
सीमा मोडक
सध्याचा सगळय़ात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे ‘ग्लोबल वर्मिंग’चा. त्यामुळे फक्त उष्णतेचे प्रमाण वाढलेय असे नाही, तर ऋतुचक्राचा कालावधीही बदलतोय असे मला वाटतेय. उन्हाळय़ाची आपल्यावर फारच मर्जी आहे. तो जायलाच तयार नसतो. ओझोनचा थर कमी होत आहे. अहो, या सगळय़ा बाबी अगदी व्यवस्थित तेव्हाच राहतील जेव्हा आपण आपणच बिघडवलेल्या या निसर्गाचे संतुलन राखू. त्यासाठी आपल्याला झाडे लावायला हवीत आणि हो, फक्त वृक्षारोपण करून थांबायचे नाही, तर त्यांचे रक्षण करून त्यांना वाढवायचे हेसुद्धा आपलेच कर्तव्य आहे. शासनामार्फतदेखील जुलै महिन्यात वृक्ष लागवड दरवर्षी मोठय़ा संख्येने केली जाते, पण त्यात आपण किती यशस्वी होतो? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळय़ावर काही उपाय नक्कीच परिणामकारक ठरतील.
आपले ध्येय आहे वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन. यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम राबवता येऊ शकतात. इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात वड, पिंपळ, कडुलिंब यांसारख्या मोठय़ा होणाऱया आणि बरीच वर्षे टिकणाऱया झाडांची रोपे आणावीत. शाळेत आपल्या वर्गशिक्षकांना आपण लावलेल्या आणि आणलेल्या रोपाचे नाव सांगून त्याच्या बरोबरचा फोटो पाठवायचा. तसेच ते रोप कोणत्या भागात आपण लावणार आहोत तो भागदेखील लिहून द्यावा. त्या भागात रोप लावल्यावर शक्य झाल्यास ट्री गार्ड व आपले नाव व वर्ष झाल्यानंतर ‘2023’ असे लिहून रोपासोबत फोटो काढावा.
पुढील वर्षी अर्थात इयत्ता सहावीत वाढलेल्या रोपासोबत फोटो काढून दाखवावा. याप्रमाणे इयत्ता दहावीपर्यंत ते रोप मोठे झालेले असेल. म्हणजे दरवर्षी राज्यात जितके विद्यार्थी पाचवीत प्रवेश घेतील तितकी हजार झाडे लावली जातील आणि त्या झाडांची देखभाल सहा वर्षे केली जाईल. सहा वर्षांनंतर ते झाड कायमस्वरूपी जिवंत राहील किंवा त्या झाडांपैकी पन्नास टक्के झाडे राहतील असे धरल्यासही अनेक झाडे वाढतील. आता प्रश्न हा आहे की, ही रोपे लावायची कुठे? आपल्या घरासमोर, शेतात, बांधावर, मोकळय़ा जागेत, कॉलनीतील मोकळय़ा जागेत, डोंगरावर, नदीकिनारी अशा अनेक ठिकाणी ही झाडे आपण लावू शकतो. याबाबतीत ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकादेखील झाडे लावण्यासाठी जागा सांगू शकतात.
मे किंवा जून महिन्यातच या वर्षी कोठे झाडे लावावीत, हे घोषित केल्यास वृक्षारोपण करणे अधिक सोयीचे जाईल. कोणत्या शाळेने कोणत्या भागात झाडे लावल्यास हरकत नाही हेदेखील सूचित करू शकतात. पुन्हा दुसरा प्रश्न हा येतो की, विद्यार्थी एवढी सहा वर्षे झाडाची काळजी घेतील का? पर्यावरणाचा एवढा विचार ते करतील का? हो, नक्कीच करतील. विद्यार्थ्यास वृक्ष संवर्धनासाठी गुण fिऊाs गेल्यास एक उपक्रम म्हणून विद्यार्थी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन नक्की करतील.
वृक्षारोपणाने व वृक्ष संवर्धनाने पर्यावरणात मुबलक ऑक्सिजन मिळेल, निसर्गाचा समतोल राखला जाईल, वाढते तापमान कमी होईल, जमिनीची धूप कमी होईल, ऋतुचक्र पुन्हा नियमित सुरू होऊ शकते, ओझोनचा वाढलेला थर पूर्ववत होण्यास मदत होईल आणि अधिक झाडांमुळे विविध प्राणी, पक्षी पुन्हा एकदा बागडताना दिसतील. या वर्षीपासून ही संकल्पना आम्ही डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार येथे राबविणार आहोत. चला तर सारे मिळूनी प्रतिज्ञा घेऊया. वृक्ष लागवड आणि संवर्धन करून परिसर सुजलाम् सुफलाम् करू या.




























































