सोहळा – गझलेस भावलेला श्रावण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रकाश क्षीरसागर

श्रावणात निसर्ग आपल्या हिरव्या श्रीमंतीने निसर्गप्रेमींचे लक्ष वेधतो. तसाच तो कवीमनालाही ओढ लावतो. क्षणोक्षणी बदलणारे सृष्टीचे रंग आपोआप कवीच्या शब्दांतून पाझरू लागतात. असं हे श्रावणाने कवीमनाला दिलेलं दान शब्दांतून व्यक्त होताना ते केवळ शब्द राहात नाहीत. त्या शब्दांना निसर्गाचं रूप, रंग आणि स्वर लाभतात. शब्दसूरांची ही रोमांचक अनुभूती गझलेतूनही प्रकट होते. गझलेलाही श्रावणाचा स्पर्श होतो आणि गझलेस भावलेला श्रावण आपल्याला भूल पाडतो.

श्रावण हा एक मनभावन महिना आहे. निसर्गाबरोबरच माणसांनाही श्रावणाची ओढ लागलेली असते. धरती तर हिरवा शालू नेसून नटूनथटून श्रावणाचे स्वागत करीत असते. संवेदनशील कवींच्या मनाला तर श्रावण भुरळ घालतोच. परंतु काव्याच्या प्रांतात परकीय भाषेतून मराठीत रुजलेली गझल आणि ती रचणाऱया गझलकारांना तर तो भूल घालणारच ना. विविध गझलकारांनी श्रावणाचे दर्शन किती विविध अंगाने घडवले आहे.

सुनंदा पाटील (गझलनंदा) श्रावणाला भुलून गेल्या आहेत. जुन्या आठवणीत रमून जुन्या काळात गेल्या आहेत. श्रावणातील ऊन पावसाचा खेळ सुरू असतानाच इंद्रधनु दृष्टीला पडल्यावर त्यांच्या मनात माहेरच्या झुल्याची याद आली. त्या म्हणतात,

सायंकाळी शुभशकुनाच्या
आज पाहिल्या रेषा
इंद्रधनुला झुला बांधुनी
ढगात आला श्रावण

त्यांच्या मनातील श्रावण इंद्रधनुला झुला बांधून आला आहे. सायंकाळी पश्चिमेला आकाशात विविध रंगांच्या रेषा दिसतात. त्या रेषा पाहिल्यावर गझलकाराला ही कल्पना सुचली. श्रावण हा खुशीचा, आनंदाचा महिना. तो शुभशकुनाचा संदेश देतो. सायंकाळी क्षितिजावरील हे दृश्य त्यांच्या मनाला भावते.

कोल्हापूर येथील नरहर कुलकर्णी म्हणतात, आपल्या सखीने अंगणात लावलेल्या झाडाला कितीतरी फुले उमलली आहेत. श्रीकृष्णाने आपली सखी सत्यभामेच्या हट्टाग्रहास्तव पारिजाताचा वृक्ष स्वर्गातून आणल्याची पौराणिक कथा आहे. त्या संदर्भाची आठवण करून देणारा हा त्यांचा शेर पाहा

तुझ्या फुलांचा सडा पहाया रोज अंगणी
श्रावण येतो मज भेटाया रोज अंगणी

हा श्रावण जणू त्यांची प्रतिभा आहे. तुझ्यासाठी लावलेल्या पारिजाताचा सडा रोज अंगणात पडतो. तो पाहायाला दस्तुरखुद्द श्रावण माझ्या अंगणात येतो. कविता वा गझल ऐकायला एखाद्या श्रोत्याने यावे असा हा श्रावण नित्यनेमाने अंगणी तो फुलांचा सडा पाहायला येतो. फुले वेचायला तो येत नाही. तो फक्त सडा पाहायला येतो. तो नयनरम्य फुलांचा सडा किती मनोहर असतो. खरे तर फुलांची शोभा दुरूनच पाहायची असते. त्यांना खुडून नाही, असे माझी मुले सांगत असतात.

पुणे येथील आप्पासाहेब कसबेकर यांना हा श्रावण स्नेहाळ आणि मधाळ वाटतो. निसर्गातून ओसंडणारा हा श्रावण निसर्गाला खुलवतो, रिझवितो आणि
फुलवतोदेखील म्हणून आप्पासाहेब म्हणतात,
निसर्गधारा विश्व पसारा असाच राहो कायम,
आप्पासोबत स्नेह झिरपतो, खुणावतो मग श्रावण

ही निसर्गाची धार म्हणजेच पाऊसधारा अशाच बरसत राहोत, त्याद्वारे विश्वाच्या सौंदर्याचा पसारा वाढत असतो. तो असाच कायम राहावा आणि सृष्टीला नवचैतन्य मिळावे, अशी अपेक्षा ते करतात. पाऊस पडतो म्हणजे निसर्गातून या स्नेहधारा झिरपत पृथ्वीवर येतात. या धारांच्या वर्षावामुळे झरे खुलू लागतात. अशा वातावरणात श्रावण त्यांना खुणावतो. तो म्हणतो घरात बसू नकोस जरा निसर्गात रमायला ये. हा सृष्टीचा पसारा पाहायला ये.
जयसिंगपूर येथील डॉ. सुनंदा शेळके यांचा श्रावण प्रापंचिक, सांसारिक आणि सर्व कुटुंबाला धरून राहणारा आहे.

सारे पाहुणे-रावळे गोळा व्हायचे सुखाने
पंचपक्वानांचा घास तेव्हा द्यायचा श्रावण

पूर्वीच्या काळी श्रावणात लेकीबाळी माहेराला यायच्या. भाचरं देखील मामाला भेटायला यायची. आनंदाने नाचायची बागडायची. हा श्रावण सुखाची संततधार घेऊन यायचा. सर्वांना आनंद वाटायचा. वाटायचा म्हणजे श्रावण स्वतः आनंद, सुख वाटतो तर दुसरीकडे त्याला पाहून आपल्यालाही आनंद वाटतो. श्रावणाच्या पंचमीच्या सणासाठी सगळे पाव्हणेरावळे सुखाने गोळा होतात. हा मेळावा सुखाचा सोहळा असतो. त्या निमित्ताने सगळे सण श्रावणात येतात. पंचपक्वान्नाचा घास आपल्याला श्रावणामुळे खायला मिळतो. सगळेच गोड गोड असते.

हासरा नाचरा श्रावण असं कुसुमाग्रजांनी एका गीतात म्हटले आहेच की. असा हा श्रावण लहानथोर सर्वांना भुरळ घालतो. त्यांना गायला लावतो. नाचायला लावतो.

माझ्याही (प्रकाश रामचंद्र क्षीरसागर) गझलेतील एक शेर आहे,
गझलेस भावलेला श्रावण किती निराळा
सृष्टीस भाळलेला श्रावण किती निराळा

श्रावण सृष्टीला सजवतो, फुलवतो तेव्हा सृष्टी हिरवीगार होते. पावसाळा सुरू झाला की कवींच्या प्रतिभेला धुमारे फुटतात असे म्हटले जाते. परंतु श्रावणात कविता आणि गझल सजू लागते, फुलू लागते, नटू लागते, असे मला वाटते. म्हणून म्हणावे वाटते गझलेस भावलेला श्रावण किती निराळा. प्रत्येक गझलकाराला काय किंवा कवीला काय श्रावणाविषयी लिहावेसे वाटते. हा श्रावण सृष्टीवर जणू भाळलेला असतो म्हणूनच श्रावणात सर्व सृष्टी हिरवीगार होते. बाकीबाब बोरकर देखील म्हणाले सृष्टीला पाचवा महिना. अर्थात पाचवा महिना लागलेली गर्भवती जशी सुंदर दिसते. आनंदाने लाजते. सृष्टीवर भाळलेला हा श्रावण नयनरम्य तर असतोच, परंतु अरसिकाला देखील रसिक बनवतो.

– [email protected]