
>> शुभांगी बुवा, सोलापूर
श्री शुभराय महाराज मठ सोलापुरातील सर्वात जुना मठ. 1782 साली भक्तांच्या सांगण्यावरून सध्या असलेल्या श्री शुभराय मठाची तात्पुरती उभारणी झाली, तर 1785ला त्यांच्या भक्तीप्रेमासाठी त्यांचा प्राणसखा वालुकामय विठुराया आषाढी एकादशीला मठात प्रतिष्ठापित झाला. शुभराय यांच्या पश्चात मठाची धुरा त्यांचे परमशिष्य रावजी बुवा ऊर्फ मजुमदार यांच्याकडे आली. त्यांनी आणि त्यांच्यापुढील आठ पिढय़ांनी श्री शुभराय मठ त्यांच्या पद्धतीने राखला. कालमानाप्रमाणे थोडेफार फरक झाले. पण गाभा सुटला नाही. मी 69 वर्षे मठातील दिवाळी अनुभवली आहे. कोणत्याच आमिषाला, प्रलोभनाला बळी पडून दिवाळीला पुठे जाणे अशक्य आहे. आमच्या मठातील सुनादेखील दिवाळीला माहेरी जात नाहीत. दिवाळीचे फार मोठे आकर्षण म्हणजे येथे होणारा काकडा. 5.45 ते 7 या वेळात घरातील सर्व महत्त्वाची कामे सोडून बंधुभगिनी नटून थटून देवासाठी दूध, दही, लोणी, फराळ, फळे येथे खुलभर दुधाचीच कहाणी असते. ते घेऊन मठात येतात. आमची पहाट तर 3.30 ते 4 च्यादरम्यान व्हायची. माझी आजी खूप उत्साही आणि काका आईचे परमभक्त. संचारची रात्रपाळी करून रात्री 2.30 वाजता घरी येत असत आणि चुलीवर ठेवलेल्या हंडय़ातील पाणी तापविण्यासाठी चूल पेटवून सर्वांना उठवायचे. इतक्या पहाटे उठायचा पंटाळा नक्की यायचा पण उठल्यानंतरची जादुई काकडय़ाची गंमत डोळय़ापुढे असल्याने उठायलाच लागायचे. एकादशीला मठात होणाऱया रथाची परिक्रमा, वसुबारशाला मठात राहणाऱया परिचारिकांच्या गाईंची पूजा करणाऱया भगिनींची धांदल आटोपत बायकांच्या न्हाणीचा दिवस यायचा. 2,3 दिवस फराळ बनवून घरातील भगिनींचा उत्साह कमी होत नव्हता.
आता पाहूया मुख्य कार्यक्रम तो म्हणजे काकडा. मठातील दिवाळी खरं तर अश्विन वद्य प्रतिपदा ते कार्तिक वद्यचतुर्थीपर्यंत रोजच असते. देवाचा काकडा हा ऐश्वर्यवंत काकडा असेच आम्ही म्हणतो आणि बघून जाणारे त्यांच्या हृदयातील आठवणी आमच्याबरोबर नेहमीच बोलतात. 5.30 वाजता पहाटे ऑर्गन दोन्ही हातांनी वाजवत कधी काका, कधी वडील, कधी काटकरबाई, ‘जागो मोहन प्यारे…’ची धून वाजवत मठात वातावरणनिर्मिती करायचे. तबल्याला साथ येणाऱया भक्तांपैकी असे. 5.45 बरोबर काकडय़ाची सुरुवात भुपाळय़ा, देवाला उठविण्याच्या ओव्या, देवाची आरती आणि त्यानंतर भागिरथी. नंतर सुरू होता मुख्य अभिषेक त्याच्या मुखप्रक्षालन, स्नान, पंचामृती-स्वतंत्र दूध, दही, केशरी दूध, फळांचा रस यांचे स्नान. मधेच लोणी खाणे-शुद्धोदक स्नान-पोशाख, दागिने-हार, किरीट घालून सज्ज झालेले देव पंचपक्वानांचे स्वादिष्ट भोजन करतात. देवाला उपचार चालू असताना बाहेर भगिनी साजेसे अभंग-ओव्या म्हणतात. अभंगाच्या तालावर देवांचे उपचार बघणे फार आनंदायी विलक्षण पर्वणी असते.
शुभराय मठात येणे, जन्मणे, काकडा आणि सर्व वर्षभरातील उत्सवात सामावून जात आनंद घेणे ही फार मोठी पर्वणी आहे. संत स्वतः देवावरील भक्तिप्रेमाचा अनुभव घेतात. समाजापुढे हा अनुभव ठेवतात आणि पिढय़ानपिढय़ा आपल्यासारखी माणसे हे अनुभव जिवंत ठेवतात. विलक्षण रसायन आहे. आपल्या सर्वांना मनापासून फार प्रेमाने साद घालते, कधीतरी सुट्टी काढा आणि मठातील दिवाळी अनुभवायला याच! दीपोत्सव बघाल. पूर्वी देवासाठी आम्ही फटाके उडवायचो. दिवसभर फुलभाज्या, फटाके, तोटे, ट्रेन फार गमती होत्या हो. शेवटी उडवलेले फटाके गोळा करून परत जाळण्यातही मजा असे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमीसारखी दिवाळी होणार नाही. पर्यावरणाचे महत्त्व कळल्यामुळे फटाक्यांचे आवाज होणार नाहीत, पण आनंदाची दीपावली, वनी बोलवा वनमाळी! काढते मी रांगोळी, गोविंद गोविंद म्हणून काwटुंबिक, सामाजिक, मठातील दिवाळी संपन्न करूया आणि देवाला विनवू या ‘देवा, कोरोनाने आम्ही सर्व आणि जगच दुखी, भयग्रस्त आणि ठप्प झाले आहे याला आवर. आमच्या चुकाही आहेत. परत जनरहाटी सुरळीत कर.’




























































