क्युरिऑसिटीचा उत्साहवर्धक शोध!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुजाता बाबर

मंगळावरील विविध ठिकाणच्या खडकांचे अनेक नमुने क्युरिऑसिटी रोव्हरने गोळा केले असून शास्त्रज्ञांच्या मते बहुसंख्य नमुन्यांमध्ये कार्बन मुबलक प्रमाणात आहे. वेगवेगळ्या कार्बन समस्थानिकांचे मोजमाप करणे हे सर्वात महत्त्वाचे भूगर्भशास्त्रीय साधन आहे. या साधनाचा उपयोग करून दुसऱ्या राहण्यायोग्य जगाच्या पृष्ठभागावरील गाळाच्या अन्वेषणाच्या 9 वर्षांनंतर या शोधाने मंगळाच्या शोधाचे दीर्घकालीन उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हा शोध नवीन दिशा नक्कीच देईल!

मंगळ ग्रहावर क्युरिऑसिटी रोव्हर पाठवून जवळपास एक दशक उलटून गेले असले तरी हा रोव्हर आजही आपल्याला अनेक विस्मयकारक माहिती पाठवत असतो. नुकतीच त्याने जी माहिती पाठवली आहे, त्यात त्याने मंगळावरील कार्बन चिन्हांकांची मोजणी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा कार्बन पृथ्वीवरील जीवशास्त्रीय प्रक्रियांमध्ये असतो त्या प्रकारचा कार्बन आहे. मंगळावरील विविध ठिकाणच्या खडकांचे अनेक नमुने क्युरिऑसिटी रोव्हरने गोळा केले असून शास्त्रज्ञांच्या मते बहुसंख्य नमुन्यांमध्ये कार्बन मुबलक प्रमाणात आहे.

हा शोध कितीही उत्साहवर्धक असला तरी मंगळावर प्राचीन जीवन असण्याची शक्यता यातून मिळत नाही. कारण याला म्हणावे तसे ठोस आणि निर्णायक पुरावे अजून मिळालेले नाहीत, जसे प्राचीन जिवाणूंद्वारे निर्मित गाळाचे खडक किंवा जीवसृष्टीद्वारे तयार झालेल्या जटील सेंद्रिय रेणूंची विविधता अजून तरी सापडलेली नाही. असे असले तरी विपुल प्रमाणात सापडलेला कार्बन नक्कीच वेगळी दिशा देतो. जर प्राचीन जीवनातून हे चिन्हांक निर्माण झाले नाहीत, तर मग कशामधून तयार झाले? हा नवीन प्रश्न समोर येतो. हे संशोधन ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

अर्थातच आपण या सगळ्याची तुलना पृथ्वीवरील जीवन आणि त्याची प्रक्रिया याच्याशी करतो, परंतु अखेरीस हे दोन वेगळे ग्रह आहेत. त्यामुळे आपण असे कोणत्याही निष्कर्षाकडे चटकन येऊ शकत नाही. या संशोधनातील मुख्य शास्त्रज्ञ गोडार्ड यांच्या मते पृथ्वीशी होणारी तुलना आणि आपले पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या उत्क्रांतीविषयी ज्ञान आणि मते यांना सोडून विचार करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. मंगळावरील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि पर्यावरणीय प्रक्रियांच्या मूलभूत गोष्टींमध्ये जाण्याचा खरोखर प्रयत्न करणे अवघड असले तरी आवश्यकही आहे. यापूर्वी आयगेनब्रोड यांनीदेखील मंगळावर कार्बन शोधण्याचे प्रयत्न केले होते. त्यांनीदेखील आपण पृथ्वीपेक्षा वेगळा विचार केला पाहिजे असे सांगितले होते.

पृथ्वीवर प्राचीन जिवाणू यांनी कार्बन चिन्हांक मागे ठेवले होते. या जिवाणूंनी सोडलेल्या मिथेन वायूसोबत अतिनील किरणांची अभिक्रिया होऊन गुंतागुंतीचे रेणू तयार होतात. हे रेणू पावसाने खाली जमिनीवर येतात आणि त्यातून अद्वितीय कार्बन चिन्हांक तयार होतात. अशाच प्रक्रियेने मंगळावरही कार्बन चिन्हांक तयार झाले असावेत. समजा असे नसेल तर काय?

यासाठी दोन वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. पहिला सिद्धांत म्हणजे मंगळावरील कार्बन डायऑक्साईड वायूशी अतिनील किरणांची अभिक्रिया होऊन नवीन कार्बन रेणू तयार झाले असतील, ज्यातून मंगळाच्या पृष्ठभागावर हे कार्बन चिन्हांक तयार झाले आहेत. दुसरा सिद्धांत म्हणजे अब्जावधी वर्षांपूर्वीच्या एखाद्या दुर्मिळ घटनेमध्ये कार्बन मागे सोडला गेला असावा, त्यातून नवीन शोधलेल्या कार्बनच्या प्रकाराने समृद्ध असलेला एक विशाल आण्विक ढग तयार झाला असावा आणि त्यातून जेव्हा सौरमाला गेली असेल तेव्हा मंगळावर हा कार्बन आला असावा. या दोन्ही आणि जीवशास्त्रीय प्रक्रियेतून कार्बन निर्माण होणे या तीनही शक्यता नाकारता येत नाहीत, परंतु यातील नेमके सत्य शोधण्यासाठी अजून माहिती आणि पुरावे यांची गरज आहे.

याचे पुढील विश्लेषण करण्याकरिता ट्युनेबल लेझर स्पेक्ट्रोमीटर वापरला. त्यामध्ये विविध भागांतील 24 नमुने 850 डिग्री सेल्सियस तापमानाला तापवले. त्यातून जे वायू बाहेर पडले ते कार्बनचे समस्थानिक होते. हे समस्थानिक न्यूट्रॉनच्या भिन्न संख्येच्या भिन्न वस्तुमान असलेल्या घटकांचे अणू आहेत आणि ते ग्रहांची रासायनिक आणि जैविक उत्क्रांती समजून घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कार्बन विशेष महत्त्वाचा आहे. कारण पृथ्वीवरील सर्व सजीवांचा तो एक महत्त्वाचा घटक आहे. हवा, पाणी आणि माती यांच्यामधून तो सतत चक्रामधून फिरत असतो. हे आपल्याला समस्थानिक मोजणीमधून अधिक चांगले समजू शकते.

पृथ्वीवरील सजीव प्रकाश संश्लेषणासाठी जड कार्बन 13 पेक्षा हलक्या कार्बन 12चा वापर करतात. त्यामुळे पृथ्वीवरील अधिकांश खडकांमध्ये कार्बन 12 सापडतो. त्यामुळे आपल्याला हे समजायला मदत होते की, पृथ्वीवरील जीवन कोणत्या पर्यावरणात राहिले असावे. या मूलभूत सिद्धांताचा उपयोग मंगळावरील कार्बन शोधामध्ये वापरला जाऊ शकतो. मंगळावर क्युरिऑसिटी संशोधकांना असे आढळून आले की, त्यांच्या जवळपास अर्ध्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन-12 आहे. मंगळाच्या वातावरणात आणि उल्कापिंडांमध्ये शास्त्रज्ञांनी मोजलेला कार्बन 12 या तुलनेत कमी आहे. हे जरा विसंगत वाटते.

पृथ्वी आणि मंगळ एकमेकांपासून निश्चितच वेगळे आहेत. मंगळ पृथ्वीपेक्षा लहान आहे, थंड आहे. त्यावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत क्षीण आहे. तसेच मंगळाच्या वातावरणातील वायूदेखील वेगळे आहेत. पृथ्वीवर साडेचार अब्ज वर्षांपूर्वी जी सुरुवात झाली त्यापेक्षा मंगळावरील सुरुवात कार्बन समस्थानिकांच्या वेगळ्या प्रकारच्या मिश्रणाने झाली आहे. शिवाय मंगळावरील कार्बन हा कोणताही सजीव नसलेल्या चक्रामधून फिरत असण्याची शक्यता आहे.

मंगळावरील अजूनही प्राचीन पृष्ठभागावरील नमुने गोळा करून हा शोध पुढे चालू राहील. वेगवेगळ्या कार्बन समस्थानिकांचे मोजमाप करणे हे सर्वात महत्त्वाचे भूगर्भशास्त्रीय साधन आहे. या साधनाचा उपयोग करून दुसऱया राहण्यायोग्य जगाच्या पृष्ठभागावरील गाळाच्या अन्वेषणाच्या 9 वर्षांनंतर या शोधाने मंगळाच्या शोधाचे दीर्घकालीन उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हा शोध नवीन दिशा नक्कीच देईल!

[email protected]