रंगनाटय़ : अतरंगीपणाचे अफलातून उद्योग…!

>> राज चिंचणकर

क्वचितच कुणाच्या नावाआधी ‘सब कुछ’ हे विशेषण लागते आणि संतोष पवार त्याला अजिबात अपवाद ठरलेला नाही. त्याचे ‘संगीत शोले’ नाटक हे नव्याने सिद्ध करत आहे.

रंगभूमीवर धुमशान घालत, मायबाप रसिकांना विविध प्रकारे आनंद मिळवून देण्याचे काम एक अवलिया आतापर्यंत नित्यनियमाने करत आला आहे. या अवलियाचा मूळ बाज लोकनाटय़ाचा असला आणि त्याची प्रचिती वारंवार त्याच्या नाटय़कृतींतून येत असली तरी काही वेगळ्या धाटणीची नाटकेही त्याने दिली आहेत, परंतु खऱ्या अर्थाने तो रंगला तो लोकनाटय़ातच! मराठी रंगभूमी कायम सजीव ठेवण्याचे काम या अवलियाने इमानेइतबारे आतापर्यंत केले आहे. अर्थातच हा अवलिया म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून लेखक, दिग्दर्शक व अभिनेता संतोष पवार आहे.

फार क्वचितच कुणाच्या नावाआधी ‘सब कुछ’ हे विशेषण लागते आणि संतोष पवार त्याला अजिबात अपवाद ठरलेला नाही. त्याचे ‘संगीत शोले’ नाटक हे नव्याने सिद्ध करत जाते. या नाटकात स्वत संतोष पवार अक्षरश धुमाकूळ घालतो आणि त्याच्या सहकलाकारांनाही घालायला लावतो. विशेष म्हणजे रसिकांना हे सर्व खूप भावते, आवडते आणि रसिकजन नाटकात मनसोक्त डुंबत राहतात. एका सच्च्या रंगकर्मीला अजून काय हवे? ‘संगीत शोले’ या नाटकात संतोष पवारने ‘वस्ताद’ हे पात्र रंगवले आहे. ‘नाटकातले नाटक’, असा या नाटय़कृतीचा ‘फॉर्म’ आहे आणि ‘त्या’ नाटकातला दिग्दर्शक म्हणजेच ‘वस्ताद’ संतोष पवारने रिंगमास्टरच्या थाटात साकारला आहे. त्याच्या जोडीला त्याने एकाहून एक सरस अशा अतरंगी कलाकारांची फौज उभी केली आहे. या सगळ्यांची जुळवून आणलेली भट्टी पाहता संतोष पवारला ‘वा, वस्ताद’ असेच म्हणणे भाग पडते.
‘संगीत शोले’ हे शीर्षक समोर येताच डोळ्यांसमोर जे काही येते; त्याला हे नाटक अपवाद ठरत नाही. ‘70 एम. एम.’ पडदा म्हणून ज्याची एकेकाळी प्रसिद्धी करण्यात आली होती; त्या सुपरडुपर हिट अशा ‘शोले’ या हिंदी सिनेमाला डोळ्यांसमोर ठेवतच संतोष पवारने या नाटकाचा पाया रचला आहे. साहजिकच, त्याच्या या नाटकात ‘शोले’ सिनेमातली पात्रे उतरली आहेत. इतकेच नव्हे; तर हे नाटकही त्याने ‘सिनेमास्कोप’च्या थाटात सादर केले आहे. संतोष पवार ही काय ‘चीज’ आहे, याची ज्यांना कल्पना आहे; त्यांना हे नाटक पाहताना या नाटकाचे दिग्दर्शन आधी आणि संहिता नंतर लिहिली गेली असल्याचे नक्कीच जाणवू शकेल. नाटक उभे करताना ‘इम्प्रोव्हायझेशन’चे तंत्र वापरणे ही संतोष पवारची खासियतच आहे. एकदा का नाटकातली पात्रे मनात फेर धरू लागली की, संतोष पवारच्या अंतरंगात आपोआप नाटकाची संहिता आकार घेत असावी असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे.

या नाटकात जय, वीरू, गब्बरसिंग, ठाकूर, रामलाल, बसंती, कालिया आदी ‘शोले’ सिनेमातली ‘स्टारकास्ट’ आहे आणि त्यांच्याभोवती संतोष पवारने लेखन व दिग्दर्शनाची आयुधे हाती धरत एक गोष्ट विणली आहे. हे सर्व रंगमंचावर सुरू असताना एखाद्या प्रसंगानंतर “अरे, तो अमुकतमुक बघ काय करतोय, बोलव त्याला,” असे म्हणत नाटकाची ‘कंटिन्युटी’ कायम ठेवणे हे केवळ संतोष पवारच करू शकतो. साक्षात प्रयोग सुरू असताना रिहर्सलच सुरू असावी अशा थाटात बिनधास्तपणे प्रसंग उभा करणे किंवा एखादा कलाकार चुकला, तर त्याची चूक तिथल्या तिथेच त्याच्या लक्षात आणून देत त्यावरही रसिकांकडून हशा वसूल करणे हे उद्योगही संतोष पवारच करू शकतो. वेशभूषा व रंगभूषा याबाबतीतही ‘तो म्हणेल ते’ ही उक्ती लागू पडते. त्याला स्वतला ‘संतोष’ मिळावा अशी आखणी त्याने तांत्रिक विभागाच्या बाबतीतही करून ठेवलेली असते. महत्त्वाचे म्हणजे रसिक जनही त्याच्या या सगळ्या उद्योगांवर आणि उचापत्यांवर फिदा होतात. ‘संगीत शोले’ या नाटकातही याचे थेट प्रतिबिंब पडलेले दिसते.

संतोष पवार याच्यासह सुशील पाटकर, निशांत जाधव, रोहन कदम, स्वप्नील जगताप, महेश गुरव, अभिषेक औटी, तेजस घाडीगावकर, सिद्धेश खंडागळे, सिद्धी पाटील, दीपश्री कवळे, ओशिन साबळे या अतरंगी कलावंतांची फौज नाटकात आहे. रंगमंचावर साक्षात संतोष पवार उभा असताना त्याच्या सान्निध्यात पार रमणाऱ्या या कलावंतांनीही अतरंगीपणा करत त्यांच्या भूमिका रंगवल्या आहेत. तुषार देवल याचे संगीत आणि अनिकेत जाधव याने कलावंतांना दिलेला पदन्यास याने या एकूणच या अतरंगीपणात भरच घातली आहे. ‘भूमिका थिएटर्स’ व ‘एस. एस. 24 क्रिएशन्स’ या नाटय़ संस्थांच्या या नाटकाने रंगमंच पार घुसळून काढला आहे.

[email protected]