सूड अवघेच जळू दे, आज तिमिरासवे
तुझे नि माझे दुःख सरू दे
समस्त जगती पीडा नुरू दे
आनंदाची तान घुमू दे, आपुल्या श्वासांसवे

गॅलरीतून दूर बाहेर पाहत मी माझीच कविता गुणगुणतो आहे. दिवाळी आली आहे. अंधाराच्या काळय़ाकभिन्न पहाडावर इवल्या इवल्या दिव्यांनी कविता लिहायला सुरुवात केली आहे. बोचऱया थंडीला न जुमानता दिवाळीचे उटणे, तेल लावत अभ्यंगस्नान करण्यात पहाट रममाण झाली आहे. या वर्षी आपण सोसलेली सारी पीडा, साऱया वेदना सर्वांगाला उटणे चोळणाऱया मायाळू हाताच्या स्पर्शाने नाहीशा व्हाव्यात, असे क्षण घराघरांत साकार होताहेत.

मागच्या 31 डिसेंबरला मध्यरात्री आपण किती जल्लोष केला होता. नव्या वर्षाचं किती जोरात स्वागत केलं होतं, नेहमीप्रमाणे पण किती कठीण होतं हे वर्ष! या वर्षाच्या देखण्या पुडक्यात कोरोना नावाचा विषाणू घुसला होता. तेव्हा तो आपल्याला जाणवला नाही, पण हळूहळू तो बाहेर पडला. उघडय़ा डोळय़ांना न दिसणारा सूक्ष्मजीव पण त्याची ताकद अफाट. एकाचे दोन, दोनाचे आठ आणि मग हजारो लाखो शरीरांत तो फिरत राहिला. जगभरात बसची, रेल्वेची, अगदी विमानाची चाके थांबली. रस्ते ओस पडले, पेठा सुनसान झाल्या, मॉल, थिएटर , जीम सारं सारं बंद. लॉक डाऊन. या सूक्ष्म जीवाच्या भीतीने आपण स्वतःलाच काsंडून घेतलं. इलाज नव्हता. बाहेर पडलो तर तो गाठेल, पकडेल अशी भीती सर्वदूर पसरली होती. आजही ती पूर्ण संपलेली नाही. आपल्यापैकी अनेकांना कोरोनाच्या विषाणूने गाठले. आपल्यापैकी अनेकांच्या प्रिय व्यक्ती या विषाणूच्या प्रकोपामध्ये काळाच्या पडद्याआड लुप्त झाल्या. या रातीनंतर ही दिवाळी आली आहे. ही रात्र सोपी नव्हती. हा अंधार इतका मिट्ट कधीच नव्हता. पण अंधार जेवढा मिट्ट तेवढीच पहाट लख्ख असेल, असणार आहे. हेच सांगत दिवाळी आली आहे.

या कोविडच्या अंधाऱया बोगद्याच्या पलीकडे एक उजेड आता दिसू लागला आहे. महाराष्ट्रातील रुग्ण आणि मृत्यू कमी होताना दिसत आहेत, ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. बस, रेल्वे, विमानांची चाके पुन्हा फिरू लागली आहेत. माणसं पुन्हा नव्या उत्साहाने रस्त्यावर आलेली आहेत. कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. तो पुन्हा कधीही तोंड काढू शकतो, हेही आपण जाणतोच आणि म्हणूनच सारी काळजी घेत आपण पुन्हा नव्याने बाहेर पडलो आहोत. दुसरी लाट येऊ शकते, याची आपल्याला माहिती आहे. काळजी तर घ्यायलाच हवी, न घेऊन कसे चालेल? दूध पोळले की ताकही फुंपून पितो माणूस, हे वाडवडिलांनी दिलेलं शहाणपण दिवाळीचा दिवा होऊन तुमच्या-माझ्या मनात तेवते आहे.

दिवाळीचा प्रत्येक दिवा आपल्याशी काही बोलतो आहे. आपल्याला वाटतं, हे जग केवळ आपलं आहे. आपलं म्हणजे निव्वळ माणसांचं! पण अजूनही आपल्याला अर्जुनाला झाले तसे पुरेसे विश्वदर्शन झालेले नाही. हे जग म्हणजे केवळ मनुष्यप्राणी नव्हे. या पृथ्वीतलावर जगणारे किती तरी प्राणी, वनस्पती, जीवसृष्टी या साऱयांचे आहे हे जग. आता या साध्या कोरोना विषाणूचेच उदाहरण घ्या ना. जगात असे लक्षावधी विषाणू आहेत आणि त्यातील काही हजारच आपल्याला माहीत आहेत. विषाणूंसारखे सूक्ष्मजीव या पृथ्वीतलावर अब्जावधी वर्षांपासून अस्तित्वात आहेत आणि माणसाची गोष्ट त्या तुलनेत अगदी अलीकडची, म्हणजे काही लाख वर्षांची आहे. जगण्याच्या शर्यतीत हे सूक्ष्मजीव आपल्यापेक्षा अधिक स्मार्ट आहेत. गोठलेल्या बर्फापासून उष्ण, उकळत्या समुद्राच्या प्रवाहातही तगून कसे राहायचे हे ते शिकले आहेत. आपली इयत्ता अजून बरीच खालची आहे. ही पृथ्वी आपणा सगळ्यांची आहे याचे भान आपण ठेवले पाहिजे.

आजवरच्या चुकत माकत जगण्यात आपण सगळेच सोबत आहोत. आपण खूप प्रगती केली आहे. विज्ञानाने नवनवी क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. नवा कोविड-19 विषाणू आल्याबरोबर वर्षभरात त्यावर लस निर्माण होण्याइतके आपण प्रगत झालो आहोत. कोणत्याही आजारावर मात करण्याकरिता आपले सर्वेक्षण दक्ष असावे लागते, पण साथ केवळ कोरोनासारख्या विषाणूंची नसते आणि विषाणू केवळ कोरोना, स्वाइन फ्लूसारखे सूक्ष्मजीव नसतात. एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमात कार्यरत माझ्या सहकाऱयांना शुभेच्छा देताना मी एकदा लिहिले होते –

रोमांचित तन, रोमांचित मन
उत्फुल आज अवघा कण कण
आयुष्याचा जगण्या क्षण क्षण
नित्य हवे, दक्ष हवे, आपले सर्वेक्षण
साथ नको लोभाची, क्षोभाची,
द्वेषाची साथ नको
माणूसपण हरविणाऱया
रोगाची साथ नको
प्रेमाचा, प्रज्ञेचा, बुद्धाच्या करुणेचा
हृदयी करा साठा
अंधाराच्या छाताडावर
उजेडाचे घर थाटा
भेदभावाची नको कावीळ
नको ताप तो षड्रिपूंचा
‘मी’ ‘माझे’चा नको विषाणू
नको जिवाणू अहंभावाचा!
अंधार मावळो अनारोग्याचा
प्राचीवरती पहाट नवी
प्रत्येकाच्या यावी अंगणी
म्हणून आपुली साथ हवी
आरोग्याची लावू पणती
आनंद माळू आपल्या भाळी
प्रकाश लेऊ, प्रकाश वाटू
घरोघरी ही येवो दिवाळी!

‘वन हेल्थ’
आपल्याला ‘वन हेल्थ’ नावाची गोष्ट कळली आहे का? माणूस, प्राणी आणि पर्यावरण यांचे आरोग्य एकच आहे. ते सुटेसुटे करून बघता येत नाही. ते एकमेकांवर अवलंबून आहे. तसे तर आपणही प्राणीच पण आपण स्वतःला वेगळे समजतो, हाच मोठा विनोद. पर्यावरणाचा ऱहास करत आपण विकासाची खोटी स्वप्ने पाहू लागतो आणि स्वतःहूनच एक पर्यावरणीय खिडकी सताड उघडून ठेवतो. कोरोनासारखा सूक्ष्मजीव याच खिडकीतून मग आपल्या घरात झेपावतो आणि आपणच पुन्हा विचारतो, हे असे झाले कसे? आपलीच करणी याला कारणीभूत आहे, हे आपण लक्षातच घेत नाही. तो तुळशीच्या जवळ तेवणारा दिवा हेच तर सांगतो आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गपूजा ठायी ठायी दिसते. नागापासून, झाडांपासून अनेक पशुपक्ष्यांपर्यंत साऱयांना आपल्या मिथक कथांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. हे असं एकमेकांत गुंतलेलं जगणं, संस्कृतीने जपलेली ‘देवराई’ आपण विसरत चाललो आहोत. त्याची किंमत आपण या ना त्या रूपात मोजत आहोत.

(लेखक एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्रचे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत.)