अंतराळ – मंगळावर आता हेलिकॉप्टरही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुजाता बाबर

नासाचे इनजेन्युइटी हेलिकॉप्टर मंगळाकरील काताकरणात यशस्कीरीत्या झेपाकले. कुठल्याही परग्रहावरील हेलिकॉप्टरचे हे पहिले नियंत्रित उड्डाण म्हणूनच महत्त्वाचे. अंतराळ संशोधनक्षेत्रात नासाची ही कामगिरी महत्त्वाची ठरली आहे.

राइट्स बंधूनी अनुभवलेला ‘तो क्षण’ आपण पुन्हा एकदा अनुभवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मंगळावर इंजेन्युइटी हेलिकॉप्टरचे उड्डाण यशस्वी झाल्यावर नासाच्या शास्त्रज्ञांनी जो जल्लोष केला ते पाहून तरी नक्कीच असे वाटेल. नासातर्फे पाठविलेले पर्सिव्हरन्स यान मंगळावर 18 फेब्रुवारी 2021 यशस्वीरीत्या उतरले आणि त्याने त्याचे काम लगेचच सुरू केले होते. इंजेन्युइटी हेलिकॉप्टरचे मंगळावर यशस्वी उड्डाण झाले तर हा ऐतिहासिक क्षण असणार होता. कारण पृथ्वीच्या बाहेरील जगामध्ये हे पहिले हेलिकॉप्टर उड्डाण असणार होते. आपण इतर ग्रह-उपग्रहांवरदेखील असेच यशस्वी उड्डाण करू शकतो हा आत्मविश्वास या घटनेने मिळणार होता. हे प्रत्यक्षात उतरले देखील! 19 एप्रिल 2021 रोजी इंजेन्युइटी हेलिकॉप्टरचे उड्डाण यशस्वी झाले. ही केवळ तंत्रज्ञान चाचणी होती, परंतु असे असले तरी यापुढे इतर ग्रह-उपग्रहांवर हेलिकॉप्टर पाठविताना त्यांच्या यशस्वी उड्डाणासाठी कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे आणि काय दक्षता घ्यावी हे लक्षात आले आहे. याची काही ठळक वैशिष्टय़ेः

पर्सिव्हरन्स योग्य ‘हेलिपॅड’जवळ पोहोचले आणि त्याने इंजेन्युइटीला अलगद बाहेर काढले. 30 मंगळ-दिवसांच्या वास्तव्यात हेलिकॉप्टर उड्डाणाची चाचणी मालिका होणार आहे.

पहिल्या चाचणीमध्ये हे हेलिकॉप्टर पृष्ठभागापासून 3 मीटर उंच उडाले. हवेत त्याने एक गोलाकार फेरफटका मारला आणि पुन्हा पृष्ठभागावर येऊन थांबले. पुढील चाचण्या अजून लांब अंतराच्या आणि अधिक उंचीवरच्या असतील.

महत्त्वाचे म्हणजे मंगळावर असलेल्या अतिशय विरळ वातावरणातील हे उड्डाण होते. शिवाय रात्रीच्या उणे 90 डिग्री तापमानाला ते उबदार राहिले. सौर पॅनेलच्या मदतीने ते स्वतःला भारीत केले.
पृष्ठभागावर स्थिर असताना त्याचे रोटर पंखे मंगळावर प्रथमच फिरले. हे पंखे चार मीटर लांबीचे आहेत.

या हेलिकॉप्टरची रचना मंगळाच्या कठीण वातावरणासाठी योग्य आणि पूरक आहे. याचे वजन केवळ 1.8 किलो आहे.

हेलिकॉप्टर एका वेळी सुमारे 980 फूट आणि जमिनीपासून 10 ते 15 फूट अंतरापर्यंत आणि जास्तीत जास्त 90 सेकंदांपर्यंत उड्डाण करू शकते. राइट ब्रदर्सच्या विमानाच्या पहिल्या 12 सेकंदाच्या विमान उड्डाणाच्या तुलनेत हे यश निश्चितच लहान नाही.

हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी पृथ्वीवरून मानवी नियंत्रण करणे अवघड आहे. त्यामुळे ते स्वतःच उड्डाणावर नियंत्रण करू शकेल इतके त्याला हुशार बनविले आहे. ते स्वतःच उडते, मात्र त्यासाठी पृथ्वीवरून आगाऊ आदेश पाठवणे आवश्यक आहे – उड्डाणासाठी तयार राहणे, उड्डाण करणे, परत पृष्ठभागावर पोहोचणे. हे अत्यंत आव्हानात्मक आहे. कारण पृथ्वीवरचा संदेश मंगळापर्यंत पोहोचण्यासाठी 20 मिनिटे कालावधी लागतो. समजा काही बिघाड झालाच तर योग्य सूचना पोहोचेपर्यंत कदाचित वेळ निघून जाण्याची शक्यता आहे!

या हेलिकॉप्टरच्या रचनेमध्ये त्याचे एव्हिऑनिक्स किंवा ‘मेंदू’ हेलिकॉप्टर कार्य आणि प्रवासमार्ग निश्चित करण्यास मदत करतात.

यशस्वी उड्डाणापूर्वी इंजेन्युइटीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. खरे तर हे उड्डाण 11 एप्रिल रोजी होणार होते, परंतु सुरुवातीला उड्डाण स्थितीत येण्यास त्याला यश मिळाले नाही आणि उड्डाण होऊ शकले नाही.

16 एप्रिल रोजी ही समस्या सोडवण्यात आली आणि त्यासाठी त्याच्या पंख्यांची गती जास्त करावी लागली. त्याची ‘रॅपिड स्पीन’ चाचणी यशस्वी झाली.

पृथ्वीवर हेलिकॉप्टर उड्डाणामध्ये त्याच्या पंख्यांची गती मिनिटाला 500 आवर्तने इतकी असते. मंगळावर विरळ वातावरण असल्याने ती मिनिटाला 2500 आवर्तने करावी लागली.

पुढच्या उड्डाणामध्ये इंजेन्युइटी त्यावरचा कॅमेरा आणि इतर उपकरणांचा वापर करेल. ही केवळ तंत्रज्ञान चाचणी असून याच्या यशस्वितेवर आधारित पुढील मोहिमा आखल्या जातील.

आपल्याला अभिमान वाटेल अशा अनेक गोष्टी या मोहिमेशी निगडित आहेत. एक म्हणजे इंजेन्युइटी हे नाव वानिझा रूपानी या मूळ हिंदुस्थानी वंशाच्या मुलीने सुचविलेले आहे. याचा अर्थ आहे हुशारी, चातुर्य! दुसरे म्हणजे डॉ. स्वाती मोहन या पर्सिव्हरन्स रोव्हर प्रकल्पाच्या मुख्य ऑपरेशन अभियंता आहेत.

पर्सिव्हरन्स मंगळावर उतरवणे आणि त्यातून इंजेन्युइटी नेऊन त्याचे यशस्वी उड्डाण होणे हे काही साधेसुधे काम नाही. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता यांनी परिश्रम घेतले आहेत. त्यामध्ये एक मूळ हिंदुस्थानी वंशाचे तंत्रज्ञ आहेत. हिंदुस्थानी वंशाचे अभियंता डॉ. जे. (बॉब) बलराम या प्रकल्पाचे मुख्य अभियंता आणि डिझायनर आहेत. ते जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) येथे मोबिलिटी ऍण्ड रोबोटिक सिस्टिम्स विभागात काम करतात आणि गेली 20 वर्षे नासामध्ये कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक सन्मान मिळाले आहेत.

इंजेन्युइटीच्या पुढील चाचण्यादेखील यशस्वी व्हाव्यात हीच सदिच्छा!

– [email protected]