
>> प्रशांत गौतम
अमरेंद्र भास्कर (अ.भा.) मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्था, पुणे; राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि भिल्लार ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुस्तकांचे गाव’ अशी ओळख लाभलेल्या भिल्लार या गावी 28वे अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलन शुक्रवार, 18 पासून सानंद उत्साहात सुरू झाले. त्याचा समारोप आज होत आहे. डॉ. अनिल अवचट यांना अध्यक्षपदाचा सन्मान लाभला. वास्तविक पाहता, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्था ही अमरेंद्र गाडगीळ आणि ‘फास्टर पुणे’कार भा. रा. भागवत यांनी 40 वर्षांपूर्वी स्थापन केली. आजपर्यंत या संस्थेच्या वतीने सलग 25 संमेलने झाली. एवढीच वर्षे संस्थेच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कारही वितरित झाले. त्यानंतर संस्थेच्या अधिकृत नोंदणीवर धर्मादाय कार्यालयाने आक्षेप घेतला. मधली दोनेक वर्षे या संस्थेचे कार्य अन्य संस्था पुण्यात चालवत होत्या. त्यानंतर गतवर्षी संस्थेचे पुनर्जीवन करण्यासाठी पुण्यात एक वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. न. म. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. एक तीन महिन्यांसाठी अस्थायी कार्यकारिणी डॉ. संगीता बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून माधव राजगुरू, कार्यवाह म्हणून मुकुंद तेलीयरी, सहकार्यवाह म्हणून सुनील महाजन आणि कोषाध्यक्ष म्हणून डॉ. दिलीप गरुड नियुक्त करण्यात आले. त्याचसोबत डॉ. निर्मला सारडा, डॉ. कविता मेहंदळे, प्रशांत गौतम, सुभाष कवडे, विश्वनाथ भुजबळ हे सदस्य नेमण्यात आले. त्यानंतरच्या पुढील तीन-चार महिन्यांत अमरेंद्र-भास्कर (अ.भा.) मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्थेची नोंदणी करण्यात आली.
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्था नव्याने अस्तित्वात येताच शेवगाव येथे संस्थेचे 27वे व या नव्या संस्थेचे पहिले अ. भा. बालकुमार साहित्य संमेलन ज्येष्ठ प्रकाशक, चित्रकार तथा बालसाहित्याचा अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ल. म. कडू यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन पार पडले. संस्था अस्तित्वात येताच काही दिवसांत 28व्या अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलन आयोजनासाठी पुस्तकांचे गाव भिल्लार येथून निमंत्रण प्राप्त झाले. तीन दिवसांचा हा महोत्सव पुस्तकांच्या गावाच्या साक्षीने पार पडतो आहे.
खरे तर मराठी बालसाहित्याला दोनशे वर्षांची मोठी परंपरा लाभली आहे. त्यातही विशेष महत्त्वाची बाब म्हणजे, मुलांना संस्कार देणाऱया या बालसाहित्याच्या संवर्धन, संगोपनासाठी मराठी साहित्यातील अनेक दिग्गज लेखकांचा हातभार लागला आहे. साने गुरुजी, राम गणेश गडकरी, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, पु. ल. देशपांडे, कविवर्य कुसुमाग्रज, इंदिरा संत, शांताबाई शेळके, भा. रा. भागवत, लीलावती भागवत, सुधाकर प्रभू, राजा मंगळवेढेकर, दत्ता टोळ, शंकर सारडा, डॉ. विजया वाड यांच्या बालसाहित्याने तीन पिढय़ा घडवल्या. मुलांचे भाषिक पोषण करायचे आणि त्याचवेळी त्यांची वाङ्मयविषयक अभिरूची घडवीत जायचे आणि हे दोन्ही साधत असताना मुलांची मने संस्कारित करायची हे बालसाहित्यिकांचे महत्त्वाचे कार्य आहे, असे कविवर्य कुसुमाग्रज म्हणत असत.भिल्लारच्या संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष, बालसाहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार लाभलेले लेखक डॉ. अनिल अवचट म्हणतात, बालसाहित्य सहज सोप्या भाषेत लिहायचे तर लेखकांजवळ मुलांसाठीचे मन असले पाहिजे. कुसुमाग्रज, मालतीबाई दांडेकर, अनिल अवचट यांनी जे बालसाहित्याच्या आणि या क्षेत्रात लेखन करणाऱयांसाठी या महत्त्वपूर्ण बाबी, अनुभवाचे बोल सांगितले ते आज कितीजण लक्षात ठेवतात आणि त्यानुसार आपले लेखन बालवाचकाभिमुख करतात हा प्रश्नच आहे.
बालसाहित्य समृद्ध आणि संपन्न करणाऱयांत जसे लेखक हे महत्त्वाचे ठरले तसे कार्यकर्ताही या साहित्य क्षेत्रात विशेषतः बालसाहित्याच्या बाबतीत सांगायचे तर सर्वच लेखक सदैव कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहिले. साहित्य चळवळ मग ती कोणत्याही वाङ्मय प्रकाराची असो, तिथे लेखक आणि कार्यकर्ता अशी समांतर वाटचाल असेल तर दोन्ही क्षेत्रे सकस आणि दर्जेदार होत असतात.
साहित्य अकादमीने काही वर्षांपासून बालसाहित्यात लेखन आणि लक्षणीय योगदान देणाऱया लेखकांना बालसाहित्य पुरस्कार सुरू केले. पूर्वीच्या काळात हे पुरस्कार अस्तित्वात नव्हते. त्यामुळे बालसाहित्याच्या क्षेत्रात भरीव, ठसठशीत योगदान देणारी एक संपूर्ण पिढी या महत्त्वाच्या पुरस्कारापासून वंचित राहिली असे म्हणावे लागेल. मात्र हे अकादमी पुरस्कार सुरू झाल्यानंतर डॉ. दिलीप प्रभावळकर, अनंत भावे, अनिल अवचट, बाबा भांड, राजीव तांबे, माधुरी पुरंदरे, ल. म. कडू आणि रत्नाकर मतकरी यांच्यासारख्या नव्या-जुन्या लेखकांना बालसाहित्य अकादमीचे पुरस्कार लाभले. बालसाहित्य समृद्ध आणि संपन्न करण्यात नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या योगदानामुळे बालसाहित्य क्षेत्रास बहुआयामी ओळख मिळाली.
बालसाहित्यास प्रेरणा देण्याच्या उद्देशाने अलीकडच्या काळात अनेक साहित्य संस्था पुढाकार घेत असतात. साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था या सरकारी पातळीवरील संस्था यासंदर्भात खूप काही करू शकतात. या संस्था मुलांसाठी लेखन-वाचन कार्यशाळाही घेत असतात. या वर्षात कोल्हापूर, पुणे, बुलढाणा येथे बालसाहित्य परिषद झाली. अशाप्रकारच्या झालेल्या परिषदा आणि होत असलेले संमेलने यात मूलभूत फरक आहे. संमेलनातून साहित्य अभिव्यक्त करण्यासाठी लेखक, कवींना व्यासपीठ लाभले आणि कार्यशाळेतून लेखकाने कसे व का लिहावे यासाठी थेट मार्गदर्शन असते. या दोन्ही आयोजनांमुळे बालसाहित्याची वाचन-लेखन चळवळ गतिमान होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. त्याचबरोबर नव्याने लेखन करणारी लहान मुले आणि मुलांसाठी लेखन करणारे लेखक यांनीही अपेक्षा निर्माण केल्या आहेत. काही तर अपेक्षावर्धक घडत आहे, हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू वाटते. पुस्तकांच्या गावी असलेल्या 28 व्या अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या औचित्याने या महत्त्वपूर्ण बाबी अधोरेखित करणे अगत्याचे वाटते.
आज पूर्वीपेक्षा अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. म्हणून बालसाहित्याच्या क्षेत्रात लेखन करणाऱया लेखकांनी अत्यंत जबाबदारीनेच लिहिले पाहिजे. कारण बालसाहित्य लेखन हे वाटते तेवढे सोपे नाही. सहज, सोपे व मुलांच्या भाषेत लिहायचे असेल तर साहित्याच्या कोणत्याही वाङ्मय प्रकारात लेखन करणाऱया लेखकास फक्त मुलांसाठीचे मन पाहिजे. कुणावरही वाचन संस्कृतीची सक्ती करून प्रचार-प्रसार करता येणार नाही. कारण ती उत्स्फूर्त असली पाहिजे व त्याप्रति आईवडील, पालक, शिक्षकांनी मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे.
– अनिल अवचट, अध्यक्ष, 28 वे बालकुमार संमेलन, भिल्लार





























































