सुभाषिणी – स्वप्नवासवदत्तम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऋतुजा फडके

‘स्वप्नवासवदत्तम्’ हे नाटक म्हणजे भासाने संस्कृत साहित्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं पर्व म्हणायला हरकत नाही. भासाने लिहिलेलं हे नाटक त्याच्या संपूर्ण साहित्यकृतीतील उत्कृष्ट कलाकृती आहे. नाटकाची संहिता, कथाकथन, पात्रांचं सजीव चित्रण, प्राकृतिक वर्णन, भाषाशैली, रासोन्मेष या सगळय़ाच अंगांनी नाटक समृद्ध आहे.

आज आपण भासाचं ज्या नाटकाबद्दल चर्चा करणार आहोत ते संस्कृत साहित्यातलं खूप महत्त्वाचं नाटक मानलं जातं. या नाटकाने वाचकांची मनं जिंकून संस्कृत साहित्याच्या इतिहासात बराच मान मिळवला आहे. हे नाटक म्हणजे भासाने संस्कृत साहित्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं पर्व म्हणायला हरकत नाही.

भासाने लिहिलेलं ‘स्वप्नवासवदत्तम्’ हे नाटकही त्याच्या संपूर्ण साहित्यकृतीतील उत्कृष्ट कलाकृती आहे. नाटकाची संहिता, कथाकथन, पात्रांचं सजीव चित्रण, प्राकृतिक वर्णन, भाषाशैली, रासोन्मेष या सगळ्याच अंगांनी नाटक समृद्ध आहे. नाटकातील स्वप्नाचं दृश्य म्हणजे तर नाटकाचा प्राण आहे. त्या दृश्याला बघून वाचक तथा प्रेक्षक भासाच्या कल्पनाशक्तीला खचितच सलाम करेल. धीर ललित नायक उदयन सहृदय प्रेमाचं प्रतीक आहे, तर त्याच प्रेमाचा स्वीकार करणारी वासवदत्ता त्याग आणि तपस्येचं मोठं उदाहरणच प्रेक्षकांसमोर ठेवते. एका बाजूला नीतिज्ञ यौगंधरायण आपल्या बुद्धिकौशल्याने लोकांना चकित करतो, तर दुसऱया बाजूला पद्मावती आपल्या सहजतेने लोकांना प्रभावित करते. हे भासाच्या चरित्र-चित्रणाचं उत्तम निदर्शक आहे.

महाकवी भास भावुक कवी आहे. त्याच्या लघुविस्तारी वाक्यांमधला सरस पद-विन्यास प्रभावित करतो. त्याने वर्णन केलेले भावही रासाप्लवित करतात. मानवी हृदयात उत्पन्न होणारे भाव नाटकात उतरवणं यात तर भासाचा हातखंडा आहे. विरहात व्याकूळ झालेल्या उद्यानाच्या मनोव्यथेचं वर्णन ब्रह्मचारीच्या मुखातून करुण रसात करताना भास म्हणतो,

नैवेदानीं तादृशाश्चक्रवाका
नैवाप्यन्ये स्त्री विशेषैव युक्ताः ।
धन्या सा स्त्री यां तथा वेत्ति भर्ता
भर्तृस्नेहात् सा हि दग्धा?प्यदग्धा ।। 2।13

अर्थात – यावेळी राजाएवढं दुःखी कुणीच नाही. श्रेष्ठ स्त्रियांपासून विरहीत झालेले राम इत्यादींचीसुद्धा तुलना उदयनाशी होऊ शकत नाही. ती स्त्री धन्य आहे, जिच्यावर पतीचं इतकं प्रेम आहे. भर्तृस्नेहामुळे तिला जाळूनसुद्धा ती जळली नाही, कीर्तिरूपाने जिवंत राहिली.

सहाव्या अंकात उदयनाला घोषवती नावाची वीणा मिळते, त्या वेळेला त्याला वासवदत्ताशी झालेला वियोग असहय़ होतो. त्या वेळेला त्याच्या तोंडी उत्कट दुःख आणि प्रेम यांचं संमिश्र वर्णन करणारा श्लोक भास देतो,

श्रुतिसुखनिनदे ! कथं नु देव्याः
स्तनयुगले जघनस्थले च सुप्ता ।
विहगगण रजोविकीर्णदण्डा
प्रतिभयमध्युषिता?स्यरण्यवासम् ।। 61।।

नाटकात छंदाचा तसेच अलंकारांचा प्रयोगसुद्धा समुचित रूपाने झाला आहे. पात्रांचा संवादसुद्धा नाटकाला भार न होता कथानकाला जिवंत करतात. नाटकाचा प्रधान रस शृंगार आहे. उदयन आणि वासवदत्ता यांचं नातं भासाने विप्रलंभ शृंगारात व्यक्त केलेलं आहे. याव्यतिरिक्त नाटकात हास्यरसही दिसून येतो. मनुष्याच्या म्हणजेच चिंता, स्मृती, शंका, संभ्रम या विभिन्न भावनांचं प्रशस्ती रूपाने भासाने केलं आहे.

म्हणूनच निष्कर्षतः असं म्हटलं जातं की, या नाटकाने संस्कृत साहित्यात मानदंड प्रस्थापित केलेला आहे.

[email protected]