हरवलेलं संगीत (भाग 3) : कहाँ गये वो लोग!

943

>> शिरीष कणेकर

शैलेश मुखर्जी माहित्येय? तो संगीतकार होता, हीरो होता, ‘इंटिरिअर डेकोरेटर’ही होता. त्याच्यात इतकी टॅलंट होती, तो इतक्या दिशांना खेचला जात होता की, तो कुठेच स्थिरावला नाही. परिणामी तो विस्मृतीच्या अंधःकारात फेकला गेला. आज शैलेश मुखर्जी कोण हा प्रश्न पडतो.

1954 साली सत्येन बोस दिग्दर्शित ‘परिचय’ नावाच्या चित्रपटात शैलेशनं ‘आँसूओंकी छावमें’ व ‘जलके दिल खाक हुआ’ ही दोन लाजबाब गाणी लताला दिली. ‘जलके दिल’ या गाण्यात कवी केशव म्हणतो –

‘चाँद के मुखडपे भी दाग है काला काला
इतनी बरसाते हुयी, फिर भी वा धोया न गया’

‘प्यारकी प्यास’मध्ये गौरव या नावानं तो नायक झाला व यथावकाश तो संपून गेला.

शैलेशसारखे अनेक संगीतकार आहेत जे कुठून आले व कुठे गेले हा संशोधनाचा विषय आहे. त्यांनी काही उत्तम रचना देऊनही त्यांचा पाय या मायानगरीत का स्थिरावू शकला नाही हीदेखील कुतूहलाची व वैषम्याची गोष्ट आहे.

सी. अर्जुन हा सिंधी संगीतकार घ्या. ‘सी.रामचंद्र व मी एकाच कुटुंबातले’ अशी तो म्हणे फेकायचा. ‘जय संतोषी माँ’ गाजला. त्यातलं अर्जुनचं संगीतही कर्णोकर्णी झालं, पण धक्क्याला लागलेली अर्जुनची लडखडती कारकीर्द संतोषी माँ तारून नेऊ शकली नाही. एकदा अर्जुन व कवी इंदीवर बसने चालले होते. दोघे दोन खिडक्यांत बसले. एक सुंदर युवती येऊन अर्जुनजवळ बसली. पलीकडे एकटाच बसलेल्या इंदीवरला लगेच काव्य सुचलं – ‘पास बैठो तबीयत बहेल जायेगी, मौतभी आ गयी तो टल जायेगी.’ रफीचं हे हिट गाणं ‘पुनर्मिलन’ नावाच्या चित्रपटात गेलं. ‘सुशीला’मध्ये रफी व तलत यांचं ‘गमकी अंधेरी रात में’ हे द्वंद्वगीत होतं.

बुलो सी. रानी हे असंच आणखी एक उपेक्षित नाव. बावीस वर्षांच्या कारकीर्दीत त्यानं सत्तेचाळीस चित्रपट केले. हा आकडा कमी म्हणता येणार नाही, पण बहुतेकातील संगीत असेतसेच होते. पण एका ‘अल् हिलाल’नं बुलो सी. रानीनं हिट कव्वालीची नवीन व्याख्या घडविली. ‘झीनत’मधल्या नूरजहानच्या ‘आहे ना भरी, शिकवे न किये’नंतर सर्वात गाजलेली कव्वाली होती बुलो. सी. रानीची ‘अल् हिलाल’मधली इस्माईल आझाद आणि पार्टीची ‘हमें तो लूट लिया मिलके हुस्नवालोंने, काले काले बालोंने गोरे गोरे गालोंने’ दिलीपकुमार व नर्गिसच्या ‘जोगन’मधली बुलो सी. रानीची गाणी गाजली. त्यात गीता दत्तची (तेव्हाची रॉय) ‘घुंघट के पट खोल रे’, ‘मैं तो गिरधर के घर जाऊ’, ‘एरी मै तो प्रेम दिवानी’, ‘चंदा खेले आँख मिचौली’, ‘द्वार खुले मनमंदिरके’, ‘डारो डारो रे रंग डारोरे रसिया’, ‘जरा थम जा तू ऐ सावन’, ‘मत जा मत जा जोगी’ व तलत महेमूदचं ‘सुंदरताके सभी शिकारी’ ही गाणी रसिकांना भावली, पण दुर्दैवानं ‘जोगन’ पडला व बुलो सी. रानीचं सुश्राव्य संगीत वाया गेलं. त्याला मीनाकुमारीचं स्थळ सांगून आलं होतं (व त्यानं ते नाकारलं होतं.) अशी एक वावडी कानावर आली होती.

अप्रसिद्ध संगीतकाराला त्यातल्या त्यात प्रसिद्ध संगीतकार म्हणता येईल असा इक्बाल कुरेशी. सत्तावीस वर्षांत त्यानं पंचवीस चित्रपट केले. तो लोकप्रिय होताही आणि नव्हताही. त्याची काही गाणी गाजली, पण तो गाजला नाही. बडय़ा संगीतकारात त्याची गणना कधीच केली गेली नाही. ‘ता थय्या करते आना’ (‘पंचायत’ – लता-गीता), ‘मुझे रातदिन ये खयाल है’ (‘उमर कैद’ – मुकेश), ‘मै अपने आपसे घबरा गया हूं’ (‘बिंदीया’ – महंमद रफी) ही गाणी इक्बाल कुरेशीची होती.

के.दत्ता ऊर्फ दत्ता कोरगावकर हा मराठमोळा माणूस. लता व आशा यांचं पहिलं द्वंद्वगीत कोरगावकरांनी दिलं. ‘ये रुकी रुकी हवाए.’ चित्रपट दामन. साल 1951. सतरा वर्षांच्या कारकीर्दीत कोरगावकरांनी सतरा चित्रपटांना संगीत दिले, पण ‘बडी माँ’ हा त्यांच्या संगीत जीवनाचा व एकूणच आयुष्याचा मर्मबिंदू होता. 5 ऑगस्ट 1944. शनिवार, श्रावण वद्य प्रतिपदा हा तो दिवस जेव्हा कोरगावकरांनी नूरजहानच्या स्वर्गीय आवाजात ‘दिया जलाकर आप बजाया’ रेकॉर्ड केलं. ‘‘अनिल येऊन पाठीवर थाम मारून गेला.’’ ओ.पी.नय्यरनं भेट दिलेल्या पेटीवर ‘दिया जलाकरचे सूर धरत कोरगावकर मला सांगत होते. ‘‘गुलाम हैदरनं तोंड भरून कौतुक केलं. तीक्र, कोमल – अति कोमल ‘गंधार’ आणि दोन ‘धैवत’ यावर सारे फिदा होते. रफिक गझनवीसारखा बुजुर्ग संगीतकार मुद्दामहून आला व म्हणाला, ‘अरे दादा, सुनाओ तो. बहुत तारीख सुनी है गुलाम हैदरसे आणि गुलाम हैदर तर ‘अस्ताईमें कौनसा गंधार और अंतरेमें कौनसा गंधार’ यातच चक्रावून गेला… ’’

‘आ इंतजार है तेरा’, ‘तुम हमको भुला बैठे हो’, ‘किसी तरहसे मुहोब्बत में चैन पा न सके’ (बडी माँ), ‘तिरुलिल्ला तिरुलिल्ला’ – लता, ‘याद आने लगी’ – लता-रफी, ‘चकोरी को चंदा से प्यार’ – लता (दामन), ‘साजन से पहेली बार’ – लता, ‘वही चांदनी है’ – तलत (रिश्ता), ही कोरगावकरांची आणखी काही उत्तम गाणी.

वीस चित्रपटांना स्वतंत्रपणे संगीत देऊनही महंमद शफी अखेरपर्यंत नौशादचा सहाय्यक म्हणूनच ओळखला गेला. तो पार्श्वसंगीतातला आद्य किडा मानला जातो. ‘मुगल-ए-आझम’च्या पार्श्वसंगीतासाठी के. आसिफ त्याला गाडी पाठवून बोलावून घ्यायचा. ‘सोनी महिवाल’ हा नौशादच्या नावावर असलेला चित्रपट शफीनं केल्याचं सांगतात. ‘गंगा जमना’तलं ‘दो हंसोका जोडा’ व ‘ढूंढो ढूंढो रे साजना’ या दोन हिट गाण्यांच्या चाली शफीच्या असल्याचे सांगतात. मात्र त्यानं बायकोला व डॉक्टर मुलीला बजावून सांगितलं होतं, ‘अमूक संगीतकाराचं गाणं खरं म्हणजे माझं आहे, असं खबरदार कुठं सांगत बसाल तर. जो चीज मैने पैसे लेकर बेच दी है, उसपर अब मेरा क्या अधिकार?’ एक प्रश्न उरतोच. नौशादच्या चित्रपटात इतकी उठून दिसणारी त्याची प्रतिभा त्याच्या स्वतःच्या चित्रपटात इतकी अभावानंच का दिसली? ‘बाजुबंद’मधील त्यानं लताकडून गाऊन घेतलेली ‘बाजुबंद खुल खुल जा’ ही बंदिश चांगली होती. तो उत्तम सतारवादक होता. अनेक संगीतकारांनी त्याचे हे अभिजात कौशल्य त्याच्या गाण्यात व पार्श्वसंगीतात वापरले. सितारिया विलायतखान हा शफीचा मेव्हणा. शेवटी शेवटी शफीची स्मृती गेली होती. नाहीतरी आयुष्यात आठवण्यापेक्षा विसरण्यासारखंच जास्त होतं.

संगीतकार बसंत प्रकाश हे एक गौडबंगाल आहे. खेमचंद प्रकाशच्या या धाकटय़ा भावाला चित्रपटसृष्टीनं गंभीरपणे घेतले नाही. लताला विचारलं असता ती म्हणाली, ‘‘त्याला काही यायचं नाही. तो थोरल्या भावाच्या चाली ढापायचा.’’ तो बत्तीस वर्षांत केवळ बारा चित्रपट करू शकला. आश्चर्य म्हणजे 1952 साली ‘सलोनी’ या चित्रपटात नलिनी जयवंतच्या तोंडी असलेली ‘मुझे दर्द तूने ये क्या दिया’ व ‘मेरे बीनाके सूर सात रे’ ही अप्रतिम गाणी लताला दिली. तिनं त्यांचं सोनं केलं हे वेगळं सांगायला नकोच.

सबंध ‘अनारकली’ सी. रामचंद्रनं केला असताना त्यातलं गीता दत्तच्या तोंडी असलेलं ‘आ जाने वफा’ बसंत प्रकाशनं का केलं हेही एक गौडबंगालच म्हणावं लागेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या