
>> श्रीकांत आंब्रे
‘अकल्पित’ हा अतुल केळुसकर यांचा पहिलाच कथासंग्रह असला तरी कथाविषयांच्या आणि आशयाच्या वेगळेपणामुळे या कथा लक्ष वेधून घेतात. लेखकाच्या अनुभवाचा परीघ अतिशय मोठा आणि सर्वस्पर्शी असल्यामुळे नेहमीपेक्षा वेगळ्या वळणाची कथा आपण वाचत आहोत, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. यातील प्रत्येक कथेत असं काही अकल्पित घडत जातं, त्याची कल्पनाही करता येत नाही.
लेखकाने कथांसाठी निवडलेले वेगवेगळे विषय आणि विविध क्षेत्रं यावरून त्याच्या कथाविषयांची व्याप्ती या कथांना वेगळं परिमाण मिळवून देते. काही कथा गूढ, रहस्यमय तर काही कौटुंबिक, सामाजिक असल्या तरी त्यांचा गाभा त्यांचं वेगळेपण दाखवून जातो. वैयक्तिक शाळकरी अनुभवाइतकीच हिंदुस्थानसारख्या राष्ट्रात चीनची हेरगिरी कशी चालते ही कथा चित्तवेधक वाटते. कायदा – व्यवस्था, मूल दत्तक घेणे यांसारखे अॅडॉप्शनचे विषय लेखकाची अनाथ मुलांबद्दल असलेली आस्था, संवेदनशील, हळवी जाणीव वाचकालाही अंतर्मुख करून जाईल.
जगात तंत्रज्ञान वेगाने बदललं तरी तितक्याच वेगाने सामाजिक मानसिकता बदलणं शक्य नसतं. त्यामुळे जीवनाला आलेलं एक अधांतरीपण आणि मनाची होणारी उलघाल अनेक कथांमधून डोकावते. अद्भुत, आरसा, पवित्र बंधन, पूर्वजन्म, बदला, सीमारेषा, माझी प्रायव्हेट रूम या कथांबरोबरच परिकथेतील खून, फोटोग्राफ, एकवेळचे जेवण, कलियुगातील सावित्री या कथा त्यातील आशयामुळे वाचकांच्या मनात घर करून राहतील अशा आहेत. लेखकाच्या परदेश प्रवासाचा अनुभव आणि आंतरराष्ट्रीय विषयांची सुयोग्य जाण यामुळेही काही कथांना एक ‘ग्रिप’ येते. लेखकाची खेळकर लेखनशैली, त्याला विनोदाची असलेली जाण, कथेच्या अंतरंगात मन हादरवून टाकणारे आलेले विलक्षण थरारक अनुभव यामुळे कथा उत्कंठामय होते. ज्याची आपण कल्पना करू शकत नाही, अशा अकल्पित घटनांवरील या कथा म्हणूनच वेधक वाटतात.





























































