ठसा – कुमुदताई रांगणेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

साहित्य, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाने कुमुदताई रांगणेकर यांनी छाप सोडली. 92 वर्षांचे समृद्ध आणि संपन्न आयुष्य जगलेल्या कुमुदताई या मूळ मुंबईच्या. माधवराव रांगणेकरांशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या संभाजीनगरात आल्या व आपल्या आयुष्यातील बराच काळ त्यांनी या शहरात व्यतीत केला. साहित्य क्षेत्र असो की सामाजिक असो, नाहीतर राजकारण असो, या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याची नाममुद्रा उमटवली. नाशिक येथे त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने या तिन्ही क्षेत्रांची हानी झाली आहे. बालपणापासूनच त्यांनी विविध जबाबदाऱया पेलल्या नि पूर्ण केल्या. संभाजीनगरातील खाराकुआँ भागात त्यांचे पती माधवराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम बघत असत. जनसंघाने त्यांना संभाजीनगरात काम करण्याची जबाबदारी दिली असल्याने विवाहानंतर कुमुदताईंनीही संभाजीनगरात संसार थाटला व मराठवाडा हे आपले कार्यक्षेत्र मानले. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांनी पतीच्या कार्यासही हातभार लावला. माधवरावांच्या घरी जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी, जगन्नाथराव जोशी यांचा संघकार्याच्या निमित्ताने नेहमी राबता असल्याने कुमुदताईंचीही संघाशी नाळ जोडली गेली. 1978च्या सुमारास स्वतंत्र मराठवाडा पदवीधर संघ झाला आणि जनसंघाकडून त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली. 1978 ते 1984 हा त्यांच्या आमदारकीचा काळ. या काळात त्यांनी प्रभावी आमदार म्हणून राजकारणाचे क्षेत्र गाजवले. राजकारणासोबतच त्या सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कार्याने प्रसिद्ध होत्या. 1984 ते 2007 या काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले. ज्योती मंदिर, आदर्श विद्यामंदिर या संस्थांवरही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. मुंबईत एम.ए. झाल्यावर लग्नानंतर त्या 1958 पासून संभाजीनगर शहरात स्थायिक झाल्या. पतीचे आदर्श टायपिंग इन्स्टिटय़ूट होते. प्रारंभीच्या काळात कुमुदताई लघुलेखनाचे वर्ग घेत असत. याचा त्यांना पुढील प्रवासात फायदाच झाला. अनेक राजकीय आणि सामाजिक नेत्यांची भाषणे त्यांनी लिहून काढली. आदर्श शॉर्टहॅण्ड ऍण्ड टायपिंग इन्स्टिटय़ूट, नेताजी सुभाष हायस्कूल आणि दीनदयाळ शोध संस्थान या माध्यमातून त्यांचे कार्य सर्वसुपरिचित होत गेले. त्या आमदार असताना त्यांनी पदवीधरांचे अनेक प्रश्न मार्गी लावले, पण त्याच सोबत शेतकरी आणि तळागाळातल्या शेवटच्या माणसांचेही प्रश्न सोडवले. कुमुदताई या चिंतनशील लेखिका व संवेदनशील कवयित्री होत्या. 2000 साली त्यांचा ‘अतृप्त आकाश’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला, तर 2004 साली ‘अध्यास’ कवितासंग्रह प्रकाशित झाला. अभ्यास, अतृप्त आकाश, अध्यास अर्ध्य, अनाहत अशी वैशिष्टय़पूर्ण शीर्षके त्यांनी आपल्या गंथांना दिली होती.

सात कवितासंग्रह, स्फूट लेखनासह त्यांनी विविध वृत्तपत्रांत विपुल प्रमाणात लेखन केले. एवढेच नव्हे तर विविध निमित्ताने आकाशवाणीवर प्रासंगिक भाषणेही दिली. मधुगंध काव्य मंडळाच्या त्या अध्यक्षा होत्या. संभाजीनगरातील मधुगंध काव्य मंडळाने अनेक नव्या जुन्या कवींना एकत्र आणले. दर महिन्यात कविसंमेलन, काव्यविषयक चर्चा असे अनेक उपक्रम त्यांनी सातत्याने राबवले. राजकारण, समाजकारण आणि साहित्य क्षेत्र यात त्यांनी भरीव आणि ठसठशीत योगदान दिले, ज्याचा सन्मान राज्य शासनाच्या अहिल्यादेवी पुरस्काराने, महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी यांसारख्या विविध पुरस्कारांनी झाला.