
>> प्रा. अनिल कवठेकर
तो अशा बिहारच्या खेडय़ात राहत होता जिथे नाटक करणं हे खूप हलक्या दर्जाचं समजलं जायचं. घरामध्ये एकदा तो शिट्टीवरती गाणं म्हणत होता. तेव्हा काकांनी त्याच्या पाठीत जोरदार दणका दिला होता. त्यामुळे तो नाटकापासून दूरच होता; पण त्याला नाटक पाहायला फार आवडायचं. त्या काळात मुली नाचत नसत तेव्हा लग्न समारंभामध्ये मुलींचा पोशाख घालून नाचणारी मुलं आणली जायची. त्यांचं नृत्यदेखील त्याला फार आवडायचं. ते नृत्य तो चोरून पाहायचा. त्यावेळी मनोज वाजपेयीच्या स्वप्नातही नव्हतं की, त्याला नाटकात काम करायला मिळेल.
वर्गात मनोज वाजपेयी अगदी शांत, अबोल विद्यार्थी होता. पण एकदा कविता वाचनाच्या स्पर्धेकरता त्याच्या शिक्षकाने त्याचं नाव सुचवलं आणि त्याला हरिवंशराय बच्चन यांची कविता पाठ करायला सांगितली. अत्यंत घाबरत त्याने ती कविता कशीबशी पाठ केली. जेव्हा स्टेजवरून त्याचं नाव पुकारण्यात आलं आणि तो स्टेजवर जायला निघाला तेव्हा मुलं त्याला चिडवू लागली. आला अमिताभ, आला राजेश खन्ना, असे उपहासात्मक बोलू लागली. ऐ असा उभा रहा, ऐ तसा उभा रहा. असं चिडवल्यामुळे त्याचा आत्मविश्वास संपत गेला. क्षणभर त्याला वाटलं की स्टेजवरून पळून जाऊया. इयत्ता पाचवीतील नऊ-दहा वर्षांचा तो कोवळा मुलगा, समोर पाचशे मुले पाहिल्यानंतर घाबरणारच; पण शिक्षकांनी त्याला धीर दिला. मुलांना शांत बसण्यासाठी दम दिला आणि त्याने ती कविता सादर केली. सर्वांना त्याचं सादरीकरण इतकं आवडलं की, सर्व मुलं उठून उभी राहिली. सर्व शिक्षक उभे राहिले आणि त्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तो आपल्या जागेवर जाऊन बसेपर्यंत सर्वजण टाळ्या वाजवत होते. त्या टाळ्यांचा नाद त्याच्या कानातून त्याच्या हृदयापर्यंत पोहोचला. त्याला विलक्षण आनंद झाला होता. सादरीकरण केल्यानंतर इतका आनंद मिळू शकतो, त्याचं मन त्याच्याशी बोलू लागलं. त्या क्षणी त्याने एक निर्णय घेतला की, आपण अशा प्रकारचं सादरीकरण आयुष्यभर करायचं… आणि चित्रपटसृष्टीला एक उत्कृष्ट अभिनयाचा स्कॉलर विद्यार्थी लाभला.
मनोजला मी अभिनयाचा स्कॉलर विद्यार्थी असं का म्हटलं? कारण एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला होता की, पिप्ट माझ्या हाती पडल्यानंतर मी ती पिप्ट आठ ते दहा वेळा वाचतो. असं वाचल्यानंतर ती पिप्ट माझ्याशी बोलू लागते. ती मला त्यात उतरायला सांगते आणि मला शिकवते की, मी अभिनय कसा करायला हवा. म्हणूनच प्रत्येक पिप्ट मी किमान दहा वेळा वाचल्याशिवाय त्या चित्रपटाच्या शूटिंगला आरंभच करत नाही. एखादं दृश्य अतिशय सुंदर होण्यासाठी ते दृश्य मी मनामध्ये पन्नास वेळा आणि कधी कधी शंभर वेळासुद्धा पाठ करतो. त्यानंतरच ते दृश्य मला हवं तसं पडद्यावर दिसतं. इतकी मेहनत घेणाऱया अभिनेत्याला अभिनयाचा स्कॉलर विद्यार्थी म्हणणं म्हणजे, त्याचा मोठा सन्मानच आहे.
मनोज वाजपेयीचं कवितेवर फार प्रेम आहे. कारण त्या कवितेनेच त्याच्या आयुष्याला एक मोठं वळण दिलं होतं. तो सांगतो की, कविता मी सतत वाचतो. अगदी एखाद्या नवीन कवीची कविता वाचली की मी त्याला ती कविता कशी आहे हे न सांगता त्याचं रेकॉर्डिंग करून त्याला पाठवतो. माझ्या आवाजातली कविता ऐकल्यानंतर त्याला आपोआपच कळतं की त्यातले कोणते शब्द प्रभावी आहेत. कवितेवर मनापासून प्रेम करणारा असा हा अभिनेता आहे. कविता म्हणजे कमी शब्दांमध्ये बोललेला संवाद. त्या संवादातून प्रेक्षकांच्या काळजापर्यंत आपल्याला सहज जाता येतं. संवाद म्हणजे काय असतं, यावर तो सांगतो की, संवाद म्हणजे एक प्रकारचं गाणं असतं. त्यात ताल असतो. स्वर असतो. लय असते. हे ज्याला समजतं त्याचा संवाद लोकप्रिय होतो. तो संवाद त्याच पद्धतीने लोकही बोलू लागतात. त्यामुळे कवितेचं आणि संवादाचं एक घट्ट नातं आहे. या कवितेनेच मला संवाद ऊर्जा दिलेली आहे. प्रेरणा आणि वेगळेपण दिलेलं आहे.
आपल्या अभिनयाच्या अभ्यासाच्या जोरावर त्याने स्वतची एक वेगळी प्रतिमा चित्रपटसृष्टीत निर्माण केलेली आहे. मनोज वाजपेयी म्हणजे गर्दीच्या दृश्यात सहजपणे ओळखू न येणारा सामान्य चेहरा होय.
ऑफिसला जाणारी मंडळी जशी रोज ज्या पद्धतीने सहजपणे आपल्या ऑफिसला जातात, मित्रांशी, शेजाऱयांशी बोलतात. कधी कधी भांडतातसुद्धा. मनोज वाजपेयीचा अभिनय हा त्याच्या त्या नैसर्गिक वागण्यासारखाच नैसर्गिक आहे. अनेक वेळा अशा प्रकारची दृश्ये करताना कोणताही अनपेक्षित धक्का त्याच्या चेहऱयावर बसलेला आपल्याला जाणवत नाही. इतका त्याचा अभिनय सरळ, नैसर्गिक आणि परिणामकारक असतो. मनोज त्या दृश्याला इतकं सामान्य करतो की, ते चित्रपटातलं दृश्य न वाटता खऱयाखुऱया जीवनात घडणाऱया गोष्टीचं चित्रण वाटतं.
‘फॅमिली मॅन’ या वेबसिरीजमध्ये एका दृश्यात त्याचा तरुण बॉस त्याला खूप झापतो. तेव्हा त्या बॉसला त्याच्या केबिनमध्ये मारत, टेबलावर आडवा पाडतो. तो बॉस नावाचा प्राणी टेबलावर एखाद्या अजगरासारखा पडतो तेव्हा मनोजचा चेहरा नागाने फणा काढल्यासारखा येतो. बॉसची टाय कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्टय़ासारखी पकडून त्याला उत्तर देतो. ‘दिमाग की दही करते रहता है. बहुत बरदाश्त कर लिया है, कुछ बोल मत’ असे म्हणत बॉसच्या थोबाडीत मारतो.
बॉस आश्चर्यचकित होऊन स्वतच्या गळ्यातलं आयकार्ड त्याच्या तोंडावर फेकतो. हे सगळं घडत असताना मनोज वाजपेयीच्या चेहऱयावरचे भाव खूप काही सांगून जातात. तिथे घडणारी कॉमेडी आणि मनोजचं भडकणं त्या दृश्याला एक वेगळं मजेदार रूप देतं.
मनोजचे चित्रपट पाहिल्यानंतर मला तो नेहमीच एक ‘फॅमिली मॅन’ वाटतो. आपली मूळ व्यक्तिरेखा कुटुंबासमोर येऊ न देता कुटुंबाच्या भावभावना जपणारा, कुटुंबाची अत्यंत काळजी घेणारा, कर्तव्यनिष्ठ फॅमिली मॅन. चित्रपटापेक्षाही मोठा बजेट असणारी वेबसिरीज, त्यातला नायक स्पाय आहे. मुळात जेम्स बॉण्ड हा सर्वच स्पाय चित्रपटांची प्रेरणा राहिला आहे. अविवाहित, दिसायला आकर्षक, रोमँटिक स्वभाव आणि शोधक वृत्ती अशी छबी असणारी व्यक्ती म्हणजेच स्पाय अशी एक कल्पना लेखकाने निर्माण केलेली आहे. दिसायला साधारण, मध्यमवर्गीय अशी मनोज वाजपेयीने ‘फॅमिली मॅन’मधली व्यक्तिरेखा लोकांच्या मनात स्वतंत्रपणे उभी केलेली आहे. जी लोकांनी स्वीकारलेलीही आहे.
‘सत्या’ आला तेव्हा पहिल्यांदा मनोज वाजपेयी या चित्रपटात लीड रोल करणार होता. पण पिप्टवर काम होत असताना तो सेकंड लीडला गेला आणि लीड रोल सेकंडरी झाल्यानंतरही त्याला मिळालेली भिकू म्हात्रेची भूमिका त्याने इतकी सुंदर, इतकी अप्रतिम केली की, चित्रपटसृष्टीत मनोज वाजपेयीची ओळख भिकू म्हात्रे म्हणूनच झाली. ‘सत्या’मधल्या नायकाला तो या चित्रपटाचा मुख्य नायक आहे हे दर्शवणारे अनेक संवाद होते. पण त्याच्या अभिनयाने तो मौनी अमिताभ आहे असं त्याला त्यावेळी म्हटलं गेलं होतं. पण तरीही लक्षात राहिला भिकू म्हात्रे!
भिकू म्हात्रे करताना त्याचं ते जिंदादिल जगणं, भीतीवर मोकळेपणाने हसणं, बायकोवर प्रेम करण्याची वेगळी पद्धत, त्याचं मराठी, हिंदीमिश्रित बोलणं, संवादफेकीमधील नैसर्गिक साधेपणा… या सगळय़ातून मोठा परिणाम साधण्याची कला मनोजला अवगत होती आणि हे सगळं प्रेक्षकांसाठी वेगळं होतं. आपल्या देशातल्या प्रेक्षकांना अभिनयामध्ये दरवेळी काहीतरी वेगळेपणा हवा असतो आणि तो वेगळेपणा असा हवा असतो की तो त्यांच्या लक्षात येईल. लक्षात राहील. असं लक्षात आणण्याचं काम ज्या काही मंडळींनी केलं त्यामध्ये इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याच पठडीत जाणारा मनोज वाजपेयीदेखील आहे.
’गॅंग ऑफ वासेपूर’मधला टकला भोळसट, माणूस. बायको बाळंत होत असताना तिच्या खोलीत जाणारा, बायकोने पेला फेकून मारल्यानंतर घाबरणारा, रस्त्याच्या कडेला निवडणुकीची मिरवणूक जात असताना त्या गर्दीचा भाग होऊन उभा राहणारा. पंप लुटण्याच्या दृश्यात आधी त्याला किती ट्रक पेट्रोल पंपावर येतात असे विचारून मग पेट्रोल पंप लुटणारा. त्याच्या विनोदाची सहजता खूप वेगळी आहे. पेट्रोल पंप लुटताना कोणताही थरार नाही. कोणती भीती नाही. तो पेट्रोल पंप लुटत असतो आणि आपण तो लुटत असताना ते दृश्य एन्जॉय करत असतो. हे दिग्दर्शनाचं कौशल्य असेल पण त्यात असलेला तो सहजपणे मनोज वाजपेयी आणतो.
अशा आगळ्यावेगळ्या विविधरंगी, विविध ढंगी भूमिका करणारा मनोज वाजपेयी उत्तम नर्तक आहे. याची बहुतेकांना माहिती नसेलही. लहानपणी त्याने मुलींचा पोशाख घालून नृत्य करणाऱया मुलांचे नृत्य पाहिले होते. तरुणपणी त्याला अशाच विषयावर एक नाटक करण्याची संधी मिळाली. त्या नाटकाचं नाव होतं ‘नेटवर्क नेटवा’ याचा अर्थ लौंढा नाच! म्हणजे मुलाचे नृत्य! त्या काळामध्ये मुली नाचू शकत नव्हत्या. म्हणून मनोरंजनासाठी अशा प्रकारची मुलं बोलावली जात असत. जी लग्नामध्ये, जत्रेमध्ये, होळीमध्ये नृत्य करून आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन करत असत. अशा विषयावर नाटक आल्यानंतर त्याने ती भूमिका इतकी सुंदर वठवली की त्याचा भाऊ त्याला म्हणायचा, असलं नाटक काय करतोस, याच्यात पैसे मिळत नाहीत. पण एकदा त्याच्या भावाने त्याचं हे ’नेटवा’ नाटक पाहिलं आणि त्या नाटकातील मनोजचं नृत्य पाहिल्यावर त्याला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. नाटक संपल्यावर मनोज जेव्हा घरी गेला तेव्हा त्याने मनोजसाठी मटण तयार करून ठेवलं होतं. मनोजने विचारलं, पैसे कुठून आणलेस. तेव्हा तो म्हणाला की, तुझं नाटक आणि तुझं नृत्य पाहिल्यावर तुला आज छान बक्षीस देऊया असं मनात आलं. म्हणून मी कर्ज काढून तुझ्यासाठी आज मटण बनवलं आहे. मनोजच्या नृत्यकौशल्याचा चित्रपटातून कोणत्याही दिग्दर्शकाने उपयोग केल्याचं आपल्याला जाणवत नाही.
मुलाखतीमध्ये त्याने सांगितलेला एक किस्सा असा की, एकदा इरफान खानची मैत्रीण मनोजला भेटली आणि ती म्हणाली की, मी तुझं ‘नेटवा’ नाटक चार-पाच वेळा पाहिलेलं आहे आणि तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडले आहे. मी मुलगी असून नृत्य करणाऱया त्या मुलाच्या प्रेमात कशी काय पडले तेच मला समजत नाही. अशा प्रकारच्या भूमिका समजून घेणारा, त्या भूमिका जिवंत करणारा, अजरामर करणारा, चित्रपट क्षेत्रातील एकमेव स्कॉलर विद्यार्थी म्हणजे मनोज वाजपेयी होय. मनोज वाजपेयीचा आज वाढदिवस… त्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देत त्याच्याकडून विलक्षण वेगळ्या पद्धतीच्या भूमिका, चित्रपट पाहायला मिळतील अशी अपेक्षा करतो.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)





























































