
>> स्नेहा अजित चव्हाण
विद्यार्थी म्हणून शैक्षणिक आणि रोजची कामे तुम्ही नीट जाणून घेतली पाहिजेत. त्याचे नियोजन केले पाहिजे. त्याचा रोजच्या रोज आढावा घेतला पाहिजे. तुमच्या वेळापत्रकावर तुमचे पूर्ण नियंत्रण असले पाहिजे. रोज ठरलेल्या गोष्टी त्याच दिवशी पूर्ण झाल्या पाहिजेत. अभ्यासाचे नियोजन पुढे ढकलत राहिलो तर परीक्षेचा दिवस कधी उजाडतो हे समजत नाही आणि तोपर्यंत काहीच अभ्यास झालेला नसतो. त्यामुळे वेळापत्रकावर लक्ष ठेवा. आजच्या तासात, अर्ध्या दिवसात, संध्याकाळपर्यंत, दिवस संपल्यावर झोपेपर्यंत किती अभ्यास झाला आणि किती वेळ वाया गेला त्याचा हिशेब मांडा. वेळ वाया का जातो याचा विचार करून स्वतःवर निर्बंध घाला.
जर तुम्हाला चांगली शैक्षणिक प्रगती करायची असेल, गुण मिळवायचे असतील तर अभ्यासातील काही स्मार्ट टिप्स लक्षात घेणे आवश्यक असते. सध्याच्या युगात चांगली शैक्षणिक कामगिरी करून दाखवण्यासाठी तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सरस ठरण्यासाठी विद्यार्थ्यांवर प्रचंड दबाव असतो. अभ्यास, खेळ, वक्तृत्व आणि अन्य स्पर्धा किंवा सृजनशील क्षेत्रात पाल्याने चांगली कामगिरी करावी अशी पालकांची अपेक्षा असते. अभ्यासात कसे सरस ठरता येईल, परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी काय केले पाहिजे यासाठी पुढील स्मार्ट टीपचा अवलंब करा.
काही जण अतिशय शांतपणे आणि शांत वातावरणात अभ्यास करतात, पण त्याऐवजी तुम्ही मोठय़ा आवाजात उत्तरे, धडे, नोटस् वाचल्या तर त्या तुमच्या जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. शांतपणे वाचताना मन भरकटण्याची किंवा मनात अन्य विचार येण्याची शक्यता असते.
मोठय़ाने वाचताना तुमचे लक्ष फक्त वाचनावरच राहते. सगळी गाणी तुमच्या लक्षात राहतात. कारण ती मोठय़ा आवाजात तुम्ही ऐकलेली असतात. आपला मेंदू ऐकलेल्या आवाजाला चांगल्या प्रकारे प्रात देतो.
अभ्यासाला बसण्यापूर्वी स्वतःसमोर उद्दिष्ट ठेवा. ठरलेल्या वेळेत किती प्रश्नांची उत्तरे झाली पाहिजेत हे निश्चित करा किंवा वाचून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर ठरलेल्या वेळेत किती पाने पूर्ण करायची हे निश्चित करा. यामुळे तुमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता कमी होते आणि वेळही वाया जात नाही.
जे काही वाचले आहे ते आत्मसात करायचे असेल तर ते सविस्तर स्वतःलाच समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शांत बसा आणि एक-एक मुद्दा स्वतःलाच समजावून सांगा. त्यामुळे मुद्दे लक्षात राहतील. पुनः पुन्हा त्याची मनात उजळणी केल्याने आपल्याला व्यवस्थित पद्धतीने उत्तरपत्रिका लिहिता येईल असा आत्मविश्वास तुम्हाला येईल.
जेव्हा तुम्ही वाचलेली उत्तरे लिहून काढता, तेव्हा ती आणखी चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. समजा एखादा धडा शिकल्यानंतर तो लिहून काढल्यावर तुमच्या लक्षात येईल की, तो आता किती चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलेला आहे. जेव्हा तुम्ही शिकता त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने तुमचा मेंदू सगळय़ा गोष्टी लक्षात ठेवतो ज्या वेळी तुम्ही लिहून काढता.
सध्याच्या काळात शिकण्यासाठी इंटरनेटची मदत हा मुलांसमोर आणखी एक पर्याय आहे. आधीच्या पिढय़ांना तो उपलब्ध नव्हता. अनेक गोष्टी इंटरनेटवर व्हिडीओद्वारेदेखील समजावून घेता येतात. कुठलीही गोष्ट डोळय़ांनी बघितली की, ती आणखी चांगल्या प्रकारे लक्षात राहते. त्यामुळे विज्ञानातील विविध संकल्पना नीट समजावून घेण्यासाठी इंटरनेट उपयुक्त ठरू शकते.
अभ्यास करताना सलग एक ते दीड तास अभ्यास झाला की, मध्ये दहा मिनिटांचा ब्रेक घ्या. ब्रेक दहा मिनिटांपेक्षा जास्त असू नये. ब्रेकची वेळ संपली की, पुन्हा लगेच अभ्यासाला बसा. ब्रेकच्या वेळेत फ्रेश होणे, काहीतरी खाणे, मोबाईल चेक करणे अशी कामे उरकून घ्या. सतत अभ्यास केल्याने मेंदू थकतो. त्याला अधूनमधून असा ब्रेक मिळणे आवश्यक असते.
परीक्षेच्या वेळी मेंदू चांगल्या प्रकारे सक्रिय राहिला पाहिजे असे वाटत असेल तर परीक्षेपूर्वी 10-15 मिनिटे चालून या. त्यामुळे तुमचा मेंदू सक्रिय आणि ताजातवाना होईल व तुम्हाला उत्तरे चांगल्या प्रकारे आठवतील.
अभ्यासाचे योग्य नियोजन करून परीक्षेत यश मिळवू, यशाची गुढी उभारू.
(सहाय्यक शिक्षिका, श्रमिक विद्यालय, जोगेश्वरी (पूर्व))
[email protected]