
>> शिरीष कणेकर
परवाच्या 11 डिसेंबरला दिलीप कुमारचा 99 वा जन्मदिवस होता. त्या दिवशी लता मंगेशकरनं मला मेसेज केला, ‘असा राजा होणे नाही!’
जिच्याविषयी अख्खं जग म्हणतं की, अशी सुरांची राणी पुन्हा होणं नाही ती एकमेवाद्वितीय लता दिलीप कुमारविषयी म्हणत होती, ‘असा राजा होणे नाही.’
माझ्या आईची मैत्रीण मला एकदा सांगत होती, तुझी आई ‘ज्वारभाटा’ हा दिलीप कुमारचा पहिला चित्रपट पाहून आली आणि सांगत होती, ‘हिरो नवखा आहे. अजून कच्चा आहे, पण बघाल, तो फार मोठा नट होईल.’
आपलं भाकीत खरं झालेलं बघायला ती मला मागे ठेवून निघून गेली. ‘अंदाज’ बघायलादेखील ती नव्हती. मी वर जाईन तेव्हा पहिली गोष्ट तिला सांगेन, ‘तू म्हणाली होतीस ना, तो नट मोठा होईल म्हणून. अगं तो किती मोठा झाला तुझ्या कानावर आलंय का?’
एकदा माझ्या मनमंदिरात दिलीप कुमारला स्थान दिल्यानंतर त्याची विस्थापना करून तिथं अन्य कोणाची प्रतिष्ठापना करावी असं चुकूनही माझ्या मनात आले नाही. तसे अमिताभ बच्चन व संजीवकुमार मला खूप आवडतात. नवीन पिढीतील राजकुमार राव लई भारी आहे! लेकिन दिलीप कुमार की बात रहने दो यारो. फलंदाजोत्तम व्हिक्टर ट्रंपरविषयी म्हटलं गेलंय की, ‘ट्रंपरला बाजूला ठेवा आणि उरलेल्यांच्यात खुशाल नंबर लावा.’ थेट असेच मला दिलीप कुमारविषयी म्हणावंसं वाटतं. ‘दिलीप कुमारला बाजूला ठेवा आणि उरलेल्यांच्यांत खुशाल नंबर लावा.’ देव आनंद आणि राजेश खन्ना यांना शर्यतीतच भाग घेऊ देऊ नका. नकलाकारांची वेगळी स्पर्धा असेल तर त्यात राजेंद्र कुमारपासून शाहरुख खानपर्यंत अनेक जण भाग घेऊ शकतात.
अमिताभ बच्चन त्याच्याच घरात मला म्हणाला होता, ‘माझ्या पिढीतील किंवा नंतरच्या पिढीतील कोणी म्हणत असेल की दिलीप कुमारचा त्याच्यावर काहीच प्रभाव नाही तर मी म्हणेन की, तो खोटं बोलतोय. त्याचा कुठलाही सीन बघताना हा अधिक चांगला करता आला असता असं चुकूनही वाटत नाही. जे दिसतं ते परफेक्ट असतं.’
मनहर देसाईंपासून त्रिलोक कपूरपर्यंत कोरडे पाषाण, भारत भूषणपासून प्रदीप कुमारपर्यंत साबणाच्या वडय़ा व प्रेमनाथसारखी डरकाळय़ा पह्डणारी आक्रस्ताळी अस्वले यांनी रुपेरी पडदा व्यापलेला असताना हा माणूस सहजसुंदर, संयत अभिनय करीत राहिला. प्रेक्षकांना त्यानं खरा अभिनय दाखवला व शिकवला. दिलीप कुमार या अभिनयाच्या विद्यापीठात सिनेरसिक शिकत तरबेज झाले. दुःखी प्रसंगांत ‘तुफाँ में घिरी है मेरी’ (दाग), ‘ऐ दिल मुझे ऐसी’ (आरजू) व ‘किसको खबर थी’ (देवदास) यासारखी मधाळ गाणी पडद्यावर तो शांत बसून गायचा. प्रेक्षकांचं लक्ष गाण्यापेक्षा आपल्याकडे जावे असा अट्टहास त्यानं कधीच केला नाही. म्हणूनच त्या गाण्यांशी तो एकरूप झाला. म्हणूनच ‘एक मैं हूं एक मेरी’ (‘यहुदी’) भूमिकाच नाही तर चित्रपटातील गाणीही जगला.
‘दाग’मधील आई गेल्यावरचा संयत अभिनय व ‘शक्ती’मधला राखीच्या निधनानंतरचा आक्रोश सारखेच भावतात. ‘नया दौर’मध्ये तो मूर्तिमंत टांगेवाला वाटतो. (‘तू छत पर आ जा गोरीये’ या ओळीवरच्या त्याच्या अॅक्शनवर मी थिएटर उसळताना अनेकदा पाहिलंय.) ‘आन’मध्ये तो तलवारबहाद्दर जयतिलक वाटतो. ‘इन्सानियत’मध्ये तो मंगल होतो व ‘तराना’मध्ये तो डॉक्टर. ‘कोहिनूर’ वास्तविक रंजनटाईप चित्रपट होता, दिलीप कुमारनं तो कुठल्या कुठे नेला. ‘जरा मन की किवडिया खोल’ या गाण्यावर तो एक खांदा हलकासा उडवितो. प्रेक्षक तिकडे डोळे लावून बसतात व तो पुन्हा खांदा हलकासा उडवितो तेव्हा थिएटर उसळते. आयुष्यभर त्यानं प्रेक्षकांना बोटांवर खेळवत ठेवले. ‘साला, माँ हो के खुदके बच्चे को छोड गयी’ हा ‘सगिना’तील संवाद त्याच्या तोंडून ऐकाच.
महेश भट एकदा म्हणाला होता, ‘दिलीप कुमार चित्रपट करून नव्हे तर नाकारून मोठा झाला.’ त्यानं राज कपूरचा ‘संगम’ असाच नाकारला. राज कपूर हट्टाला पेटला होता. (त्याला दुसरी ‘अंदाज’ करायचा असावा.) ‘गोपाल आणि सुंदर यातली तुला हवी ती भूमिका कर.’ तो दिलीप कुमारला म्हणाला.
‘कुठलीही भूमिका करायला मी तयार आहे,’ दिलीप कुमार म्हणाला, ‘अट एकच. दिग्दर्शन तू करायचं नाहीस.’
दोघेही एकमेकांना ओळखत होते. राज कपूरनं दिलीप कुमारचा नाद सोडला. त्याच्याऐवजी राजेंद्र कुमारला घेतले.
आज प्रकर्षाने वाटतं की, आजच्यासारखे चित्रपट दिलीप कुमारला मिळाले असते तर त्यानं काय केलं असतं? धुमाकूळ घातला असता. कल्पना करा की, दिलीप कुमारनं ‘पा’ केलाय. हे शंभर नंबरी सोनं शंभरीला दोन वर्षे कमी असताना स्वर्गाचा पडदा रोशन करायला गेलं.
लता बरोबर म्हणते, ‘असा राजा होणे नाही!’





























































